माहितीचा स्त्रोत म्हणून पाहिला जाणारा छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो म्हणजे ‘कौन बनेगा करोडपती.’ बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन या शोचे सूत्रसंचालन करताना दिसतात. बऱ्याच वेळा ते हॉटसीटवर बसलेल्या स्पर्धकांशी गप्पा मारताना त्यांच्या जीवनातील किस्से सांगताना दिसतात. ‘कौन बनेगा करोडपती’च्या आगामी भागामध्ये बॉलिवूडचा भीडू अर्थात अभिनेता जॅकी श्रॉफ आणि सुनील शेट्टी हजेरी लावणार आहेत. त्यांना एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. दरम्यान शोमध्ये जॅकी श्रॉफ भावूक झाले आहेत.

सोनी वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर आगामी भागाचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये सुनील शेट्टीने जॅकी श्रॉफचा एक किस्सा सांगितला आहे. ‘दादाने एक चांगली गोष्ट सांगितली होती. जेव्हा एका खोलीत राहात होते तेव्हा आई खोकली तरी जॅकी श्रॉफ यांना आवज यायचा. पण जेव्हा एका मोठ्या घरात गेले तेव्हा आईचे निधन झालेले देखील त्यांना कळाले नाही’ असे सुनील शेट्टी म्हणाला.

आणखी वाचा : “भीडूचे जनक तुम्हीच”, टपोरी भाषेमागील कारण ऐकून अमिताभ यांना बसला धक्का

शोमध्ये आईच्या आठवणीत जॅकी श्रॉफ भावूक झाले. सुनील शेट्टीने जॅकी श्रॉफचे अश्रू पुसले. तसेच अमिताभ बच्चन यांच्या डोळ्यातही अश्रू आल्याचे पाहायला मिळाले. ‘आजकालच्या काळात असे मित्र फार कमी भेटतात’ असे बीग बी जॅकी श्रॉफ आणि सुनील शेट्टीला पाहून म्हणाले. ‘कौन बनेगा करोडपती’मधील हा प्रोमो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. हा भाग २४ सप्टेंबर रोजी प्रदर्शित करण्यात येणार आहे.