scorecardresearch

“खूप काही सांगायचं राहून गेलं…” मावशीच्या निधनानंतर अमृता खानविलकरची भावूक पोस्ट

अमृताने इन्स्टाग्रामवर भावूक पोस्ट शेअर केली आहे.

“खूप काही सांगायचं राहून गेलं…” मावशीच्या निधनानंतर अमृता खानविलकरची भावूक पोस्ट
मावशीसाठी अमृताने इन्स्टाग्रामवर भावूक पोस्ट लिहून श्रद्धांजली वाहिली आहे.

मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अमृताच्या मावशीचं निधन झालं असून तिने याबाबतची माहिती सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून दिली आहे. आपल्या मावशीसाठी अमृताने इन्स्टाग्रामवर भावूक पोस्ट लिहून श्रद्धांजली वाहिली आहे. अमृताची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

मावशीच्या निधनानंतर शेअर केलेल्या पोस्टमध्ये अमृता खानविलकरने लिहिलं, “आता शांत झोप माझी माउली आता तुला कधीच कुठला त्रास होणार नाही मनसोक्त आईसक्रीम खा… छान रहा… नीट रहा आणि कसलीच काळजी करू नकोस आता आप्पा आजी तुझी काळजी घेतील. तू परत लहान होऊन जा… तू आज पर्यंत जे जे केलस घरच्यांसाठी… आमच्या कुटुंबासाठी त्याची परतफेड आम्ही कोणी करूच शकत नाही. मम्मा, मी, अदिती आम्ही खूप लकी होतो कि तुझी सावली होती आमच्यावर नाहीतर आम्ही हरवलो असतो. माऊ तुला खूप मिस करणार गं तुला…. अजून आपल्याला किती फिरायचं होतं. बोलायचं होतं… मॉमला, मला खूप काही सांगायचं होतं सगळंच राहून गेलं. पण माऊ तू नीट राहा आता. तू काळजी करू नकोस.”
आणखी वाचा- VIDEO : सात वर्षांपूर्वीचा ‘तो’ क्षण अमृता खानविलकर कधीच विसरणार नाही, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

आपल्या पोस्टमध्ये अमृता पुढे लिहिते, “आज मी तुला अशा अवस्थेत पाहून अक्षरशः सुन्न झाले. तू फक्त माझी मावशीच नाही तर आई सुद्धा होती. तुला आयुष्याच्या वेगवेगळ्या, कठीण टप्प्यांतून जाताना आणि तरीही खंबीरपणे उभं राहून तुझ्या कुटुंबासाठी संघर्ष करताना पाहून मला स्त्रीच्या सामर्थ्याची जाणीव झाली… आम्हाला स्वतःच्या हातांनी खाऊ घालण्यापासून ते मला आणि अदितीला आमच्या करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी तुझा नेहमीच पाठिंबा होता. तू नेहमीच माझ्या आठवणीत राहशील. आयुष्यात तू मला दिलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी धन्यवाद. मला माहीत आहे आज तू ज्या ठिकाणी आहेस तिथे शांततेत आराम करत असशील. माझं तुझ्यावर कायम प्रेम करत राहीन. आईची काळजी करू नकोस मी तिला सांभाळेन. तुझ्या आत्म्यास शांती लाभो.”

अमृता खानविलकरची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये तिच्या मावशीचे फोटोही शेअर केले आहेत. यातील एका फोटोमध्ये तिची मावशीसोबत तिची आई देखील दिसत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.