यशचा बहुप्रतिक्षित ‘टॉक्सिक’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. ५०० कोटींचे बजेट असलेल्या टॉक्सिकने फक्त ३०० कोटी रुपयांची कमाई केली आहे. ‘टॉक्सिक’च्या निराशाजनक कामगिरीनंतर, चित्रपटाच्या निर्मिती प्रक्रियेत यशचेच पूर्ण नियंत्रण होते आणि गीतू मोहनदास फक्त नावापुरतीच दिग्दर्शक होत्या, अशा चर्चा सोशल मीडियावर रंगू लागल्या. या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या अक्षय ओबेरॉयने आता या अफवांवर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच यश आणि गीतू मोहनदास यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव शेअर केला आहे.

‘कडक’ पॉडकास्टमध्ये अक्षय ओबेरॉयने चित्रपटाचं अपयश पचवणं खूप कठीण असल्याचं म्हटलंय. “चित्रपट चालला असता तर परिस्थिती वेगळी असती. फक्त चांगले चित्रपटच चालतात असं नाहीये, तर बरेचदा वाईट चित्रपटही चांगली कमाई करतात,” असं अक्षय ओबेरॉय म्हणाला.

चित्रपटाचा अक्षय ओबेरॉयला अभिमान

“मी या चित्रपटाचे प्रत्येक तपशील माहीत आहेत. चित्रपट, स्क्रिप्ट आणि पात्रांबद्दल कोणत्या स्तरावर चर्चा झाली होती याची मला कल्पना आहे. आम्ही या प्रोजेक्टसाठी आमचे सर्वस्व दिले होते. पण प्रेक्षकांना तो का आवडला नाही, हे मला माहीत नाही. हा चित्रपट चालला नाही हे दुर्दैवी आहे, तरीही मला या चित्रपटाचा अभिमान आहे. आम्ही प्रेक्षकांना काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न केला. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याचं शूटिंग केलं. पण कुठेतरी आम्ही आमच्या लक्ष्यापासून भरकटलो,” असं अक्षय ओबेरॉयने नमूद केलं.

चित्रपट गीतूने दिग्दर्शित केलाय – अक्षय ओबेरॉय

नयनतारा, तारा सुतारिया, कियारा अडवाणी, गीतू मोहनदास सर्वांनी प्रचंड मेहनत घेतली, असं अक्षयने सांगितलं. यशच्या हस्तक्षेपाच्या चर्चांबद्दल अक्षय ओबेरॉय म्हणाला, “मी सेटवर असं काहीही पाहिलं नाही. ज्यांनी तिकिटे काढून चित्रपट पाहिला आहे, त्यांना त्यांचे मत मांडण्याचा आणि चित्रपटाबद्दल बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे. मी सेटवर होतो आणि मला माहीत आहे की चित्रपट फक्त गीतूने दिग्दर्शित केलाय,” असं अक्षयने स्पष्ट केलं.

यशचा फक्त स्वतःवर विश्वास आहे – अक्षय ओबेरॉय

“यश एक वेगळाच माणूस आहे. एक व्यक्ती म्हणून त्याचं वर्णन कसं करावे हेच मला समजत नाही. मी आधीपासूनच यशचा चाहता होतो. त्याचा ऑरा खूप वेगळा आहे. त्याच्याबरोबर काम करताना मी त्याच्यापासून खूप प्रभावित झालो. तो ‘वन-मॅन शो’ आहे. त्याने स्वबळावर एका कन्नड चित्रपटाला ‘पॅन-इंडिया’ स्तरावर पोहोचवलं. ‘टॉक्सिक’च्या माध्यमातून त्याला कन्नड सिनेमाला आंतरराष्ट्रीय स्तरावर न्यायचं होतं. त्यात यश आलं नाही, पण किमान त्याने प्रयत्न तरी केला. त्याची स्वप्ने खूप मोठी होती,” असं अक्षय ओबेरॉयने सांगितलं.

“यश कोणाचीही वाट पाहत बसत नाही. माझ्यासारखे काम शोधणारे कलाकार निर्माते आणि दिग्दर्शकांना फोन करून काम मागतात. पण त्याचा फक्त स्वतःवर विश्वास आहे. केजीएफ आणि टॉक्सिकच्या माध्यमातून त्याने स्वतःची ही ओळख निर्माण केली आहे,” असं अक्षय ओबेरॉयने नमूद केलं.

यशचा माझ्यावर खूप प्रभाव पडला- अक्षय ओबेरॉय

अक्षय म्हणाला, “मी माझ्या ध्येयांबद्दल त्याच्याकडून बरंच काही शिकलो. तसेच चित्रपटसृष्टी, व्यवसाय आणि चित्रपट निर्मितीबद्दलही खूप शिकायला मिळालं. मला त्याच्याकडून खूप प्रेरणा मिळाली. मोठा स्टार होणं हे फक्त नशिबावर अवलंबून नसून तुम्ही स्वतःचा मार्ग स्वतः तयार करू शकता. मला त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून पुढे जायचे आहे.”

“यश आणि माझी मैत्री शूटिंग संपल्यानंतर पोस्ट-प्रॉडक्शनमध्ये घट्ट झाली. आम्ही चित्रपटाच्या हिंदी डायलॉग्जबद्दल चर्चा करत होतो. बिझनेस व व्हीएफएक्सबद्दल बोलायचो. त्याने मला चित्रपटाच्या सगळ्या प्रक्रियेत सहभागी करून घेतलं आणि बऱ्याच गोष्टी शिकवल्या. पोस्ट-प्रॉडक्शनमध्ये कलाकारांना सामील केलं जात नाही, असा माझा अनुभव राहिलाय, पण या चित्रपटातील बऱ्याच कलाकारांचं मी डबिंग केलंय, जे एआयच्या मदतीने नंतर बदलण्यात आलं,” असं अक्षय ओबेरॉयने नमूद केलं.