शिल्पा शेट्टी कुंद्रा, तिची बहीण शमिता शेट्टी आणि आई सुनंदा शेट्टी यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ होणार असं दिसतंय. मुंबईतील अंधेरी कोर्टाने शिल्पा, शमिता आणि त्यांची आई सुनंदा शेट्टी यांच्याविरोधात समन्स बजावले आहे. यासोबतच न्यायालयाने तिघांनाही २८ फेब्रुवारीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. हे प्रकरण २१ लाखांच्या कर्जाशी संबंधित आहे.
ANI ने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबईतील अंधेरी कोर्टाने एका व्यावसायिकाच्या तक्रारीनंतर अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा, तिची बहीण शमिता शेट्टी आणि आई सुनंदा शेट्टी यांना समन्स बजावले आहे. तिघींनीही २१ लाखांचे कर्ज फेडले नसल्याचा आरोप व्यावसायिकाने केला होता. व्यावसायिकाच्या तक्रारीची दखल घेत न्यायालयाने तिघींना २८ फेब्रुवारीला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
एका ऑटोमोबाईल एजन्सीच्या मालकाने या तिघींविरुद्ध M/s Y&A Legal या लॉ फर्ममार्फत २१ लाख रुपयांच्या फसवणुकीची तक्रार दाखल केली होती. शिल्पाच्या दिवंगत वडिलांनी २१ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते आणि ते जानेवारी २०१७ मध्ये व्याजासह द्यायचे होते, असा दावा व्यावसायिकाने केला आहे.
तक्रारीनुसार, शिल्पा शेट्टी, बहीण शमिता आणि आई सुनंदा यांना त्यांच्या वडिलांनी २०१५ मध्ये घेतलेले कर्ज फेडण्यात अपयश आले. त्यांच्या वडिलांनी वार्षिक १८ टक्के व्याजाने कर्ज घेतले. त्यांनी आपल्या मुली आणि पत्नीला कर्जाबाबत सांगितले होते, असा फिर्यादीचा दावा आहे. मात्र, कर्ज फेडण्याआधीच ११ ऑक्टोबर २०१६ रोजी त्यांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर शिल्पा, शमिता आणि त्यांच्या आईने कर्ज फेडण्यास नकार दिला.
पॉर्नोग्राफी प्रकरणात शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रावर झाली होती कारवाई
मुंबई पोलिसांनी बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती उद्योगपती राज कुंद्रा यांना अश्लील चित्रपटांची निर्मिती करुन मोबाईल अॅपवर प्रदर्शित केल्याप्रकरणी अटक केली होती. मुंबई पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी अश्लील चित्रपटांची निर्मिती करून मोबाईल अॅप्सवर प्रदर्शित करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. या प्रकरणात एका अभिनेत्रीला देखील अटक करण्यात आली होती. त्यानंतर राज कुंद्रा यांचे नाव समोर आले होते. चौकशीसाठी राज कुंद्रा यांना बोलवण्यात आले होते. सोमवारी अश्लील चित्रपटांची निर्मिती करणे आणि ते प्रदर्शित करण्याच्या आरोपाखाली राज कुंद्रा यांना अटक करण्यात आली होती.