‘मेरी कोम’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून मेरीची भूमिका करणाऱ्या प्रियांकाबद्दलच सगळीकडे चर्चा सुरू आहे. चित्रपटावर प्रियांकाचाच जास्त प्रभाव आहे. दिग्दर्शक ओमंग कुमारचा हा पहिलाच चित्रपट असल्याने प्रियांकाने आपल्याला हवे तसे चित्रिकरण करून घेतले आहे. त्यामुळे निर्माता संजय लीला भन्साळी आणि ओमंग कुमार यांच्यात वादाची ठिणगी पडल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, ‘मेरी कोम’ चित्रपटावरून आमच्यात कोणताही वाद झालेला नाही, असे ओमंग कुमार यांनी स्पष्ट केले आहे.
हिंदी चित्रपटासाठी गेली अनेक वर्ष सेट डिझाइनिंग करणाऱ्या ओमंग कुमार यांनी ‘मेरी कोम’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले आहे. त्यांनी संजय लीला भन्साळीबरोबर ‘सावरिया’ चित्रपटासाठी सेट डिझाइनिंग केले होते. त्यामुळे भन्साळींबरोबर कित्येक वर्षांची आपली मैत्री असल्याचे त्यांनी सांगितले. गेले तीन वर्ष ‘मेरी कोम’ चित्रपटाच्या पटकथेवर काम सुरू होते. ओमंग यांना लहानपणापासून अभिनयाचे वेड होते. मात्र, टीव्हीवरचा रिअॅलिटी शो सोडला तर अभिनेता म्हणून त्यांना आपली चुणूक दाखवता आली नव्हती. त्याचदरम्यान, हिंदी चित्रपटांसाठी सेट डिझाइनिंगचे काम त्यांनी सुरू केले आणि त्यात चांगलाच जम बसला. सेटवर काम करताना दिग्दर्शनाचे धडेही गिरवून झाले. त्यामुळे एक दिग्दर्शक म्हणून चांगला चित्रपट करावा, या ध्यासातून ‘मेरी कोम’ चित्रपटाची सुरुवात झाल्याचे ओमंग कुमार यांनी सांगितले.
भन्साळींकडे गप्पा मारता मारता ‘मेरी कोम’ चित्रपटाचा विषय निघाला होता. तेव्हाच तो त्यांच्या शैलीचा चित्रपट नाही, असे आपण त्यांना सांगितले होते. मात्र, त्यांना कथा आवडली आणि त्यांनी चित्रपट निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. आत्ताही चित्रपटाला मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल ते आनंदी आहेत आणि सध्या चित्रपटाची प्रसिध्दी कशी करावी, यासंबंधी चर्चा सुरू असल्याचेही कुमार यांनी स्पष्ट केले. भन्साळी यांनी प्रियांका चोप्राच्या वाढदिवसानिमित्त पार्टी आयोजित केली होती. मात्र, ओमंग कुमार यांना पार्टीत बोलवले नव्हते. ती खास प्रियांकासाठी त्यांनी आयोजित केलेली वैयक्तिक पार्टी होती ज्यात तिच्या नातेवाईकांनाच आमंत्रित करण्यात आले होते. यावरून माझ्यात आणि त्यांच्यात वाद निर्माण होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे कुमार यांनी सांगितले.
‘मेरी कोम’ सुरू करताना मेरीविषयी खरेच कुठली माहिती नव्हती. पण, पटकथा लिहिण्यापूर्वी मणिपूरमध्ये जाऊन तिची भेट घेतली, तिची कथा समजून घेतली. तेव्हाच तिचा संघर्ष किती मोठा आहे, याची जाणीव झाली. तिच्या निमित्ताने ईशान्येकडील राज्य, तिथली सामाजिक स्थिती, राजकारण्यांकडून झालेली उपेक्षा यावरही चित्रपटातून मांडणी झाली असल्याचे त्यांनी सांगितले.