scorecardresearch

“मला माफ करा, मी यापुढे…”; पान मसालाच्या जाहिरातीवरुन ट्रोल झाल्यानंतर अक्षय कुमारने दिले स्पष्टीकरण

या पोस्टमध्ये त्याने विमल पान मसालाच्या नवीन जाहिरातीमुळे होणाऱ्या ट्रोलिंगवर उत्तर दिले आहे.

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा सिनेसृष्टीतील सर्वात व्यस्त अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. तो अनेकदा त्याच्या चित्रपटांच्या टीझर, ट्रेलरमुळे चर्चेत असतो. मात्र गेल्या काही दिवसांपासून अक्षय हा वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी अक्षय कुमार हा विमल पान मसालाच्या नवीन जाहिरातीत झळकला होता. या जाहिरातीत शाहरुख खान, अजय देवगण आणि अक्षय कुमार असे तिघेही झळकत आहेत. त्यावरून अक्षयला ट्रोल करण्यात येत होते. अखेर अक्षयने या ट्रोलिंगवर उत्तर देत एक मोठी घोषणा केली आहे.

अक्षय कुमारने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने विमल पान मसालाच्या नवीन जाहिरातीमुळे होणाऱ्या ट्रोलिंगवर उत्तर दिले आहे. यात अक्षयने त्याच्या सर्व चाहत्यांची माफी मागितली आहे. तसेच यापुढे कोणत्याही तंबाखू ब्रँडची जाहिरात करणार नाही, असेही त्याने सांगितले आहे.

अक्षय कुमार नेमकं काय म्हणाला?

“मला माफ करा. मी माझ्या सर्व चाहत्यांची आणि हितचिंतकांची तसेच तुम्हा सर्वांची माफी मागू इच्छितो. गेल्या काही दिवसात तुमच्या विविध प्रतिक्रिया मी वाचल्या. त्याचा माझ्यावर खोलवर परिणाम झाला आहे. मी याआधी कधीही तंबाखू यांसह इतर उत्पादनाचे समर्थन केलेले नाही आणि करणारही नाही.”

“विमल पान मसालाच्या जाहिरातीत झळकल्यानंतर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियांचा आणि तुमच्या भावनांचा मी मनापासून आदर करतो. म्हणूनच मी मोठ्या विनम्रपणे यातून माघार घेत आहे. तसेच मी ठरवले आहे की, या जाहिरातीतून मला मिळालेल्या पैशाचा मी चांगल्या कामासाठी वापर करेन.”

“तसेच विमल पान मसाला या ब्रँडने जोपर्यंत या कराराचा कायदेशीर कालावधी पूर्ण होत नाही, तोपर्यंत ही जाहिरात प्रसारित करु शकते. पण मी वचन देतो की यापुढे भविष्यात मी फार हुशारीने पर्यायाची निवड करेन. तसेच तुम्ही नेहमी माझ्यावर असेच प्रेम आणि प्रार्थना करत राहा”, असे अक्षय कुमार म्हणाला.

नेमकं प्रकरण काय?

अक्षय कुमारची ही जाहिरात काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाली होती. या जाहिरातीची सुरुवात शाहरुख खान आणि अजय देवगणने हा अक्षय कुमारचे ‘विमल युनिव्हर्स’मध्ये स्वागत करत होते. या जाहिरातीच्या निमित्ताने शाहरुख खान, अजय देवगण आणि अक्षय कुमार बॉलिवूडचे तीन मोठे स्टार पहिल्यांदाच एका जाहिरातीत झळकले होते. पण ही जाहिरात तंबाखूच्या ब्रँडची असल्याने अनेकांनी त्यावर निशाणा साधला होता.

यानंतर अनेकांनी अक्षय कुमारचे जुने व्हिडीओ शेअर करत त्याला त्याच्या वक्तव्यांची आठवण करुन दिली होती. या व्हिडीओत अक्षय हा दारु, सिगारेट, तंबाखू यासारख्या हानिकारक उत्पादनांपासून दूर राहण्याबद्दल बोलत असल्याचे दिसत आहे. यामुळे त्याला अनेकांनी ट्रोल केले होते.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Akshay kumar apologises for endorsing vimla paan masala will donate fee to worthy cause nrp

ताज्या बातम्या