Amruta Khanvilkar Shares Spiritual Experience : अमृता खानविलकर मराठी व हिंदी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने आतापर्यंत तिच्या नृत्यशैलीने आणि अभिनयाने अनेकांची मनं जिंकली आहेत. अमृता सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते आणि यामार्फत ती तिच्या आयुष्यातील घडामोडींबद्दल चाहत्यांना सांगत असते.
अमृता खानविलकर खूप स्पष्टवक्ती असून ती अनेकदा मुलाखतींमधूनही तिची मतं, प्रतिक्रिया ठामपणे व्यक्त करत असते. अमृता अनेकदा तिच्या सोशल मीडियावरून आणि यूट्यूब चॅनेलवरून कामासंबंधित तसेच खासगी आय़ुष्यातील काही गोष्टींची माहिती चाहत्यांना देत असते. अशातच आता तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अध्यात्माबद्दल सांगितलं आहे.
अमृता खानविलकर नेहमीच कुठल्या न कुठल्या कारणामुळे चर्चेत असते. अमृता सध्या तिच्या ‘लग्नपंचमी’ या नाटकाचे प्रयोग करत आहे; तर याचबरोबर इतर कलाकृतींचं शूटिंग आणि व्यवसाय असं सगळं ती एकत्र करत असते. अमृता अनेकदा अध्यात्माबद्दलही बोलत असते. अशातच आता तिने तिरुपती बालाजीचा अनुभव सांगितला आहे. ‘मॅक्स महाराष्ट्र’ला दिलेल्या मुलाखतीत अमृताने तिचा हा अनुभव सांगितला आहे. अभिनेत्री नेमकं काय म्हणाली याबद्दल जाणून घेऊयात…
अमृता खानविलकरने सांगितला अनुभव
अनेकदा देवाच्या ठिकाणी जाण्यासाठी बोलावणं यावं लागतं असं बोललं जातं. असंच काहीसं अमृताबरोबरही घडलं. अमृता म्हणाली, “का माहीत नाही, पण मी मेडिटेशन करत असताना माझ्या डोक्यात आलं की तिरुपतीला जाऊया. त्या दिवशी पूर्ण दिवस मला संकेत येत होते की तू तिरुपतीला ये. तीन ते चारवेळा असं झालं. मी नाटकाच्या प्रयोगासाठी गेले असताना तिथे मला बालाजी लिहिलेला मोठा बोर्ड दिसला. त्यानंतर बालाजींची मूर्ती पाहिली. मग कुठल्या तरी एका चाहत्याने मला मेसेज केला की, ताई मी आताच तिरुपतीला जाऊन आलोय, मला प्रसाद पाठवायचा आहे; प्लीज तुमच्या मॅनेजरचा नंबर द्या. तेव्हाच मी ठरवलं की आता तर जायलाच पाहिजे.”
अमृता पुढे म्हणाली, “त्यानंतर जसे मला दोन दिवस मिळाले मी जाऊन आले, हे खूप महत्त्वाचं असतं. तुमच्या आयुष्यात जशा घटना घडतात त्यानुसार तुमच्या अध्यात्माचा प्रवास घडत जातो. पण, जेव्हा तुम्ही समर्पित भावनेने देवाला पाहता ती वेगळी भावना असते, काहीतरी शक्ती मिळतेच तुम्हाला.”
दरम्यान, अमृता सध्या तिच्या नवीन व्यवसायामुळे चर्चेत आहे. तिने तिचा स्वत:चा साड्यांचा व्यवसाय सुरू केला आहे, त्यामुळे आता अमृताही इतर अभिनेत्रींप्रमाणे अभिनयाव्यतिरिक्त व्यवसायही करत आहे.
