सतत काहीतरी वेगवान, परीकथेत शोभून दिसतील अशी पात्रं आणि वास्तवाशी काहीही ताळमेळ न खाणाऱ्या त्यांच्या स्वप्नवत वाटाव्यात अशा जगण्याच्या गोष्टी पाहण्याची सवय झालेल्या आपल्या मनाला कृत्रिमतेचा लवलेशही नसलेली कलाकृती म्हणजे काय याची प्रचीती पायल कपाडिया दिग्दर्शित ‘ऑल वुई इमॅजिन अॅज लाइट’ हा चित्रपट देतो. लेखन, दिग्दर्शकीय मांडणी, कलाकारांचा अभिनय, अगदी त्यांची वेशभूषा-रंगभूषा अशा कुठल्याच बाबतीत कोणत्याही प्रकारच्या कृत्रिमतेचा आधार न घेता पडद्यावर दिसणाऱ्या पात्रांच्या भावविश्वात पाहणारा नकळत गुंतून जाईल, इतका देखणा अनुभव हा चित्रपट देतो.

एकाच रुग्णालयात काम करणाऱ्या प्रभा, अनू आणि पार्वती या तिघींची गोष्ट या चित्रपटात आहे. प्रभा आणि अनू परिचारिका म्हणून काम करतात. तर पार्वती मदतनीस म्हणून काम करते. अनू प्रभाबरोबर तिच्या घरी राहते आहे. प्रभाचा नवरा लग्नानंतर तिला सोडून जर्मनीत गेला, त्यानंतर त्याने तिच्याशी कधीच संपर्क केला नाही. त्यामुळे एकीकडे प्रभा एकटी पडली असली तरी आपण अजूनही लग्नबंधनात आहोत हा विचार तिच्या मनातून जात नाही. प्रभा तशी सरळसाधी, काहीशी अबोल आहे. तर त्याच्या उलट अनू प्रचंड बोलघेवडी आणि सहज इतरांमध्ये मिसळून जाणारी आहे. अनू एका मुस्लीम तरुणाच्या प्रेमात पडली आहे. घरचे आंतरधर्मीय लग्नाला कधीच तयार होणार नाहीत हे जाणून असलेल्या अनूच्या मनाचीही कुतरओढ सुरू आहे. पार्वतीला बिल्डरने फसवून तिचं घर ताब्यात घेतलं आहे. तिचं राहतं घर एकेकाळी मिलमध्ये काम करणाऱ्या नवऱ्याला लॉटरीमध्ये मिळालं होतं, पण तिच्याकडे यासंदर्भातली कुठलीच कागदपत्रं नसल्याने तिला बेघर व्हावं लागणार आहे. पार्वतीला मदत करण्यासाठी प्रभा हरतऱ्हेने प्रयत्न करते आहे. अशा तीन वेगवेगळ्या टोकाच्या या स्त्रिया… एकत्र काम करता करता त्यांच्यात एक वेगळाच जिव्हाळ्याचा बंध तयार झाला आहे. प्रभा तिचं मन पार्वतीपाशी मोकळं करते, इतरवेळी प्रभाशी मनमोकळेपणाने बोलणारी अनू प्रियकराबाबत मात्र तिला सांगू धजत नाही. या तिघींचं रोजचं जगणं, लोकलमधून घरी येणं, अनूचं हळूच सगळ्यात आधी बाहेर पडून प्रियकराला भेटणं, त्यांचं मुंबईत फिरणं अशा दैनंदिन आयुष्यातील घडामोडी जशाच्या तशा दाखवत दिग्दर्शक पायल यांनी त्यांची गोष्ट रंगवली आहे. तिघींचं आयुष्य एकमेकांशी जोडलं गेलं आहे. मात्र, प्रत्येकीच्या आयुष्यातला गुंता एका वळणावर येऊन वेगवेगळ्या पद्धतीने सुटतो किंवा तो सोडवण्याची त्यांची तयारी होते. तिथपर्यंतचा त्यांचा प्रवास हा चित्रपटातूनच अनुभवावा असा आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Raj Thackeray on Maharashtra Election 2024
Raj Thackeray : निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

