Anant Ambani-Radhika Merchant Wedding: देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. त्यामुळे सध्या लग्नाची जोरदार तयारी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. स्वतः अनंत अंबानी बॉलीवूड सेलिब्रिटींच्या घरी जाऊन लग्नाचं आमंत्रण देताना दिसत आहे. १२ जुलैला अनंत राधिका मर्चंट हिच्याशी लग्नगाठ बांधणार आहे. त्यामुळे सध्या सगळ्यांचं लक्ष अनंत-राधिकाच्या शाही लग्नसोहळ्याकडे लागलं आहे. अशातच एक निमंत्रण पत्रिका व्हायरल झाली आहे. अनंत-राधिकाच्या लग्नापूर्वी मुकेश अंबानींनी एका सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन केलं आहे. याचं निमंत्रण व्हायरल पत्रिकेतून देण्यात आलं आहे . अनंत-राधिकाच्या लग्नाची चर्चा गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरू आहे. लग्नापूर्वी दोघांचे दोन प्री-वेडिंग सोहळे झाले. मार्च महिन्यात तीन दिवसांचा पहिला प्री-वेडिंग सोहळा गुजरात येथील जामनगरमध्ये पार पडला. त्यानंतर २९ मे ते १ जूनपर्यंत दुसरा प्री-वेडिंग सोहळा क्रूझवर झाला. इटली ते फ्रान्स असा प्रवास करत अनंत-राधिकाचा दुसरा प्री-वेडिंग सोहळा झाला. हे दोन्ही प्री-वेडिंग सोहळे चांगलेच गाजले. आता अखेर १२ जुलैला अनंत-राधिका लग्नबंधनात अडकून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहेत. पण त्यापूर्वी मुकेश अंबानींनी वंचितांच्या सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन केलं आहे. या सामूहिक विवाह सोहळ्याची पत्रिका व्हायरल झाली आहे. हेही वाचा - आईप्रमाणेच ईशा अंबानीने देखील IVF द्वारे दिला जुळ्या मुलांना जन्म; खुलासा करत म्हणाली, “ही एक अवघड…” या पत्रिकेतून सांगण्यात आलं आहे की, अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनमध्ये २ जुलैला सायंकाळी ४.३० वाजता पालघर येथील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर येथे गरीब व वंचितांच्या सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या सोहळ्याला स्वतः मुकेश अंबानी व नीता अंबानी उपस्थित राहणार आहेत. याशिवाय अंबानी कुटुंबातील इतर सदस्यही या सामूहिक विवाह सोहळ्याला हजेरी लावणार आहेत. हेही वाचा - Video: नीता अंबानींनी मुलाच्या लग्नासाठी वारासणीतून खरेदी केली साडी, सोन्या-चांदीचे वर्क असलेल्या साडीची किंमत जाणून घ्या दरम्यान, १२ जुलैला अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचं हिंदू पद्धतीनं लग्न होणार आहे. त्यानंतर १३ जुलैला शुभ आशीर्वादाचा कार्यक्रम होणार असून १४ जुलैला मोठा रिसेप्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या लग्नसोहळ्यात बॉलीवूड सेलिब्रिटींसह दिग्गज मंडळी उपस्थित राहणार आहेत.