बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही कारणाने चर्चेत असतो. कधी त्याच्या चित्रपटांमुळे तर कधी बिनधास्त वक्तव्यांमुळे त्याच्या नावाची चर्चा होताना दिसते. आता अक्षय कुमारनं राजकारणात प्रवेश करण्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. लंडनच्या इंस्टीट्यूट ऑफ डायरेक्टर्समध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात अक्षय कुमारला भविष्यात राजकारणात प्रवेश करण्याविषयी प्रश्न विचारण्यात आला होता आणि यावर प्रतिक्रिया देत अक्षयनं त्याचं मत मांडलं आहे.

अक्षय कुमारला नुकतंच एका कार्यक्रमात ‘भविष्यात राजकारणात सक्रिय होण्याचा काही विचार आहे का?’ असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलाताना अक्षय कुमारनं, “समाजासाठी जे गरजेचं आहे त्यासाठी माझ्याकडून मी शक्य ते सर्व प्रयत्न करेन. पण मी चित्रपटात काम करतोय आणि या ठिकाणी खूप खूश आहे. एक अभिनेता म्हणून मी समाजातील प्रश्न किंवा समस्या सोडवण्याचा प्रयत्न नक्कीच करेन.” असं उत्तर दिलं.

न्यूज एजन्सी पीटीआयनुसार, या प्रश्नाचं सविस्तर उत्तर देताना अक्षय कुमार म्हणाला, “सध्या मी चित्रपटांमध्ये काम करतोय आणि मी यातच आनंदी आहे. माझ्या चित्रपटातून सामाजिक विषयांवर आणि समस्यांवर आवाज उठवण्याचा मी पूर्ण प्रयत्न करतोय. मी जवळपास १५० चित्रपटांची निर्मिती केली आहे आणि यात ‘रक्षाबंधन’ हा चित्रपट माझ्यासाठी खूप खास आहे. मी व्यावसायिक चित्रपटांची निर्मिती करतो पण त्यासोबतच सामाजिक मुद्द्यांवर चित्रपट निर्मिती करण्यावरही माझा भर असतो.”

आणखी वाचा-भन्नाट! ‘वाय’चा विशेष शो आयोजित करून मुलीचा नामकरण विधी, नाव ठेवलं…

दरम्यान राजकारणाशी संबंधित प्रश्नावर उत्तर देण्याची अक्षय कुमारची ही पहिलीच वेळ नाही. याआधी २०१९ मध्ये दिल्लीतील एका कार्यक्रमात त्याला राजकारणाशी संबंधित प्रश्न विचारण्यात आला होता. ज्यावर त्यानं राजकारणात येण्याचा विचार अजिबात केलेला नाही असं उत्तर दिलं होतं. तो म्हणाला होता, “मी बॉलिवूडमध्ये आनंदी आहे, चित्रपटात काम करणं मला आवडतं. यातूनच मी माझ्या देशाच्या विकासात योगदान देत आहे. हेच माझं काम आहे.”