मागच्या बऱ्याच काळापासून अमेय वाघचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘झोंबिवली’ची सोशल मीडियावर चर्चा सुरू होती. आता लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. डोंबिवलीमध्ये अचानक आलेल्या झोंबी हल्ल्यानंतर काय घडतं याची थोडी थरारक थोडी विनोदी अशी कथा या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे.

काही दिवसांपूर्वी हॉरर-कॉमेडी ‘झोंबिवली’ या मराठी चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाले होते आणि त्या हटके पोस्टरमुळे सर्वत्र सिनेमाची चर्चा रंगली होती. पोस्टरमध्ये दाखवण्यात आलेले झोंबी आणि त्याविषयीची कथा याची उत्सुकता देखील वाढली होती. आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. डोंबिवलीमध्ये कशाप्रकारे झोंबींची एंट्री होते आणि मग हळूहळू बऱ्याच थरारक गोष्टी कशाप्रकारे घडत जातात हे या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे.

झोंबिवली या चित्रपटात अभिनेता ललित प्रभाकर, अमेय वाघ, अभिनेत्री वैदेही परशुरामी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केलं आहे. या चित्रपटाची कथा झोम्बी या संकल्पनेवर आधारित आहे. हॉलिवूड चित्रपटात पाहिलेले झोंबी खरंच डोंबिवलीत आल्यावर काय होतं हे या चित्रपटात विनोदी- थरारक अंदाजात दाखवण्यात आलं आहे. या ट्रेलरची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.

आत्तापर्यंत गेम्समध्ये, हॉलिवूड चित्रपटांमध्ये पाहिलेले झोंबीज मराठी चित्रपटातही पाहायला मिळणार आहेत. रोमँटिक, जॉली भूमिका केलेले मराठी चेहरे हॉरर भूमिकेत दिसणार आहेत. या पूर्वी हा चित्रपट ४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार होता. पण प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली असून आता हा चित्रपट फेब्रुवारीच्या आधीच म्हणजे २६ जानेवारीला रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Story img Loader