‘नाळ’, ‘मुळशी पॅटर्न’, ‘आणि..डॉ. काशिनाथ घाणेकर’, ‘मुंबई-पुणे-मुंबई ३’ यांसारखे एकाहून एक दमदार मराठी चित्रपट प्रदर्शित झाले आणि ते प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. त्यामुळे आगामी मराठी चित्रपटाकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा आणखीनच वाढल्या आहेत. नवनवीन प्रयोग करण्यात दिग्दर्शक आणि लेखक सचिन कुंडलकर यांचा हातखंडा राहिला आहे. त्यांच्या चित्रपटांचं वैशिष्ट्य सांगायचे तर त्यांचे विषय नेहमीच्या पठडीतील स्टोरी मटेरियलपेक्षा वेगळा ट्रॅक पकडणारे असतात. ‘पाँडिचेरी’ या आगामी चित्रपटाच्या माध्यमातून ते असाच आणखी एक चौकटीबाहेरचा प्रयोग करत आहेत. या चित्रपटातून अभिनेत्री अमृता खानविलकर तिच्या नवीन वर्षाची धमाकेदार सुरुवात करणार आहे. अमृतासोबतच यामध्ये मराठीतील तगडी स्टारकास्ट आहे.

चित्रपट म्हटल्यास, लाइट्स.. कॅमेरा आणि अॅक्शन हे आपल्या डोक्यात अगदी सहजच येतं. यापैकी कॅमेरा हा चित्रपटाचा सर्वांत अविभाज्य भाग. कॅमेरा जितका महागडा आणि प्रगत तितकीच चित्रपटाची प्रत उत्तम असं म्हणतात. पण याउलट कुंडलकर या संपूर्ण चित्रपटाचं शूटिंग स्मार्टफोनच्या कॅमेऱ्यावर करणार आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने कुंडलकर आणि अमृता पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. अमृतासोबतच सई ताम्हणकर, वैभव तत्त्ववादी आणि नीना कुलकर्णी यांच्याही चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. अमृताने संपूर्ण टीमसोबतचा फोटो नुकताच सोशल मीडियावर शेअर केला आहे.

चित्रपटाची कथा पाँडेचेरीशी संबंधित असून तिथेच बहुतांश शूटिंग पार पडणार आहे. तेव्हा प्रेक्षक आणि अमृता-सईचे चाहते या चित्रपटासाठी नक्कीच उत्सुक असतील.