भोजपुरी अभिनेत्री आम्रपाली दुबे नेहमीच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. दिनेश लाल यादव म्हणजेच निरहुआबरोबर तिचं अफेअर असल्याच्या बातम्या अनेकदा पसरत असतात. कारण दोघांमध्येही खूप जवळीक पाहायला मिळते. अशातच आता आम्रपालीने लग्न न करता आई व्हायचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाबद्दल तिने तिच्या आई-वडिलांना सांगितलं, तर त्यांना मोठा धक्का बसला.

३९ वर्षीय आम्रपाली दुबे सध्या ‘जिओ हॉटस्टार’च्या ‘भोजपुरी बवाल’ या शोमध्ये दिसत आहे. यामध्ये तिच्याबरोबर निरहुआ, पवन सिंह, तेज प्रताप यादव आणि काजल राघवानी, निलमसह अनेक भोजपुरी कलाकारदेखील आहेत. सोमवारी प्रसारित झालेल्या भागात, आम्रपालीने लग्न न करता आई होण्याच्या निर्णयाबद्दल आई-वडिलांना सांगितलं. त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनंतर आम्रपाली भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.

लग्न करायचं नाही, पण आई व्हायचंय – आम्रपाली दुबे

आम्रपाली तिच्या आई-वडिलांना म्हणाली, “मला सध्या तरी लग्न करायचं नाही. कारण मला अजून तसा जोडीदार कोणी भेटलेला नाही. मी तुम्हा दोघांना पाहिलंय, तुम्ही दोघे काहीही न बोलता एकमेकांचे मन ओळखता, पण मला तसा जोडीदार मिळालेला नाही. तसेच मी कोणत्याही रिलेशनशिपसाठीही तयार नाही, कारण मला कोणी समजून घेणारा भेटत नाहीये.” पुढे आई होण्याच्या निर्णयाबद्दल ती म्हणाली, “मला लग्न करायचं नाही, पण मला एक मुलगी दत्तक घेऊन आई व्हायचं आहे.”

आम्रपालीच्या निर्णयावर आई-वडिलांची प्रतिक्रिया

आम्रपालीच्या या निर्णयावर तिचे वडील म्हणतात, “उषा (आम्रपालीची आई), तुला काय वाटतं?” आम्रपाली म्हणते, “माझं ठरलंय आणि मी यासंदर्भात वकिलांशीही भेटले आहे. ते मला मदत करतील. मला मातृत्वाचा अनुभव घ्यायचा आहे. मला आतून वाटतं की मी आई व्हावे आणि एका लहान जीवाला एक चांगलं आयुष्य द्यावं. म्हणूनच मला आई व्हायचं आहे.” यानंतर आम्रपालीची आई तिला समजावत म्हणाली, “बाळा, हे सगळं बोलण्यासाठी ही योग्य जागा नाही, कारण हा खूप मोठा निर्णय आहे. आम्हालाही आजी-आजोबा व्हायचं आहे. आम्ही नक्कीच यावर विचार करू.”

आम्रपालीचे वडील म्हणाले, “तू निर्णय तर घेतलास, पण जग काय म्हणेल? समाजही तर आहे ना.” अभिनेत्रीचे आई-वडील म्हणतात की ते तिच्या या निर्णयामुळे खूश आहेत, पण “समाजाचाही विचार करावा लागतो.” यामुळे अभिनेत्री थोडी निराश होते, पण नंतर ते तिला पाठिंबा देतात आणि तिच्यासोबत असल्याची ग्वाही देतात. हे ऐकून आम्रपाली भावुक होते आणि रडू लागते.