गेल्या काही वर्षांत स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांत उल्लेखनीय वाढ झाली आहे. एका आंतरराष्ट्रीय अहवालानुसार आज जगात असा एकही देश नाही ज्या ठिकाणी स्त्रिया शंभर टक्के सुरक्षित आहेत. परंतु आजवर प्रामुख्याने पुरुषी अत्याचाराला बळी पडणाऱ्या स्त्रियांना आता महिलांच्याच अत्याचाराला सामोरे जावे लागत आहे. स्त्रियांचे शारीरिक व मानसिक शोषण करणारी एक टोळी अमेरिकेत पकडली गेली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या टोळीत बहुतांशी महिलाच आहेत. आणि या टोळीचे प्रतिनिधित्व लोकप्रिय अभिनेत्री एलिसन मॅक करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तिला मानवी तस्करीच्या आरोपाखाली अटक केली असून सध्या ती पोलीस कोठडीत आहे.

गेल्या महिन्यात ‘फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन’ने सापळा रचून केथ रेनाइनर नामक एका अट्टल गुन्हेगाराला पकडले होते. मॅक्सिकोमध्ये पकडला गेलेला हा गुन्हेगार लहान मुली व अमली पदार्थाची तस्करी करत असे. अनेक वर्षे ओळख बदलून राहणाऱ्या केथचा बिनबोभाट कारभार संपूर्ण अमेरिकेत सुरू होता. आपल्या कबुलीजबाबात त्याने अभिनेत्री एलिसन मॅकचे नाव घेतले. गेली दहा वर्षे ती त्याची साहाय्यक म्हणून काम करत होती. समाजसेवकाचा मुखवटा घालून मिरवणाऱ्या केथ रेनाइनरने स्त्रियांवर व लहान मुलांवर होणारे अत्याचार थांबवण्यासाठी एका स्वयंसेवी संस्थेची निर्मिती केली. पण प्रत्यक्षात मात्र त्यांचे मनसुबे काही वेगळेच होते. मदत मिळवण्यासाठी आलेल्या गरजूंना ते आपल्या जाळ्यात ओढायचे. त्यांना अमली पदार्थाचे व्यसन लावायचे. पुढे त्यांचा वापर देहविक्रीसाठी केला जात असे. जर कोणी विरोध केला तर त्याला शारीरिक व मानसिक त्रास दिला जात असे. एलिसन मॅक या संस्थेची कार्यकारी प्रतिनीधी आहे. केथने दिलेल्या जबानीनुसार ती चित्रपटात काम करण्यासाठी आलेल्या नवीन तरुणींना हेरत असे. त्यांना चित्रपटात काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांचा वापर देहविक्रीसाठी करत असे. दरम्यान त्यांचे अश्लील व्हिडीओ तयार केले जायचे. आणि विरोध करणाऱ्या मुलींना त्यामार्फत ब्लॅकमेल केले जात असे.

एलिसन मॅक सध्या पोलीस कोठडीत आहे. तिच्या वकिलांनी जामिनासाठी केलेला अर्ज न्यायाधीश चेरी पोलाक यांनी फेटाळून लावला व तिच्या विरोधात आणखीन ठोस पुरावे गोळा करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. एफबीआयने ही केस पोलिसांकडे न सोपवता त्यांच्याचकडे राहावी अशी विनंती न्यायालयाला केली आहे. कारण त्यांना या प्रकरणात पोलीस प्रशासनातील अधिकारी सामील असल्याचा संशय आहे. काही वर्षांपूर्वी एका अज्ञात अभिनेत्रीने एफबीआयशी संपर्क साधून या स्वयंसेवी संस्थेविरोधात आपला संशय व्यक्त केला होता. तेव्हापासून ते या टोळीच्या मागावर होते. दरम्यान त्यांनी एक एक करत अनेक गुन्हेगारांना आपल्या जाळ्यात पकडले.

एलिसन मॅकचे वकील सीन बुकल यांनी मात्र एक पत्रकार परिषद घेउन तिच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांच्या मते केवळ तिला बदनाम करण्याच्या उद्देशाने तिच्यावर हे आरोप लावण्यात आले आहेत. एलिसनविरोधात एकही सबळ पुरावा एफबीआयकडे नाही. त्यामुळे लवकरात लवकर तिची या प्रकरणातून सुटका केली जाईल.