Akshay Athare new home: सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनी स्वत:चा मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. मनोरंजन, माहिती देणारे, विविध क्षेत्रातील गोष्टी इतरापर्यंत पोहोचवणारे, बिझनेस अशा अनेक प्रकारचे व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. अनेकांचा मोठा चाहतावर्ग निर्माण होतो. त्यांचे हजारो-लाखो फॉलोअर्स असतात.
अनेक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरदेखील कष्टाने, मेहनतीचे स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करतात. काही वेळा सोशल मीडियाच्या माध्यमातून ते त्यांच्या प्रवासाबद्दल सांगत असतात. यापैकीच एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अक्षय आठरे हा आहे. त्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात.
“एका पत्र्याच्या घरापासून सुरू झालेला हा प्रवास…”
आता अक्षयने त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील एक खास गोष्ट शेअर केली आहे. त्याने स्वत:चे घर घेतले आहे. घराच्या वास्तुशांतीचे काही फोटो शेअर करत त्याने लिहिले, “एका पत्र्याच्या घरापासून सुरू झालेला हा प्रवास आज या सुंदर घरापर्यंत येऊन पोहोचला आहे. कधी खिशात काहीच नव्हतं, पण डोळ्यांत स्वप्नं खूप मोठी होती. शून्यापासून सुरुवात केली, एक-एक पाऊल टाकत पुढे आलो. पडताना उठलो, थांबावंसं वाटलं तरी चालत राहिलो. पण हे स्वप्न फक्त माझं नव्हतं. हे स्वप्न माझ्या दीदीचं, माझ्या आई-बाबांचं आणि माझं होतं. आपलं स्वतःचं एक सुंदर घर असावं,जिथे आपण सगळे एकत्र आनंदाने राहावं. हे स्वप्न आम्ही सगळ्यांनी मिळून पाहिलं होतं. आज ते स्वप्न हळूहळू पूर्ण होतंय.पण या आनंदाच्या क्षणी मनात एक खूप मोठी पोकळी आहे.”
“दीदी, तू हे स्वप्न पूर्ण होताना…”
काही महिन्यांपूर्वी अक्षयच्या बहिणीचे निधन झाले आहे. तिला उद्देशून त्याने लिहिले, “दीदी, तू हे स्वप्न पूर्ण होताना बघायला आज या जगात नाहीस, ही गोष्ट स्वीकारणं आजही तितकंच कठीण आहे. तुझ्याबरोबर हे घर बघायचं होतं. तुला प्रत्येक कोपरा दाखवायचा होता आणि मनापासून म्हणायचं होतं की बघ दीदी, आपलं स्वप्न खरं झालं. आज तू माझ्याबरोबर नाहीस, पण या घराच्या प्रत्येक कोपऱ्यात तुझ्या आठवणी आहेत. माझ्या प्रत्येक यशात तुझा वाटा आहे आणि माझ्या प्रत्येक आनंदात तुझी उणीव आहे. तू जिथे कुठे असशील ना दीदी, आज एकदा नक्कीच माझ्याकडे बघत असशील आणि कदाचित हसून म्हणत असशील की मला माहिती होतं, तू हे नक्की करून दाखवशील.”
“हे घर माझ्यासाठी फक्त एक घर नाही, हे माझ्या आई-बाबांचं स्वप्न आहे. माझ्या दीदीची आठवण आहे, आणि माझ्या शून्यापासून सुरू झालेल्या प्रवासाची साक्ष आहे. दीदी, मला तुझी आज तू असतीस तर हा आनंद अजून कितीतरी मोठा झाला असता. तुझी खूप आठवण येते”, असे लिहित अक्षयने त्याच्या भावना व्यक्त केल्या.
