अभिनेत्री तनुश्री दत्ताने ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केल्यानंतर कलाविश्वामध्ये दोन गट झाल्याचं पाहायला मिळालं. एक गट तनुश्रीची पाठराखण करणारा,तर दुसरा गट नाना पाटेकर यांची साथ देणारा. परंतु या साऱ्यामध्ये काही कलाकारांनी  मौन बाळगणं पसंत केलं. यामध्ये बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांनीही बोलणं टाळलं होतं. परंतु आज पहिल्यांदाच त्यांनी याप्रकरणी भाष्य केलं आहे.

काही दिवसापूर्वी ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. यावेळी बिग बी व आमिर खान यांना तनुश्रीने केलेल्या आरोपांवर प्रश्न विचारण्यात आला होता. मात्र या दोघांनीही बोलणं टाळलं. विशेष म्हणजे ‘मी तनुश्री किंवा नाना पाटेकर नाही’, असं अमिताभ यांनी म्हटलं होतं.

अमिताभ यांनी आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त नाना-तनुश्री वादावर पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. अमिताभ यांनी ट्विटरच्या माध्यमातून एक मुलाखत पोस्ट केली आहे. या मुलाखतीमध्ये त्यांनी स्त्रियांविषयी भाष्य केलं असून महिलांचं लैंगिक शोषण होत असेल तर अन्याय करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करायला हवी, असं म्हटलं आहे.

‘महिलांना अबला किंवा कमकुवत समजून त्यांच्यावर अन्याय करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याची गरज आहे. माझा महिलांना कायमच पाठिंबा आहे. त्यामुळे जर महिलांसोबत गैरवर्तन होत असेल तर मी त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभा असेन’, असं बिग बींनी म्हटलं आहे.

पुढे ते असंही म्हणाली, ‘महिलांचं लैंगिक शोषण होतं असताना आपण ते थांबविलं पाहिजे आणि अन्याय करणाऱ्यांविरोधात त्याचवेळी तक्रार दाखल केली पाहिजे. इतकचं नाही त जेव्हा या घटना घडतात तेव्हाच खरं तर व्यक्त झालं पाहिजे’.

दरम्यान, ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शिनावेळी अमिताभ यांना तनुश्रीने केलेल्या आरोपांवर प्रश्न विचारण्यात आले होते. परंतु ‘माझं नाव तनुश्री दत्ता किंवा नाना पाटेकर नाही, मग मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर कसं देऊ शकतो?,’ असा प्रतिप्रश्नच बिग बींनी प्रसारमाध्यमांना केला होता.