शुजित सिरकार निर्मित आणि अनिरुद्ध रॉय चौधरी दिग्दर्शित ‘पिंक’ समाजात स्त्रियांच्या बाबतीत घडणाऱ्या सगळ्याच चुकीच्या गोष्टींवर एकेक करत बोट ठेवतो. मुळात स्त्रीला तिने कधी, कोणाबरोबर लैंगिक संबंध ठेवावेत याच्या निवडीचा अधिकार आहे. ती जेव्हा ‘नाही’ म्हणते मग ती मुलगी असेल, तरुणी असेल, सेक्स वर्कर असेल किंवा तुमची पत्नी असेल त्याचा अर्थ तिच्या शरीराला हात लावू नये, असाच होतो. इतक्या थेट, स्पष्टपणे संदेश देणारा हा पहिलाच हिंदी चित्रपट आहे आणि यासाठी या चित्रपटाशी संबंधित प्रत्येकाचे कौतुकच करायला हवे.
‘पिंक’ पाहताना मीनाक्षी शेषाद्रीची मुख्य भूमिका असलेल्या ‘दामिनी’ चित्रपटाची आठवण आल्याशिवाय राहत नाही. ‘पिंक’मध्येही कोर्टरूम ड्रामा हा महत्त्वाचा भाग आहे, मात्र त्या वेळी चित्रपटात ज्या ज्या मेलोड्रामाचा आधार घेण्यात आला होता त्याला आज इतक्या वर्षांनी साधारणपणे तत्सम विषयाला हात घालताना पूर्ण फाटा देण्यात आला आहे. एवढेच नाही तर चित्रपटाची मांडणीही पूर्णपणे वेगळी, आजच्या वास्तवाचे भान राखून करण्यात आली आहे. दिल्लीतील तीन तरुणींची ही कथा आहे. मीनल (तापसी पन्नू), फलक (कीर्ती कुलहारी) आणि अँड्रिया (अँड्रिया तारियांग) एका फ्लॅटमध्ये राहणाऱ्या या तीन तरुणी. मीनल इव्हेंट मॅनेजमेंट करते, तिला रात्री-अपरात्री घरी परतावे लागते. आईवडिलांना याचा त्रास होऊ नये म्हणून ती स्वतंत्रपणे राहते आहे. फलक कॉर्पोरेट कंपनीत आहे आणि अँड्रियाही नोकरी करते आहे. एका रॉक कॉन्सर्टला गेलेल्या या तिघींची ओळख तिथे विश्वा (तुषार पांडे), राजवीर सिंग (अंगद बेदी) आणि डम्पी (राशुल टंडन) या तीन मुलांशी होते. ज्यातला विश्वा मीनलचा चांगला मित्र आहे. ओळख, मैत्री आणि त्यातून झालेला पार्टीचा आग्रह. या पार्टीत असं काही घडतं की या तिघी तिथून पळ काढतात. राजवीरला इस्पितळात भरती केलं जातं. त्याला डोक्यावर चांगलाच मार लागला आहे. झाल्या प्रकरणातून सावरण्याच्या प्रयत्नात असलेल्या तिघींना पुन्हा त्या मुलांकडून धमक्या येऊ लागतात. या वेळी या मुलींना शिक्षा झाली पाहिजे, त्यांना त्यांची लायकी दाखवून दिली पाहिजे, अशी जुनाट मानसिकता असलेले हे तीन तरुण आणि त्यांचा आणखी एक मित्र आपल्या राजकारणी नातेवाईकाच्या मदतीने तिघींची सगळ्या बाजूने कोंडी करतात.
