माणसं आपल्या आयुष्याबद्दलची अनेक स्वप्नं पाहत असतात. ती पूर्ण करण्यासाठी ती खूप धडपडतातदेखील.  कधी ती स्वप्नं पूर्ण होतात, तर कधी नाही होत. पण आयुष्यभर माणसं स्वप्नं पाहायचं काही सोडत नाहीत. ज्या दिवशी मनुष्य स्वप्नं पाहायचं सोडून देतो, तो त्याचा मृत्यू असतो. स्वप्नांच्या वाटेवरचा संघर्ष कुणालाच चुकलेला नाही. क्वचित एखाद्याच्या बाबतीत त्याने न पाहिलेल्या स्वप्नांच्या वाटे त्याचा प्रवास होतो खरा; परंतु तो तसा अपवादात्मकच! अशाच एका होतकरू तरुणाचं सुपरस्टार बनण्याचं स्वप्न कोणकोणती वळणं घेतं याचा धांडोळा म्हणजे महेश मांजरेकर लिखित-दिग्दर्शित आणि सिद्धार्थ जाधव अभिनित ‘ॲनिमल’ हे नाटक होय.

मांजरसुंभे गावातला तरुण दत्तू मांजरसुंभेकरचं लहानपणापासूनचं स्वप्न असतं : बॉलीवूडमध्ये जाऊन सुपरस्टार व्हायचं. शाळेतल्या चुटूरपुटूर नाटकांतून कामं केल्यावर तो सुपरस्टार बनण्याकरता मुंबईचा रस्ता सुधारतो. घरची अत्यंंत गरिबीची परिस्थिती असूनही आई-वडील जमेल तेवढे पैसे त्याच्या हातावर टेेकवतात. मित्राकडूनही तो उधारउसनवारी करतो. आई बांगड्या काढून देते… अडीअडचणीला उपयोगी येतील म्हणून. पण मुंबईत आल्या आल्या दत्तूला या महानगरीचे चटके, फटके बसायला सुरुवात होते. आणि काहीच दिवसांत त्याने सोबत आणलेले पैसे संपतात. आईच्या बांगड्याही नाइलाजास्तव विकाव्या लागतात. वडा-पाववर दिवस ढकलायची पाळी येते. पण वणवण करूनही त्याला कुठंच शिरकाव मिळत नाही. जिथं तिथं नन्नाचा पाढा. पण दत्तू निराश होत नाही. उगवला दिवस नव्यानं स्वप्न पाहत तो आला दिवस ढकलत असतो. रोज प्रॉडक्शन हाऊसेसची ऑफिसं पालथी घालत असतो. आणि मग दमूनभागून संध्याकाळी फूटपाथचा आसरा घेत असतो.

असाच एकदा तो दिग्दर्शक संदीप वांगा रेड्डीच्या ऑफिसमध्ये धडकतो. त्याला आपल्याला जे जे काय येतं ते करून दाखवतो. ते बघून आपल्याला त्याच्याकडे काम मिळेल असं त्याला वाटतं. पण वांगा त्याला स्पॉट बॉयचं काम देतो. काही का असेना, शिरकाव तर झाला… म्हणून दत्तू खूश होतो. तिकडे दत्तूची बहीण मोलमजुरी करून आई-वडलांचं पोट भरता भरता मेटाकुटीला आलेेली असते. आणि एके दिवशी आजारी पडून ती मरण पावते.  दत्तूला ही वार्ता कळूनही तो बहिणीच्या अंतिम संस्कारांना जाऊ शकत नाही. कारण गावी जायला खिशात दिडकी तर हवी! दत्तू आपलं हे दु:ख स्वत:च मनाची समजूत काढून गिळून टाकतो. घरी आपलं बरं चाललंय म्हणून कळवत राहतो. आपल्याला हे काम मिळालं, ते काम मिळालं… आता आपले बरे दिवस येतील… अशी खोटीच आशा घरच्यांना दाखवत राहतो.

इथेही या- त्या मित्राला भरीस घालून तो रोज पोट भरत असतो. काहीच न जमलं तर उपाशीपोटी झोपत असतो.तिकडे त्याची प्रेयसी सुमन त्याची गावी वाट बघत असते. तिलाही अशाच थापा मारत तो दिवस ढकलत असतो. पण नाइलाजानं शेवटी तिचे आई-वडील तिला लग्नाला भाग पाडतात. दत्तूही तिला ‘आई-वडलांचं ऐक, आपलं प्रेम तर राहीलच…’ अशी सांत्वना देतो. दत्तूच्या या संघर्षात ‘त्याचा दिवस’ उजाडतो का? दत्तू सुपरस्टार बनतो का? या प्रश्नांची उत्तरं नाटकातूनच मिळवणं योग्य.

