अभिनेता अक्षय कुमारसाठी २०१६ हे वर्ष काहीसे खास होते. विविध धाटणीच्या चित्रपटांना प्राधान्य देणारा हा अभिनेता २०१७ या वर्षीसुद्धा त्याच्या चित्रपटांद्वारे प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी सज्ज होत आहे. सध्या खिलाडी कुमार त्याच्या ‘जॉली एलएलबी २’ आणि ‘टॉयलेट- एक प्रेम कथा’ या चित्रपटांच्या निमित्ताने व्यग्र आहे. पण, असे असले तरीही तो सोशल मीडियापासून दुरावलेला नाही. अक्षयने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे पोस्ट केलेल्या एका फोटोने सध्या अनेकांचेच लक्ष वेधले आहे. अक्षयने पोस्ट केलेल्या या फोटोवरुन नजर हटत नाही तोवरच अभिनेता अनुपम खेर यांनीसुद्धा त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडिओ पोस्ट करत अनेकांचे लक्ष वेधले.
‘टॉयलेट-एक प्रेम कथा’ या चित्रपटाच्या सेटवरील या व्हिडिओमध्ये अभिनेता अमुपम खेर, अक्षय कुमार आणि या चित्रपटातील इतर कलाकार व्यासपीठावर उभे दिसत आहेत. ट्विटमध्ये लिहिल्याप्रमाणेच व्हिडिओमध्येही अनुपम खेर हा चित्रपट खिलाडी कुमारसोबत आपला २०वा चित्रपट असल्याचे स्पष्ट करत आहेत आणि त्यासंबंधीच्याच उत्साहाचा हा व्हिडिओ आहे. अनुपम खेर आणि अक्षय कुमार यांनी आजवर विविध चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. त्यांच्या चित्रपटांना प्रेक्षकांचीही दाद मिळाली आहे.
#ToiletEkPremKatha is my 20th film with #Superstar @akshaykumar. Here is a glimpse of how we celebrated this landmark on the sets.:) pic.twitter.com/yl5bxuUk7v
— Anupam Kher (@AnupamPkher) December 14, 2016
दरम्यान, अक्षयने त्याच्या ट्विटर आणि इन्स्टाग्रामवरुन पोस्ट केलेल्या एका फोटोमध्ये तो एका लहानमुलांच्या गाडीमध्ये बसलेला असून अनुपम खेर त्याची ही गाडी ढकलताना पाहायला मिळत आहेत. ‘या व्यक्तीने अनेकांनाच प्रेम आणि मार्गदर्शन दिले आहे. मलाही माझ्या आजवरच्या कारकिर्दीमध्ये त्यांचे खुप प्रेम आणि मार्गदर्शन लाभले आहे’, असे म्हणत अक्षयने शब्दांद्वारे त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
खिलाडी कुमार आणि अनुपम खेर यांनी आजवर ‘द शौकिन्स’, ‘बेबी’, ‘स्पेशल २६’, ‘देसी बॉईज’ अशा विविध चित्रपटांमध्ये काम केले आहे. आगामी ‘टॉयलेट- एक प्रेम कथा’ हा त्यांचा २० वा चित्रपट आहे. गेल्या काही दिवसांपासून अभिनेता अक्षय कुमार त्याच्या चित्रपटांच्या निमित्ताने आणि सोशल मीडियावर त्याने केलेल्या पोस्ट्समुळे चर्चेत आहे. बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार लागोपाठ हिट चित्रपट देत आहे. त्याने केलेल्या आताच्या चित्रपटांवर नजर टाकली तर आपल्याला सद्य परिस्थितीवर आणि देशभक्तीपर चित्रपटात त्याने काम केलेले पाहायला मिळेल. पण, आता तो काही वेगळ्याच विषयासह आणि शीर्षकासह सर्व चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. आगामी ‘टॉयलेट एक प्रेम कथा’ या चित्रपटात अभिनेत्री भूमी पेडणेकरसह स्क्रिन शेअर करत खिलाडी कुमार प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.