Amruta Khanvilkar Talks About Marriage : अमृता खानविलकर मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. मराठीमध्ये तिनं नाटक, मालिका, चित्रपट अशा तिन्ही माध्यमांतून काम करत प्रेक्षकांच्या मनात तिचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. मराठीसह तिनं हिंदीतही महत्त्वपूर्ण भूमिका साकारत हिंदी प्रेक्षकांचीही मनं जिंकली. अलीकडेच तिची ‘तस्करी’ ही हिंदी सीरिज चर्चेत होती.

अमृता इंडस्ट्रीतील अशा कलाकारांपैकी एक आहे, जे कायम त्यांच्या खाजगी आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल मोकळेपणानं सोशल मीडियावर तसेच मुलाखतींमधून बोलत असतात. अशातच अमृता खानविलकरनं भारती सिंहला दिलेल्या मुलाखतीत तिच्या खाजगी आयुष्याबद्दल सांगितलं आहे. अमृतानं या मुलाखतीत तिच्या व हिमांशू मल्होत्राच्या लग्नाबद्दल सांगितलं आहे. अमृता नेमकं काय म्हणाली याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…

अमृता लग्नाबद्दल काय म्हणाली?

मुलाखतीत अमृताला तुझ्या लग्नाला १५ वर्षे झाली असतील? असं विचारल्यानंतर ती म्हणाली, “जास्त झाली असतील. एका वेळेनंतर असं वाटायला लागतं की का केलं लग्न? तेव्हा लग्नाच्या वेळी इतके पैसे खर्च केले त्याची बचत करायला पाहिजे होती, पैसे उगाच खर्च केले असं मला वाटतं.” लग्नात केलेल्या खर्चाबद्दल अमृता पुढे म्हणाली, “आज मला असं वाटतं, कारण आम्हाला घरसुद्धा खरेदी करायचं होतं. आता थोडं वय झाल्यानंतर मी आणि हिमांशू याबद्दल चर्चा करत असतो.” त्यावर भारती तिला, “मी तर माझ्या लग्नामध्ये कोणत्या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे घालायचे हेसुद्धा पत्रिकेत लिहिलेलं. हळदीच्या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे, मेहंदीच्या दिवशी हिरव्या रंगाचे कपडे अशी व्यवस्था केली होती,” असं म्हणते.

Award Banner

भारतीचं ऐकल्यानंतर अमृता पुढे म्हणाली, “हे सगळं आम्ही नाही केलं. त्यानंतर आम्ही ‘नच बलिये’मध्ये पैसे पण कमावले, नाव पण कमावलं सगळं काही आहे. पण, तरी लग्नात जो खर्च झाला ना त्याचा पश्चाताप होतो; कारण कलाकार आहोत, आमच्याकडे नेहमीच काम असतं असं होत नाही.” अमृताला पुढे तिच्या ‘तस्करी’ या नुकत्याच आलेल्या वेब सीरिजबद्दल विचारलं. भारती याबद्दल म्हणाली, तस्करी तर हिट झाली. यावर अमृता म्हणाली, “हो हिट झाली.”

भारतीनं अमृताला पुढे हिट झाल्यानंतरही तेवढेच पैसे मिळतात की अधिक मिळतात असं विचारल्यानंतर ती म्हणाली, “नाही, जे मिळायचं होतं ते आधीच मिळालं.” पुढे तिला ‘तस्करी २’मध्ये काम करायचंय का असं विचारल्यानंतर ती म्हणाली, “मला आवडेल, मी आशा करते. कारण ती सीरिज इतकी हिट होईल असं आम्हाला अजिबातच वाटलं नव्हतं.”