जोसेफ विजय यांनी आज सकाळी १० वाजता राहुल गांधींच्या प्रमुख उपस्थितीत तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यात अनेक दिग्गजांची उपस्थिती होती. त्याचप्रमाणे अभिनेत्री त्रिशाही या कार्यक्रमाला उपस्थित होती. मात्र या सोहळ्याला जोसेफ विजय यांचं कुटुंब उपस्थित नव्हतं. राज्यपाल विश्वनाथ आर्लेकर यांनी जोसेफ विजय यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. तसंच १३ मे पर्यंत विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश दिले. जोसेफ विजय यांनी घेतलेल्या शपथविधी सोहळ्यासाठी अनेक दिग्गज आले होते. तरीही त्यांचं कुटुंब या सोहळ्याला आलं नव्हतं. त्यावरुन आता विविध चर्चा होत आहेत.
जोसेफ विजय यांच्या घरातला कलह चव्हाट्यावर?
जोसेफ विजय यांच्या आयुष्यातला खूप मोठा क्षण आज होता. ते तमिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. मात्र या सोहळ्यासाठी त्यांची पत्नी संगीता आणि त्यांची दोन्ही मुलं आले नाहीत. विजय यांच्या कुटुंबाने स्वतःला या सोहळ्यापासून दूर ठेवल्याने आता विजय यांच्या व्यक्तिगत आयुष्यात पेच निर्माण झाल्याच्या चर्चा त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याच्या दिवशीच रंगल्या आहेत. विजय यांचं कुटुंब या सोहळ्यात सहभागी झालेलं नव्हतं. पण त्यांची गर्लफ्रेंड त्रिशा कृष्णन या सोहळ्यात उपस्थित होती. त्यामुळे आता आगामी काळात काय होणार हे पाहणंही महत्त्वाचं असेल.
विजय यांच्या कुटुंबाला भेटली त्रिशा कृष्णन
आज विजय यांचा शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर त्रिशा कृष्णनने विजय यांच्या कुटुंबाचीही भेट घेतली. दरम्यान विजय यांच्या पत्नी संगीता या भारताबाहेर असल्याने या सोहळ्याला आल्या नाहीत असंही सांगितलं जातं आहे. पण विजय यांच्या आयुष्यातील इतक्या महत्त्वाच्या दिवशी त्यांची अनुपस्थिती असल्याने दोघांमध्ये ऑल इज नॉट वेल आहे अशा चर्चांना उधाण आलं आहे.
सोशल मीडियावरच्या चर्चा नेमक्या काय आहेत?
विजय यांची पत्नी संगीता, त्यांचा मुलगा जेसन संजय आणि मुलगी दिव्या साशा असे तिघेही या सोहळ्यात कुठेही दिसले नाहीत. विजय आणि त्रिशा हे दोघंही एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा गेल्या काही काळापासून रंगल्या आहेत. तेव्हापासून विजय यांच्या पत्नीचं आणि मुलांचं त्यांच्याशी पटत नाही अशाही चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.

थलपती असं विजय यांना का म्हटलं जातं?
विजय यांच्या नावासमोर थलपती हे विशेषण लावलं जातं. थलपती हे नाव तामिळनाडूमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. सुपरस्टार रजनीकांत यांच्या थलपती या चित्रपटानंतर हे नाव अत्यंत गाजले. प्रसिद्ध झाले. तामिळ भाषेत थलपती याचा अर्थ सेनापती असा होतो. या नावाला अत्यंत आदर आहे. थलपती विजय हे आता खऱ्या अर्थाने तामिळनाडूचे सेनापती झाले आहेत. ते आता संवैधानिक पदावर विराजमान झाले आहेत. दरम्यान जोसेफ विजय असं त्यांचं नाव आहे. त्यांनी शपथही याचा नावाने घेतली आहे.
थलपती या विशेषणाच्या आधी कुठलं बिरुद वापरत असत विजय?
विजय यांचे वडील वडील आणि प्रसिद्ध दिग्दर्शक एसए चंद्रशेखर यांनी विजय यांचे नाव इलैया थलपती असं ठेवलं होतं. त्यांचे अनेक चित्रपट याच नावाने झाले. त्यांच्या काही मुलाखतीतही हेच नाव त्यांनी वापरलं होतं. अनेक वर्षे विजय याच नावाने ओळखले जात होते. पण जवळपास दहा वर्षांपूर्वी प्रसिद्ध दिग्दर्शक एटली यांनी २०१७ मध्ये त्यांचे नाव थलपती विजय असे केले.
मुख्यमंत्री होताच जोसेफ विजय यांनी कुठले तीन निर्णय घेतले?
२०० युनिट मोफत वीज: तमिळनाडूतील जनतेला मोठा दिलासा देत विजय यांनी राज्यातील प्रत्येक घरासाठी २०० युनिटपर्यंत मोफत वीज पुरवण्याची घोषणा केली आहे. सामान्यांच्या खिशाला कात्री लागू नये, हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
अंमली पदार्थ विरोधी ‘स्पेशल टास्क फोर्स’: राज्यातील तरुण पिढीला अमली पदार्थांच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी आणि ड्रग्स तस्करीचे कंबरडे मोडण्यासाठी एका विशेष कृती दलाचीस्थापना करण्याचा आदेश त्यांनी दिला आहे. ‘ड्रग-फ्री तमिळनाडू’ हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट असेल.
महिला सुरक्षेसाठी विशेष दल: राज्यातील महिलांची सुरक्षा अधिक कडक करण्यासाठी आणि त्यांच्यावरील अत्याचारांना आळा घालण्यासाठी आणखी एक स्पेशल टास्क फोर्स तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महिलांना निर्भयपणे वावरता यावे, यासाठी हे दल काम करेल. मी पहिल्या दिवसापासून कामाला सुरुवात करेन असंही विजय यांनी जाहीर केलं आहे. ज्यानंतर त्यांनी हे धडाकेबाज निर्णय जाहीर केले आहेत.

तमिळनाडूत टीव्हीकेच्या रुपाने नवा पर्याय
तामिळनाडूमधील डीएमके आणि एआयएडीएमके या दोन पक्षांचे वर्चस्व संपुष्टात आणू शकेल अशा पक्षाची गेल्या अनेक वर्षांपासून प्रतिक्षा होत होती. या दोन पक्षांचे वर्चस्व संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या अनेक मोठ्या-मोठ्या दिग्गजांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा धुळीस मिळाल्या. इतकेच नाही तर राष्ट्रीय पक्षांनाही ते आतापर्यंत शक्य झालेले नाही.
