बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन सध्या छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो ‘कौन बनेगा करोडपती’चे सूत्रसंचालन करत आहेत. माहितीचा स्त्रोत म्हणून पाहिल्या जाणाऱ्या या शोच्या माध्यमातून अनेकांना अमिताभ यांना भेटण्याची संधी मिळत आहे. अमिताभ बच्चन या शो च्या माध्यमातून अनेक स्पर्धकांशी संवाद साधत असतात. त्यावेळी ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलचे अनेक किस्से शेअर करतात. ‘कौन बनेगा करोडपती’ या शो च्या एका भागात स्पर्धकाने अमिताभ यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही प्रश्न विचारले होते. यावेळी त्यांनी फार मजेशीररित्या उत्तर दिली.

नुकतंच सोनी टीव्हीने इन्स्टाग्रामवर केबीसीच्या पुढच्या भागाचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोत अमिताभ बच्चन यांच्यासमोर एक महिला बसल्याचे दिसत आहे. ओशिन पटवा असे या महिलेचे नाव असून ती सोशल मीडियावर फार प्रसिद्ध आहे. ओशिनने नुकतंच केबीसीच्या कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी तिने अमिताभ यांचे काही जुने फोटो त्यांना दाखवत काही प्रश्न विचारले.

ओशिन यांनी सुरुवातीला अमिताभ यांचा एका ट्रेंडी स्वेटशर्ट आणि सनग्लासेस परिधान केलेला एक फोटो दाखवला. त्यावेळी तिने तुम्ही हे कुठून विकत घेतले? असा प्रश्न विचारला. यावर अमिताभ बच्चन म्हणाले, “मी तुला हे अजिबात सांगणार नाही…”आणि सर्व प्रेक्षक हसायला लागले. त्यानंतर अमिताभ म्हणाले, “हा स्वेटशर्ट माझा मुलगा अभिषेक बच्चन याने मला वाढदिवसाची भेट म्हणून दिला आहे. तर हे सनग्लासेस माझी नात आराध्या हिने दिले आहेत.”

यानंतर ओशिन यांनी अमिताभ यांचा चादर गुंडाळलेला एक फोटो दाखवला. हा फोटो बघून तुम्ही यात फार सुंदर दिसत आहात, असे ओशिन म्हणाली. त्यावर अमिताभ म्हणाले, “मी फार सुंदर दिसतोय, पण त्यावेळी माझी अवस्था फार वाईट झाली होती. मी रशियाला फुटबॉलचा वर्ल्डकप बघण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी खूप थंडी वाजत होती. म्हणून मी गोधडी गुंडाळून बसलो आहे,” असे त्यांनी सांगितले.

बिग बींनी नुकतच ‘गुड बाय’ या सिनेमाचं शूटिंग पूर्ण केलंय. सध्या ते ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमात होस्टच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसतात. यासोबतच ‘चेहेर’, ‘ब्रह्मास्त्र’ आणि ‘झुंड’ या सिनेमांमध्ये ते झळकणार आहेत.

हेही वाचा – कौन बनेगा करोडपती : अन् ‘बिग बी’ नीच केली शो थांबवण्याची विनंती, म्हणाले…