हेही वाचा >>>कोल्हापूरच्या मराठमोळ्या सरिताच्या प्रेमात पडलेला आर माधवन! सांगितलं २५ वर्षांच्या वैवाहिक आयुष्याचं गुपित, म्हणाला…

‘ऑल वुई इमॅजिन अॅज लाइट’ सारख्या चित्रपटांना अनेकदा आपण कलात्मक चित्रपटाचं लेबल डकवून सोडून देतो. मात्र, हा चित्रपट सर्वार्थाने वेगळा अनुभव आहे. एरव्हीच्या चकचकीतपणाचा अंशही या चित्रपटात नाही, की अमुक एका कोनातून कॅमेरा लावल्यावर वेगळंच काहीतरी दृश्य चित्रित झालं आहे हाही सोस नाही. आणि तरीही पडद्यावर दिसणाऱ्या या तिघींच्या भावविश्वात आपण गुंतून जातो. त्याचं महत्त्वाचं कारण वर उल्लेख केला तसं त्याच्या अकृत्रिमपणात दडलेलं आहे. आज आता माझ्यासमोर घडणारी घटना कॅमेऱ्यातून पाहिल्यावर कशी दिसेल तितकी सहजता त्या चित्रणात आहे. आणि तरीही पडद्यावर जे दिसतं आहे त्यापेक्षाही त्यामागचं अव्यक्त असं बरंच काही आपण अनुभवत राहतो. लोकलची धडधड, रुग्णालयात काम करता करता एकमेकांशी त्यांचा सुरू असलेला संवाद पाहताना आजूबाजूचे रुग्ण, डॉक्टर – परिचारिकांची ये-जा, पेशंटची तपासणी अगदी छोटो-मोठे बारकावे आपल्याला दिसतात. आपल्याला रुग्णालयातला एक शांत कोलाहलही ऐकू येतो. प्रभा आणि अनूचा खोलीतला वावर, समोरच्या खिडकीतली स्वयंपाकघरातली लगबग अशा कैक गोष्टी आपण पाहतो. असे दिसूनही न दिसणारे, आजूबाजूला घडणारे क्षण आपणही रोजच्या रोज टिपत असतो. त्यामुळे आपल्याही नकळत आपण त्यांच्या गोष्टीचा भाग होतो. माणसं जशी आहेत, तशीच ती पडद्यावरही दिसतात.

वास्तव छायाचित्रणशैलीबरोबरच संपूर्ण चित्रपटाला असलेली एक लयही आपल्याला त्याच्याशी जोडून ठेवते. ही लय चित्रणात आहेच, शिवाय विचारपूर्वक केलेल्या पार्श्वसंगीताच्या वापरातही ती लय आहे. क्वचित रेंगाळणं, आहे तो क्षण अनुभवणं, वातावरणातले आवाज या सगळ्याचं एक सुरेख म्हणण्यापेक्षाही सुरेल असं मिश्रण जमून आलं आहे, ज्याचा परिणाम निश्चितच दृश्यानुभवाचा दर्जा वाढवतो. त्याला तितक्याच ताकदीच्या कलाकारांच्या सहजअभिनयाची उत्तम जोड मिळाली आहे. कनी कुसरुति, दिव्या प्रभा आणि छाया कदम या तिघींनीही चित्रपटात जीव ओतला आहे. या तिघींमध्ये कनीने साकारलेली प्रभा मनाचा ठाव घेते. नेहमीची परिचित चित्रणशैली, दिग्दर्शकीय मांडणी, वेगवान कथाप्रवाह, चकचकीत रंगरंगोटी केलेले चेहरे आणि सजवलेला भवताल या सगळ्यापलीकडे जाणारा एका वेगळ्याच शैलीतील चित्रपट म्हणून ‘ऑल वुई इमॅजिन अॅज लाइट’ निश्चितच अनुभवायला हवा.

ऑल वुई इमॅजिन अॅज लाईट

दिग्दर्शक : पायल कपाडिया कलाकार : कनी कुसरुति, दिव्या प्रभा आणि छाया कदम.

Story img Loader