आपलं काही चुकलेलं नाही, आपल्याकडून जो हल्ला झाला तो स्वसंरक्षणासाठी होता, यावर ठाम असलेली मीनल पोलिसांमध्ये तक्रार करते. पण पोलीस प्रशासन तिला दाद देत नाही, उलट तिच्यावरच खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप लावला जातो आणि खटला उभा राहतो. कोणाचीही मदत नसताना एक शेजारी म्हणून या तिघींना जवळून पाहणारे दीपक सेहगल (अमिताभ बच्चन) ज्यांना बायपोलार डिसऑर्डर आहे ते वकील म्हणून या तिघींची केस लढतात. यातला कोर्ट रुम ड्रामा खूप महत्त्वाचा आणि आत्तापर्यंतच्या चित्रपटांपेक्षा वेगळा आहे. या खटल्याच्या निमित्ताने दीपक सेहगल अनेक प्रश्न उपस्थित करतात. पंजाबी ड्रेस घालणाऱ्या आणि कुठल्याही पार्टीत न जाणाऱ्या स्त्रिया शालीन, त्याउलट जीन्स-टीशर्ट घालणाऱ्या, स्कर्ट्स मिनी टॉप घालणाऱ्या, पार्टीत जाणाऱ्या, मद्यपान करणाऱ्या मुली चवचाल असतात. त्या पुरुषांशी मोकळेपणाने हसून बोलतात, याचाच अर्थ त्या जवळीक वाढवण्यासाठी तयार असतात, ही मानसिकता आजही तरुणांमध्ये तितकीच दृढ आहे, हे या चित्रपटातील व्यक्तिरेखा ज्या निर्ढावलेपणाने हे सत्य सांगतात ते पाहून धक्का बसतो. खटल्याच्या ओघाने साक्षी-पुराव्यांची मांडणी करताना मुलींनी सभ्यतेचे संकेत पाळूनच वावरले पाहिजे नाही तर मुलांची मने खराब होतात. आज आपल्या मुलींना नाही तर मुलांना वाचवण्याची गरज आहे, असं उपरोधिकपणे मांडत समाजातील या विसंगत वागण्यावर दिग्दर्शकाने अचूक बोट ठेवले आहे. ‘आर यु अ व्हर्जिन?’ असा प्रश्न जाहीरपणे मीनलला विचारला जातो. १९व्या वर्षी स्वत:ला आवडत असलेल्या मुलाशी लैंगिक संबंध ठेवणाऱ्या तरुणीलाही तिच्या मर्जीविरोधात कोणीही लैंगिक संबंधांसाठी जबरदस्ती करू शकत नाही. तिच्या ‘नाही’चा आदरच व्हायला हवा, हे या चित्रपटातून अधोरेखित करण्यात आलं आहे. इतक्या निर्भीडपणे, सरळपणे आपले म्हणणे मांडणाऱ्या या चित्रपटाला तापसी, कीर्ती आणि अँड्रिया या तिघींच्या सहजअभिनयाची जोड मिळाली आहे. अमिताभ बच्चन यांनी आपल्या वाटय़ाला आलेल्या दृश्यांमधून आपला प्रभाव पुन्हा एकदा दाखवून दिला असला तरीही त्यांची व्यक्तिरेखा लिखाणातच अर्धवट आहे. दीपक सेहगल यांचा आजार एकीकडे मात्र त्यांच्या एकूणच असण्याला कुठल्याही प्रकारचे तर्काचे अधिष्ठान लेखक-दिग्दर्शकाने दिलेले नाही. खरं तर, इथे अमिताभ यांच्या मूळच्या आक्रमक प्रतिमेशी साजेशी अशी व्यक्तिरेखा असताना त्यांना विचित्र आजारपणात अडकवून वकील म्हणून उभं करण्याचा दिग्दर्शकाचा आटापिटाही कळत नाही. पण चित्रपटाची पटकथा-संवाद आणि दिग्दर्शनाची वेगळी थेट भिडणारी शैली या चित्रपटाला परिणामकारक करते. अत्यंत सरळ-साध्या भाषेत आजच्या घडीला कळीचा असलेला मुद्दा प्रभावीपणे मांडण्याच्या या धाडसी ‘पिंक’ प्रयत्नाला दाद द्यावी तितकी कमी..
‘पिंक’
निर्माता- शुजित सिरकार, रश्मी शर्मा
दिग्दर्शक- अनिरुद्ध रॉय चौधरी
कलाकार– अमिताभ बच्चन, तापसी पन्नू, कीर्ती कुलहारी, अँड्रिया तारियांग, अंगद बेदी, तुषार पांडे, राशुल टंडन, पीयूष मिश्रा.
