“तुला एवढं चांगल मराठी कसं येतं?”, थुकरटवाडीतील विनोदवीरांना अक्षय कुमारने सांगितलं सिक्रेट

अक्षय कुमारने त्याला उत्तम मराठी कशी येते? याबद्दलचे एक गुपित सांगितल्याचे पाहायला मिळत आहे.

‘कसे आहात मंडळी, हसनाय ना, हसायलाच पाहिजे’ असं म्हणत गेल्या अनेक वर्षांपासून झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या लोकप्रिय कार्यक्रमात अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी, मराठी चित्रपट, नाटक क्षेत्रासह राजकारणातील दिग्गज मंडळी येत असतात. ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमात येत्या भागात बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार हजेरी लावणार आहे. त्याच्या आगामी ‘सूर्यवंशी’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तो या शोमध्ये येणार आहे. नुकतंच या भागाचा प्रोमो समोर आला आहे. यावेळी अक्षय कुमारने त्याला उत्तम मराठी कशी येते? याबद्दलचे एक गुपित सांगितल्याचे पाहायला मिळत आहे.

‘झी मराठी’ने त्यांच्या युट्यूब चॅनलवर या भागाच्या चित्रिकरणाचे दोन व्हिडीओ पोस्ट केले आहेत. या कार्यक्रमात अक्षय कुमार, रोहित शेट्टी आणि जॅकी श्रॉफ यांनी हजेरी लावल्याचे पाहायला मिळत आहे. यातील एका व्हिडीओत ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमातील विनोदवीर ‘सूर्यवंशी’ चित्रपटातील कलाकारांची नक्कल करताना दिसत आहे. यावेळी अक्षय कुमार, रणवीर सिंग, अजय देवगण, कतरिना कैफ यांची नक्कल हे कलाकार करताना दिसत आहे.

तर दुसऱ्या एका व्हिडीओत सूत्रसंचालक डॉ. निलेश साबळे हा सूर्यवंशीच्या संपूर्ण टीमसोबत गप्पा मारताना दिसत आहे. यावेळी अक्षय कुमार हा जॅकी श्रॉफ यांच्यासोबत मजा-मस्ती करताना दिसत आहे. यावेळी निलेश साबळेने अक्षय कुमारला चित्रपटासह खासगी आयुष्याबद्दल अनेक प्रश्न विचारले. त्या सर्व प्रश्नांची अक्षयने चक्क मराठीत उत्तर दिली. यावेळी निलेश साबळेंने अक्षयला “तुम्ही इतकं उत्तम मराठी कसं काय बोलता? म्हणजे तुम्ही व्यवहारातील सर्वच शब्द उत्तम मराठी शब्द कसे काय बोलता? याचे नेमकं कनेक्शन काय?” असे प्रश्न विचारले. यावर अक्षयने हसत हसत उत्तर दिले.

अक्षय म्हणाला, “खरंतर फार वर्षापूर्वी माझी महाराष्ट्रीयन गर्लफ्रेंड होती. मी तिच्या घरी जायचो. त्यामुळे मी शिकलो. तसेच जर तुम्हाला एखादी भाषा शिकायची असले तर हा सर्वात उत्तम मार्ग आहे,” असेही अक्षय गमतीत म्हणाला. दरम्यान येत्या १, २ आणि ३ नोव्हेंबरला हा भाग प्रदर्शित होणार आहे. त्यापूर्वी हा प्रोमो पाहून प्रेक्षक हा भाग पाहण्यास फार उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे.

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि कतरिन कैफ यांचा बहुचर्चित, बहुप्रतिक्षित ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. पण आता अखेर ५ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Akshay kumar reveals how he learn marathi language so well during chala hawa yeu dya program nrp