विनोदी चित्रपटांच्या बाबतीत एकेकाळी हुकमाचा एक्का ठरलेल्या दिग्दर्शक प्रियदर्शन यांना हाताशी घेऊन त्यांच्याच गाजलेल्या ‘भूलभुलैया’ या चित्रपटातली अनुभवी विनोदी कलाकार मंडळी एकत्र करत अक्षय कुमारने ‘भूत बंगला’ नावाचा सावळागोंधळ उभा केला आहे. या चित्रपटाचा प्रोमो प्रदर्शित झाल्यानंतर ‘भूलभुलैया’चीच या चित्रपटावर पूर्ण छाप असेल असं वाटलं होतं. पण, त्या चित्रपटाची कणभरही सर नसलेला, दीड तास फुटकळ विनोद आणि दीड तास भुताची गोष्ट अशा ठोकळेबाजपणाने मांडलेला ‘भूत बंगला’ पाहताना एकच गोष्ट ठळकपणे जाणवते ती म्हणजे वय झालं आहे आत्ता अक्षय कुमारचं…
दूर लंडनमध्ये अर्जुन आचार्य (अक्षय कुमार) त्याच्या बहिणीच्या मीराच्या लग्नाची समस्या सोडवत बसला आहे. मीराच्या सासरची मंडळी प्रत्येक गोष्ट त्यांच्या महाराजांच्या सल्ल्यानुसार करतात. तर मीराच्या लग्नासाठी महाराजांना उत्तम वाटू शकेल, अशी जागा शोधण्याचं कोडं सोडवत असतानाच त्यांच्या हातात भारतातल्या त्यांच्या अतिशय आलिशान, प्राचीन अशा हवेलीची कागदपत्रं येऊन पडतात. याच हवेलीत मीराचं लग्न करायचं या निर्धाराने अर्जुन भारतात येतो. मंगलपूरनामक एका गावात ही हवेली आहे, जिथे कोणत्याही मुलीचं लग्न केलं जात नाही. एखाद्या मुलीने गावात लग्न केलं तर त्याच रात्री वधुसुर नावाचा राक्षस त्या नववधूला गायब करतो, अशी दंतकथा गावात रूढ आहे.
अर्थात, या सगळ्यावर अर्जुनचा विश्वास नसल्याने तो आत्तापर्यंत या हवेलीचा सांभाळ करणाऱ्या शांतारामच्या (असरानी) आणि वेडिंग प्लॅनर जगदीशच्या (परेश रावल) मदतीने जुनाट हवेलीला नवा साज चढवण्याच्या कामाला लागतो. अर्थात, त्या हवेलीतल्या वधुसुराच्या अस्तित्वाची बाब अर्जुनसकट सगळ्यांनाच जाणवायला लागते. आणि मग खरोखरच मीराच्या लग्नात वधुसुर आला आणि त्याने तिलाच नेलं तर… या संकटाची चाहूल लागलेला अर्जुन हे वधुसुर नावाचं विघ्न कसं दूर करायचं? यामागे लागतो. आता हा वधुसुर कोण? हवेलीशी आणि अर्जुनशी त्याचा काय संबंध? वधुसुराच्या बाबतीत नेमकं असं काय घडलं आहे म्हणून तो हे वधू पळवापळवीचे उद्योग करतो आहे, या प्रश्नांची उत्तरं देत चित्रपट आपल्याला अर्जुन-वधुसुर सामन्यापर्यंत आणतो.
