आज, १मे महाराष्ट्राचा स्थापना दिवस आणि सोबतच कामगार दिवसही. त्यामुळे आजचा दिवस राज्यात उत्साहात साजरा केला जातो. राज्यातील प्रत्येक व्यक्ती एकमेकांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा देत आहेत. त्यातच सध्या देशावर करोना विषाणूचं सावट असल्यामुळे मराठी कलाकारांनी या दिवसाचं निमित्त साधत देशातील जनतेला भावनिक आवाहन केलं आहे. सगळ्या कलाकारांनी खास व्हिडीओच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत.

करोना विषाणूने सर्वत्र थैमान घातलं आहे. केवळ शहरांमध्येच नाही तर प्रत्येक जनमाणसाच्या मनात भीती निर्माण केली आहे. त्यामुळेच सध्या लॉकडाउन सुरु आहे. या काळात रोजंदारीवर काम करणाऱ्या अनेक गरजूंना संकटांचा सामना करावा लागत आहे. त्यातच काम बंद असल्यामुळे त्यांना पगारही मिळत नाहीये. थोडक्यात त्यांच्या उत्पन्नाचे सगळे स्त्रोत बंद झाले आहेत. त्यामुळेच या कामगारांचे पगार कापू नका असा भावनिक आवाहन कलाकारांनी केलं आहे.विशेष म्हणजे या कलाकारांनी त्यांच्या घरी राहूनच हा व्हिडीओ शूट केला आहे.

अमोल उतेकर यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या व्हिडीओचं दिग्दर्शन त्यांनी स्वत: केलं आहे. तर या आर्त विनंतीच्या ओळी किरण खोत यांनी लिहिल्या आहे. या व्हिडीओमध्ये मराठी कलाविश्वातील अनेक दिग्गज कलाकार झळकले आहेत.

दरम्यान, या व्हिडीओमध्ये मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्गज कलाकार सिद्धार्थ जाधव, सौरभ गोखले,संस्कृती बालगुडे, स्मिता शेवाळे, हेमांगी कवी, राणी अग्रवाल, गौरव मोरे, नीता शेट्टी, अमोल उतेकर, प्रदीप मेस्त्री हे झळकले असून त्यांनी जनतेला संदेश दिला आहे.