Vishakha Subhedar Son Stranded In Kuwait : अमेरिका आणि इस्रायल यांच्या इराणवरील संयुक्त हल्ल्यानंतर संघर्ष अधिक तीव्र झाला असून, अमेरिका आणि इस्रायलच्या भीषण हल्ल्यांना इराणकडूनही प्रत्युत्तर मिळत आहे. या युद्धाचा आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव आखाती देशांतील विमान उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. त्यामुळे अनेक भारतीय त्यात अडकले आहेत.

हल्ल्यांमुळे मध्यपूर्वेत तणाव वाढत आहे. त्यामुळे त्या भागात असलेल्या आपल्या कुटुंबीयांबद्दल अनेक जण काळजी व्यक्त करीत आहेत. सर्वसामान्य लोकांप्रमाणेच काही कलाकार आणि त्यांचे कुटुंबीयही अडकले आहेत. ईशा गुप्ता, सोनल चौहान व नर्गिस फाखरी यांनी या संदर्भात माहिती दिली होती. अशातच आता मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा मुलगा अभिनयसुद्धा कुवेतमध्ये अडकला आहे.

लंडनला जात असताना त्याचं विमान कुवेतमध्ये उतरवलं गेलं. मुलाला भारतात सुखरूप आणलं जावं यासाठी विशाखा यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदत मागितली आहे. मुलाच्या काळजीपोटी विशाखा यांना अश्रू अनावर झाले आहेत. त्यामुळे रडत रडत त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओद्वारे त्यांनी मदत मागितली आहे.

मुलाच्या मदतीसाठी विशाखा सुभेदार यांची सरकारला विनंती

सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये विशाखा यांनी म्हटलंय, “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माझी विनंती आहे. माझा मुलगा लंडनच्या प्रवासाला निघाला होता; पण त्याचं फ्लाइट कुवेतमध्ये उतरवण्यात आलं. सध्याच्या परिस्थितीमुळे तिथली विमानं रद्द झाली आहेत. त्यामुळे माझा मुलगा चार दिवसांपासून कुवेतमध्ये अडकला आहे. आता तिकडची परिस्थिती गंभीर होत चालली आहे हे आपण बातम्यांमधून पाहतोय. अनेक ड्रोन हल्लेसुद्धा होत आहेत. तो स्वत: तिथे हे अनुभवत आहे. आता तिथल्या एका हॉटेलमध्ये एअरलाईन्स सर्व्हिसकडून त्याची व्यवस्था केली गेली आहे. त्याला भारतात आणण्याचे प्रयत्न करावेत. जसं दुबईच्या लोकांना परत आणलं गेलं, तसं कुवेतमध्येसुद्धा भारतीय अकडले आहेत. त्यांना परत आणण्याची व्यवस्था करावी, अशी माझी कळकळीची विनंती आहे. अनेक मुलांच्या आई, घरचे कुटुंबीय त्यांच्या मायदेशी परतण्याची वाट पाहत आहेत. त्यांना लवकरात लवकर भारतात आणण्याची व्यवस्था करावी. आमच्या मुलांची काळजी घ्यावी. सरकार आणि भारताच्या पंतप्रधानांना विनंती करते की, सर्व भारतीय सुखरूप परतावेत यासाठी लवकरात लवकर मार्ग काढावा.”

विशाखा सुभेदार यांनी मुलाच्या मदतीसाठी शेअर केला व्हिडीओ

तसेच या व्हिडीओच्या कॅप्शनमध्येही त्यांनी, “कृपया मला मदत करावी. माझा मुलगा अभिनय कुवैतमध्ये अडकला आहे” असं म्हटलं असून भारत सरकार, नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, राज ठाकरे यांचा उल्लेख करत मदत मागितली आहे.