लेेखक-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी गावाकडच्या एका संवेदनशील तरुणाच्या दिवास्वप्नाचा हा प्रवास हसतखेळत, पण पुरेशा गांभीर्याने मांडला आहे. त्याचे हर्ष-खेद, स्वप्नपूर्तीसाठीचा संघर्ष, त्याची विजिगीषू वृत्ती, ‘जियेंगे तो और भी लढेंगे’चा कणखरपणा… हे सारं त्यांनी उत्कटपणे चितारलं आहे. मुंबईतल्या माणसांशी वागता-बोलताना, जगभरातल्या घटना-प्रसंगांवर मल्लिनाथी करताना दत्तूतला सजग माणूस सहजी व्यक्त होतो. परिस्थितीसमोरची हतबलताही तो हसत हसत झेलतो. अधूनमधून आशेचे क्षीण किरणही त्याला आनंदित करतात. अवघड परिस्थितीवरही मात करताना त्याच्यातील सकारात्मकता उफाळून येते. पण या सगळ्याला कारुण्याची एक किनारही आहे. ती अधूनमधून उमटते. परंतु क्षणभरच. कारण दत्तूमधली प्रचंड ऊर्जा त्याला स्वस्थ बसू देत नाही. ती सतत उसळतच असते.  दत्तूचं पुढे काय होणार, हा आपल्याला प्रेक्षक म्हणूनही प्रश्न पडतोच.

दिग्दर्शक या नात्याने महेश मांजरेकरांनी संपूर्ण नाटक दत्तूभोवती फिरवत ठेवलं आहे. त्याची अखंड बडबड, मुंंबईभर गरगरा फिरणं, निरनिराळ्या प्रसंगांना सामोरं जाणं… हे ओघात घडत जातं. त्यामुळे नाटक कुठंही रेंगाळल्यासारखं वाटत नाही. दिग्दर्शकाने यात एक नवा प्रयोग केला आहे. दत्तू हाच निवेदक, नाटकातील कर्ताधर्ता… त्यामुळे तोच अखंडपणे आपली जीवनकहाणी सांगत असतो. अन्य पात्रं आहेत, परंतु ती चकार शब्द बोलत नाहीत. ती फक्त प्रतिक्रिया देतात. त्या अर्थानं हे एकपात्री नाटक आहे. त्यामुळेच याची रचना, बांधणी आणि सादरीकरण हा एक आगळावेगळा ‘प्रयोग’ आहे. दिग्दर्शकाने तो लीलया हाताळला आहे. यात एका प्रसंगातून दुसर्‍या प्रसंगात जाताना कुठंही अडखळायला होत नाही, हे विशेष. त्या त्या प्रसंगांतलं नाट्यही प्रत्ययकारीतेनं उभं राहतं. दत्तूचा स्वत:वरचा अदम्य विश्वास हा या नाटकाचा केंद्रबिंदू आहे. त्याभोवतीच घटना-घडामोडी घडत राहतात. हा सगळा खेळ महेश मांजरेकर यांनी उत्तमरीत्या गुंफला आहे.

संदेश बेंद्रे यांनी यातली विविध नाट्यस्थळं सांकेतिक पद्धतीनं उभी केली आहेत. किमान प्रॉपर्टीतून ती- ती स्थळं दृष्टीसमोर तपशिलांनिशी उभी राहतात. श्याम चव्हाण यांनी प्रकाशयोजनेतून नाट्यात्म क्षण ठाशीव केले आहेत. महेश मांजरेकर यांनी संगीतात जुन्या गाण्यांचा वापर करून नाटकातील आशयाला समर्पक जोड दिली आहे. सायली पांगारे यांची वेशभूषा आणि बिपीन येरूनकर यांनी रंगभूषेतून पात्रांना व्यक्तिमत्त्व बहाल केलं आहे.सिद्धार्थ जाधव बर्‍याच खंडानंतर रंगभूमीवर परतले आहेत… तेही एका दमदार व्यक्तिरेखेत! या दत्तू मांजरसुंभेकरला त्यांनी रक्त, मांस, देह, व्यक्तित्त्व असं सारंच दिलं आहे. दत्तूचा सकारात्मक स्वभाव, त्याची विजिगीषू वृत्ती, आनंदी, हॅपी गो लकी जगणं सिद्धार्थ जाधव यांनी सळसळत्या ऊर्जेसह साकारलं आहे. दत्तूचा चौफेर वावर, सततची बडबड, स्वप्नं पाहणं,  ती सत्यात यावी यासाठी धडपडणं… आणि निराशा पदरी पडली तरी क्षणभरच ती मनाला लावून घेणं, आणि लगेचच स्वत:ला सावरून नव्या उमेदीनं आल्या दिवसाला सामोरं जाणं… ही सगळी रोलर कोस्टर राइड त्यांनी प्रेक्षकांना साक्षीत्वानं घडविली आहे. आयुष्यातील दु:खद क्षणांनी कोलमडून न जाता नव्या ऊर्जेनं फिरून उसळून येण्यातून दत्तूची जीवनाप्रतीची निष्ठा प्रकट होते. खरं तर हा त्याचा दिवास्वप्नाचा पाठलाग आहे. पण त्याबद्दल कुठलीही खंत न बाळगता दत्तू उद्या मनासारखं उजाडेल या आशेवर जगतो. हे सगळे भावभावनांचे कल्लोळ त्यांनी समर्थपणे व्यक्त केले आहेत. त्यांच्या संस्मरणीय भूमिकांमध्ये दत्तू सामील व्हायला हरकत नाही. याखेरीज संदीप जुवटकर, पंकज पंचारिया, अमोल अरू, बिपीन येरूनकर, राजीव चौधरी, सायली मोरे, ऋतुजा पाटील आणि आदित्य पंढरे यांनी अनेक छोट्या छोट्या भूमिकांत सिद्धार्थला साथ दिली आहे. सिद्धार्थच्या सळसळणार्‍या ऊर्जेचा प्रत्यय घेण्यासाठी हा प्रयोग पाहणं मस्ट!