Devdatta Nage Pushpa 2 climax written in vanity van : मराठी मालिकाविश्वातून घराघरात पोहोचलेला अभिनेता देवदत्त नागे आज मनोरंजन विश्वातील लोकप्रिय कलाकार आहे. ‘जय मल्हार’ मालिकेतील मार्तंड खंडेरायाच्या भूमिकेने त्याला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. त्यानंतर त्याने हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही आपल्या दमदार अभिनयाची छाप उमटवली. ‘तानाजी’ या बॉलीवूड चित्रपटातून त्याने हिंदी सिनेविश्वामध्ये काम केले आहे. तसेच ‘रॉबिनहूड’ या दाक्षिणात्य चित्रपटामध्येही त्याने भूमिका साकारली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने दाक्षिणात्य चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा रंजक किस्सा सांगितला. ‘पुष्पा २’ चित्रपटातील क्लायमॅक्सचा महत्त्वाचा सीन चक्क त्याच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये बसून लिहिला गेला होता, असा खुलासा देवदत्त नागे याने केला आहे.

‘लोकशाही मराठी’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये देवदत्त नागे याने मनोरंजन विश्वातील अनुभव सांगितले आहेत. २०२५ साली प्रदर्शित झालेल्या ‘रॉबिनहूड’ या दाक्षिणात्य सिनेमामध्ये देवदत्त नागे याने खलनायकाची भूमिका साकारली होती. तेलुगू ॲक्शन-कॉमेडी चित्रपटाचे दिग्दर्शन वेंकी कुदुमुला यांनी केले होते. या चित्रपटाच्या अनुभवांबद्दल सांगताना देवदत्त नागे म्हणाला, “दाक्षिणात्य सिनेविश्वातील लोकांसह काम करण्याचा अनुभव खूप मस्त आहे. राम चरणच्या ‘पेड्डी’ या चित्रपटासाठीसुद्धा त्यांनी विचारलं होतं; पण मला ते पात्र एवढं भावत नव्हतं. श्रीलीलाला ‘मी माझा मित्र चांगला आहे’, हे एक मराठी वाक्य शिकवलं होतं. मराठीप्रमाणे दाक्षिणात्य सिनेविश्वातील लोकसुद्धा खूप छान आहेत. फक्त त्यांची भाषा वेगळी आहे.”

व्हॅनिटी व्हॅनमध्ये येऊन बसू का?

तो पुढे म्हणाला, ” ‘रॉबिनहूड’ चित्रपट करत असताना, आमच्या चित्रपटाचा चीफ असिस्टंट व लेखक प्रभाव याने मला ‘माझ्या व्हॅनिटीमध्ये येऊ का’ असे विचारले. ‘तुमच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये येऊन बसू का? कारण- मला काहीतरी लिहायचे आहे,’ असे प्रभावने विचारताच मी हो म्हणालो. पण त्याला विचारले की, ‘माझ्या व्हॅनिटीमध्ये का’ तर तो म्हणाला, ‘तुमच्या इथे खूप चांगली शांतता असते. अशा ठिकाणी बसून मी लिहू शकतो,’ असे त्याने सांगितले.”

देवदत्तच्या व्हॅनिटीमध्ये ‘पुष्पा २’चा क्लायमॅक्स लिहित होता

देवदत्त नागे पुढे म्हणाला की, तो लिहीत होता, मी बघत होतो. त्याने विचारले की, तुम्हाला माहीत आहे का मी हे काय लिहितोय, तर मी म्हणालो, नाही. काही आपल्याच चित्रपटाचे संवाद लिहीत आहेस का? त्यावर तो म्हणाला की, नाही, तर ‘पुष्पा २’चा क्लायमॅक्स लिहितो आहे, असे त्याने सांगितले. दाक्षिणात्य लोक सहज दुसऱ्यावर विश्वास ठेवतात आणि कारण- ही खूप महत्त्वाची गोष्ट असताना त्याने ती सहज मला सांगितली. त्याने माझ्यावर विश्वास दाखवीत माझ्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये ते लिहिलं.

देवदत्त नागे याने डेव्हिड वॉर्नरला लावला होता भंडारा

देवदत्त नागे याने ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नर याला भंडारा लावल्याचा किस्सा सांगितला. तो म्हणाला, “आम्ही मेलबर्नला शूट करत होतो. कुठेही असो मी सकाळी आवरलं की, आधी भंडारा लावतो. शूटिंगसाठी सेटवर गेलो, तर तिथे सगळे कॉफी पीत बसले होते. त्यावेळी तिथे डेव्हिड वॉर्नर होता. माझ्या कपाळावर भंडारा पाहून त्याने, ही हळद आहे का? (इज दिस टर्मरिक) असे विचारले होते. त्यावर नाही ही हळद नाही, तर हा भंडारा आहे, असे सांगितले होते. तेव्हा त्याच्याकडून ‘यळकोट यळकोट जय मल्हार’, असे म्हणून घेतले. तोडकं मोडकं का होईना; पण तोसुद्धा बोलला. खंडोरायांची ही कृपा की मेलबर्नमध्येसुद्धा तिकडचा माणूस ‘जय मल्हार’ म्हणू शकतो.”

घबाडकुंड चित्रपट प्रदर्शित

अभिनेता देवदत्त नागे याने देवयानी व ‘जय मल्हार या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. त्याच्या खंडेरायाच्या भूमिकेने त्याला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. त्यानंतर बॉलीवूडमधील ‘तानाजी’ व ‘आदिपुरुष’ या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. तसेच त्याने दाक्षिणात्य सिनेविश्वातील ‘रॉबिनहूड’ चित्रपटामध्ये भूमिका साकारली होती. आता नुकताच त्याचा ‘घबाडकुंड’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे.