Anant and Radhika Ambani Wedding Reception: राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी(Anant and Radhika Ambani ) यांचा विवाहसोहळा नुकताच पार पडला. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या लग्नाची चर्चा सुरू होती. या शाही विवाहसोहळ्याला जगभरातील विविध क्षेत्रातील नामांकित व्यक्तींनी हजेरी लावली होती. आता लग्नानंतर अंबानी कुटुंबाने खास पद्धतीने रिसेप्शन केले आहे. अनंत-राधिकाच्या रिसेप्शन सोहळ्यात सर्व कर्माचाऱ्यांना आमंत्रण दिले होते. महत्त्वाचे म्हणजे, कर्मचाऱ्यांसोबत त्यांच्या परिवारालादेखील या सोहळ्याचे आमंत्रण मिळाले होते. रिसेप्शनमध्ये भारतीय संस्कृती दर्शवणारे सेटअप होते. वर्षानुवर्षे अंबानी कुटुंब आणि रिलायन्स यांच्याशी संबंधित सर्व कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. हेही वाचा: “टाइम हो गया, पॅक अप”, अमिताभनं सांगितले राजेश खन्नाचे शेवटचे शब्द Anant and Radhika Wedding Reception वेळी काय म्हणाले अंबानी कुटुंब? अंबानी कुटुंबाने खास पद्धतीने या सर्वांचे स्वागतदेखील केले आहे. मुकेश अंबानी यांनी 'जय श्री कृष्ण' म्हणत आपल्या संवादाला सुरुवात केली. कर्मचाऱ्यांबरोबर संवाद साधताना त्यांनी म्हटले आहे की, तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. अनंत-राधिकाच्या लग्नसोहळ्यातील हा शेवटचा कार्यक्रम आहे. पण, माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. नीता अंबानींनी म्हटले आहे की, इथे असे अनेक चेहरे आहेत, जे परिचित आहेत, अंबानी कुटुंबाबरोबर वर्षानुवर्षे जोडले गेलेले आहेत. अनंत अंबानीने म्हटले की, तुम्हा सगळ्यांमुळे आमचे कुटुंब एकजूट आहे आणि तुम्ही सगळे या कुटुंबाचा भाग आहात. राधिकाने कर्मचाऱ्यांना उद्देशून म्हटले की, तुम्ही आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहात, तुमच्याशिवाय हे सगळे अशक्य होते.याबरोबरच, या भव्य सोहळ्याला हजर असलेल्या कर्मचाऱ्यांनीदेखील आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. एकाने म्हटले की, इतक्या मोठ्या सोहळ्यात आपल्या कर्मचाऱ्यांना बोलावणे हे मोठेपणाचे लक्षण आहे. आम्ही स्वत:ला भाग्यवान समजतो. दुसऱ्या कर्मचाऱ्याने म्हटले की, अनंतला आम्ही लहानपणापासून बघत आलो आहे, त्याचा स्वभाव खूप प्रेमळ आहे. सर्वांचा आशीर्वाद माझ्यासोबत असायला हवा, असा त्यांचा विचार असतो. एक कर्मचारी म्हणतो, त्यांचे हृदय देवाने वेळ काढून बनवले आहे. याबरोबरच त्यांनी ज्या प्रकारची थीम ठेवली होती, त्यामुळे भारतीय संस्कृती जगभरात पोहचेल अशा भावना कर्माचाऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत. भारतीय संस्कृतीची झलक असण्याबरोबरच, ए. आर. रेहमान यांचा कॉन्सर्टदेखील होता. श्रेया घोषाल, सोनू निगम, उदित नारायण, जोनिता गांधी यांनीदेखील आपल्या आवाजाने चाहत्यांना मंत्रमुग्ध केल्याचे पाहायला मिळाले होते. याबरोबरच एनएमएसीसी (NMACC) मध्ये आयोजित केलेल्या या कार्यक्रमात वाराणसीची प्रतिकृती आणि दशावताराचा शो दाखवण्यात आला.दरम्यान, अनंत-राधिकाच्या लग्नात बॉलीवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. त्यांच्या लग्नातील अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.