Allu Sirish Temple Loudspeaker Complaint: दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार अल्लू अर्जुनचा भाऊ आणि अभिनेता अल्लू शिरीषची एक पोस्ट व्हायरल झाली आहे. हैदराबादमधील शेखपेट भागातील एका हनुमान मंदिरात रात्री उशिरापर्यंत वाजणाऱ्या मोठ्या आवाजातील गाण्यांमुळे त्रस्त होऊन त्याने थेट पोलिसांत तक्रार दाखल केली. सोशल मीडियावरून हैदराबाद पोलिसांचे लक्ष वेधत त्याने रात्री २ ते ३ वाजेपर्यंत चालणाऱ्या आवाजाच्या त्रासावर कारवाईची मागणी केली. मात्र, यामुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत नेटकऱ्यांनी त्याला मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले. त्यानंतर ट्रोल करणाऱ्यांनाही शिरीषने सणसणीत उत्तर दिलं.
अल्लू शिरीष शेखपेट येथील ‘अपर्णा वन’ इथे राहतो. त्याने पोस्टमध्ये म्हटलं की, विनोबा नगर येथील हनुमान मंदिरात परवानगी असलेल्या मर्यादेपेक्षा जास्त आवाजात गाणी वाजवली जात आहेत. त्याने लिहिलं, “हैदराबाद पोलीस, मी शेखपेट येथील अपर्णा वनमध्ये राहतो. गेल्या काही दिवसांपासून विनोबा नगर येथील हनुमान मंदिरात रात्री २-३ वाजेपर्यंत मर्यादेपेक्षा जास्त मोठ्या आवाजात गाणी वाजवली जात आहेत. मी याबद्दल फिल्म नगर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती.”
गणेश विसर्जनानंतरही वाजत आहेत गाणी – शिरीष
गणेश विसर्जन संपल्यानंतरही मोठ्या आवाजात गाणी वाजवली जातात, त्यामुळे कारवाई करण्यात यावी अशी विनंती त्याने केली. “२५ सप्टेंबरपर्यंत गणेश विसर्जन असल्यामुळे आम्हाला आवाज सहन करण्यास सांगण्यात आलं होतं. पण विसर्जन संपूनही गाणी वाजतच आहेत. आमच्या सोसायटीतील अनेक वृद्ध, लहान मुलं आणि नोकरदार लोक यामुळे त्रस्त आहेत. यापूर्वीही अनेक तक्रारी करण्यात आल्या, पण कोणतीही कारवाई झाली नाही. कृपया या प्रकरणात लक्ष द्यावे ही विनंती.. धन्यवाद,” असं अल्लू शिरीषने लिहिलं.
या पोस्टमध्ये अल्लू शिरीषने एक व्हिडीओही शेअर केला होता. व्हिडीओत मंदिरात मोठ्या प्रमाणात गाणी वाजत असल्याचं ऐकू येतं. शिरीषच्या तक्रारीची हैदराबाद शहर पोलिसांनी दखल घेतली. “सर, योग्य त्या कारवाईसाठी ही बाब आम्ही फिल्म नगर पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांना कळवली आहे,” अशी कमेंट त्यांनी केली.

शिरीषने सोशल मीडियावर तक्रार केल्यामुळे त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागला, तसेच लोकांनी त्याच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला. यावर त्याने स्पष्टीकरण देत आपणही हनुमान भक्त असल्याचं सांगितलं. त्याने लिहिलं, “मित्रांनो, मी स्वतः धार्मिक आहे आणि हनुमानाची पूजा करतो. पण रात्री २ वाजता डीजे लावून मोठ्या आवाजात गाणी वाजवणे ही भक्ती नाही. मी केलेली तक्रार ही सिव्हिक सेन्सबद्दल होती, भक्तीबद्दल नाही.”
