गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान, अभिनेता अक्षय कुमार आणि दाक्षिणात्य अभिनेता धनुषचा ‘अतरंगी रे’ हा चित्रपटाच्या चर्चा सुरू होत्या. अखेरीस हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. ‘अतरंगी रे’ हा चित्रपट त्याच्या नावावर खरा उतरला असं म्हणायला हरकत नाही. या चित्रपटाची कथा ही त्याच्या नावाप्रमाणेच ‘अतरंगी’ आहे. चित्रपटात साराने रिंकु सुर्यवंशी, धनुषने विषु आणि अक्षयने सज्जाद अली खान ही भूमिका साकारली आहे. रिंकु बिहारमधल्या एका नावाजलेल्या कुटुंबातील मुलगी आहे. या चित्रपटात रिंकुचं कुटुंब नवरदेवाचं अपहरण करुन तिचं जबरदस्तीने लग्न लावून देतात.

चित्रपटाची सुरुवात ही रिंकु घरातून पळून जाण्यापासून होते. त्याचवेळी विषु हा रिंकुला स्टेशनवर बघतो. त्या मुलीला आपल्या मदतीची गरज आहे असं विषु त्याच्या मित्राला सांगतो पण त्याचा मित्र त्याला रिंकुला मदत करण्यास नकार देतो. इथं चुकामुक होते तरी नंतर रिंकु आणि विषु एकमेकांच्या आयुष्यात येतात आणि त्याला कारण ठरतं रिंकुचं कुटुंब. होतं असं की, रिंकुचं कुटुंब ज्या मुलाचे अपहरण करतात तो मुलगा विषुच असतो. त्याचं जबरदस्तीने रिंकुसोबत लग्न लावून दिलं जातं. त्यांच्या लग्नाचा व्हिडीओही काढला जातो.

banned films because of bold scenes
बोल्ड कंटेंटमुळे प्रदर्शनावर घालण्यात आली बंदी, ‘हे’ चित्रपट ओटीटीवर आहेत उपलब्ध, वाचा यादी
Manoj Bajpayee father auditioned at FTII
NSD मध्ये रिजेक्ट झालेल्या अभिनेत्याच्या वडिलांनी FTII मध्ये दिली होती ऑडिशन, धर्मेंद्र अन् मनोज कुमार होते उपस्थित, वाचा किस्सा
nilesh sable recalls meeting raj thackeray
निलेश साबळेने सांगितला राज ठाकरेंच्या घरी घडलेला ‘तो’ किस्सा; म्हणाला, “माझ्या कोणत्याही मिमिक्रीवर…”
Sanjay Mone Sukanya Mone kulkarni Why don't work together
संजय मोने-सुकन्या मोने का करत नाहीत एकत्र काम? जाणून घ्या…

लग्नानंतर विषु रिंकुला त्याच्या साखरपुड्याला घेऊन जातो. इथे सुरु होतो खरा ड्रामा. रिंकु आणि विषुच्या लग्नाचा व्हिडीओ त्याची प्रेयसी पाहते आणि त्यांच्यात वाद होतात. यावेळी रिंकुचा होत असलेला अपमान पाहुन विषु संतापतो. संतापून तो “काहीही झालं तरी ती माझी पत्नी आहे,” असं सांगतो. विषु साखरपुडा मोडतो आणि रिंकुला घेऊन निघून जातो.

हॉस्टेलला पोहोचल्यावर विषु रिंकुला तामिळ भाषेत आपल्या प्रेमाची कबुली देतो. विषुचे हावभाव पाहून रिंकुला याची कल्पना येते. पण, तेव्हाच तिचा प्रियकर सज्जाद तिथे येतो. आता रिंकुच्या आयुष्यात कोणता मुलगा येणार? याचा उलगडा पुढील कथानकामध्ये करण्यात आलाय आणि त्यातच खरी मज्जा आहे. चित्रपटाची कथा ही गुंतागुंतीची असली तरी त्याची मांडणी अगदी सुटसुटीत आणि सोप्या पद्धतीने करण्यात आल्याने चित्रपट एन्जॉय करता येतो. या चित्रपटाची कथा ही PTSD म्हणजेच Post Traumatic Stress Disorder या आजाराच्या अवतीभवती फिरते.

हा चित्रपट नावाप्रमाणेच अतरंगी आहे हे कथानकामध्ये येणाऱ्या ट्विस्टवरुनच समजतं. आता असं असं होईल असं वाटत असतानाच अचानक काहीतरी भलतंच घडतं. त्यामुळेच अगदी शेवटच्या दृष्यापर्यंत प्रेक्षक खुर्चीला खिळून राहतो. चित्रपटातील साराचा डान्स, तिच्यात आणि धनुषमध्ये असलेली केमिस्ट्री ही प्रेक्षकांच्या पसंतीस नक्कीच उतरणार. तर अक्षयची भूमिका ही थोडी फार त्याच्या ‘ओ माय गॉड’ या चित्रपटातील कृष्णाच्या भूमिकेसारखी वाटते. अक्षयचे काही डायलॉग ऐकल्यानंतर ‘ओ माय गॉड’ची आठवण नक्कीच येते.

चित्रपटात आशिष वर्मा हा विषुच्या मित्राची भूमिका साकारत आहे. आशिष वर्माचा अचूक टायमिंग प्रेक्षकांना नक्कीच आवडेल यात शंका नाही. त्याची ही भूमिका पाहिल्यानंतर ‘हसीन दिलरूबा’ या चित्रपटातील त्याची अफजरची भूमिका नक्की आठवते. तरी देखील कुठेतरी आशिषच्या सेन्स ऑफ ह्युमरचा पुरेपुर वापर करण्यात आला नाही असं अनेक दृष्यांमध्ये प्राकर्षाने जाणवतं.

या चित्रपटात असलेल्या चांगल्या गोष्टी म्हणजे, एका वेगळ्या पद्धतीत दाखवण्यातं आलेलेली लव्ह ट्रँगल असणारी कथा. प्रेमाची परिभाषा बदलणारा हा चित्रपट आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. त्यात भर म्हणजे भारतीय संगीत सृष्टीतील सर्वोत्कृष्ट संगीतकार ए. आर. रेहमानने संगीत दिलेली गाणी. चित्रपटात गाणी बरीच असली तरी त्या गाण्यांच्या प्रेमात प्रेक्षक नक्कीच पडतील.

चित्रपटाचे दिग्दर्शन हे आनंद एल. राय यांनी केले आहे. राय यांनी ही गुंतागुंतीची कथा अत्यंत सोप्या पद्धतीने सगळ्यांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ते नेहमीच कॉमेडी आणि ड्रामाला वेगळं ठेवताना दिसतात. पण या चित्रपटात या दोघी गोष्टी एकत्र आल्याचे पाहायला मिळते. हा मेळही राय यांनी छान साधलाय. हा चित्रपट बॉलिवूडमध्ये नेहमी दाखवण्यात आलेल्या लव्ह ट्रँगलपेक्षा वेगळा आहे.

हाहा चित्रपट डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर २४ डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे. चित्रपट १३८ मिनिटांचा म्हणजेच सव्वा दोन तासांचा आहे. चित्रपटाची गाणी हा नक्कीच प्लस पॉइण्ट आहे.

लोकसत्ता ऑनलाइनकडून ‘अतरंगी रे’ ला चार स्टार