भयभूत आणि मानवी मनाचे खेळ याची उत्तम सांगड घालत ‘भूलभुलैया’सारखा उत्तम चित्रपट देणाऱ्या प्रियदर्शन यांच्यासारख्या दिग्दर्शकाला ‘भूत बंगला’सारखा टुकार चित्रपट देण्याचा मोह का व्हावा हे कळत नाही. या चित्रपटाची कथा आकाश कौशिक यांची आहे. आकाशने याआधी ‘भूलभुलैया २’ आणि ‘भूलभुलैया ३’ची कथा-पटकथा-संवाद तिन्ही जबाबदाऱ्या पेलल्या आहेत. त्यामुळे साधारणपणे भूतपटांना लागणारा मसाला काय आणि त्यासाठी कशा पद्धतीने कथा रचायला हवी, याचं पुरेसं ज्ञान आकाशकडे आहे, हे चित्रपटातल्या भुतासाठी रचलेल्या वधुसुर आणि वृक्षपरी यांच्या कथेवरून लक्षात येतं. किंबहुना, चित्रपट चालला असेल तर त्याचं श्रेय बऱ्यापैकी मध्यंतरानंतर येणाऱ्या वधुसुराच्या कथेला द्यावं लागेल. पण, कथा एकाची पटकथेवर काम केलं आहे भलत्याच तिघांनी आणि दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्या जोडीला निर्माता म्हणून अक्षय कुमार आणि एकता कपूर यांचंही मौलिक योगदान लाभलं असेल यात शंका नाही.
चित्रपटासाठी उत्तम कथा असतानाही पूर्वार्ध हा फक्त अक्षय कुमार, असरानी, परेश रावल आणि राजपाल यादव यांच्यातल्या विनोदनिर्मितीवर खर्ची पडला आहे. असरानी यांना ‘भूलभुलैया’मध्ये फारसा वाव मिळाला नव्हता, इथे मात्र त्यांनी शंभूबाबूंच्या भूमिकेत गंमत आणली आहे. गेल्या वर्षी या ८४ वर्षांच्या जाणत्या विनोदी अभिनेत्याचं निधन झालं. त्याआधी त्यांनी हा चित्रपट पूर्ण केला आहे. या वयातही पुरेपूर भान बाळगून, आपलं पूर्ण हसं होणार नाही अशा पद्धतीने त्यांनी त्यांची भूमिका रंगवली आहे. परेश रावल यांच्यासाठी तर अशा विनोदी भूमिका या आता ठरीव साचा आहेत.
या तिघांच्या एकत्रित येण्याने स्मृतीरंजनाचा फायदा थोड्याफार प्रमाणात चित्रपटाला मिळाला हे मान्य केले तरी अत्यंत जुनाट, बुरसट पद्धतीने ही विनोदनिर्मिती चित्रपटभर पेरलेली आहे. सतत कुणावर तरी तारस्वरात ओरडत म्हटलेले संवाद, कमरेखालचे संवाद म्हणजे विनोद नाही, हे शहाणपण चित्रपटकर्मींना नेमकं कधी येणार? हा प्रश्नच आहे. चित्रपटात ढिगाने व्यक्तिरेखा असल्या तरी कॅमेरा फक्त अक्षय कुमार आणि अक्षय कुमारवरच केंद्रित झालेला आहे. जिशू सेनगुप्तासारख्या तरुण, आकर्षक दिसणाऱ्या अभिनेत्याला अक्षय कुमारचा बाप म्हणून दाखवताना कुठलं तर्कशास्त्र वापरलं आहे कोण जाणे… तब्बूचा वावर हा अगदी मोजक्या दोन-तीन प्रसंगांत आहे, पण तो सुखद आहे.
अक्षय कुमारचा अभिनय हा न बोलण्यासारखाच विषय आहे. ‘भूलभुलैया’ चित्रपटात होती तशीच दिसणारी हवेली, या हवेल्यांशी जोडल्या गेलेल्या भूतपिशाचांच्या पुराणकथा आणि तेच कलाकार हे एवढं साम्य सोडलं तर सगळ्याच बाबतीत तो चित्रपट सरस होता. अरिजित सिंगच्या आवाजातलं ‘तू ही दिसदा…’ हे गाणं सोडलं तर प्रीतमच्या संगीताचाही काही प्रभाव जाणवत नाही. हवेलीतल्या भुतामुळे नव्हे तर एकूणच चित्रपट पाहताना जाणवणाऱ्या या बौद्धिक दिवाळखोरीमुळे खरं तर अंगावर काटा येतो.
भूत बंगला दिग्दर्शक – प्रियदर्शन कलाकार – अक्षय कुमार, परेश रावल, असरानी, तब्बू, राजपाल यादव, वामिका गाबी, मिथिला पालकर, राजेश शर्मा.
