Anjali Phyllis Mendes First Indian Supermodel Paris Fashion Pierre Cardin: सावळ्या रंगामुळे, जास्त उंचीमुळे आणि बारीक शरीरयष्टीमुळे भारतात ज्या मुलीला सतत नाकारले गेले, त्याच मुलीने पुढे पॅरिसच्या फॅशन जगात भारताचा झेंडा फडकवला. अवघ्या ६५ रुपये पगारापासून सेक्रेटरी म्हणून करिअरची सुरुवात करणाऱ्या फिलीस मेंडिसने जेव्हा साडी, कपाळावर टिकली आणि अंबाडा घालून दिग्गज डिझायनर पियरे कार्डिन (Pierre Cardin) यांच्या समोर चालून दाखवलं, त्यानंतर तिने इतिहास घडवला. भारतातील फिलीसचा पॅरिसमध्ये जाऊन ‘अंजली’ होण्याचा प्रवास जाणून घेऊयात.
भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या एक वर्ष आधी म्हणजेच १९४६ साली अंजलीचा जन्म झाला. तिचं मूळ नाव ‘फिलीस मेंडिस’ असं होतं. लहानपणी झाडांवर चढणारी, क्रिकेट खेळणारी अंजली पुढे पॅरिसमधील फॅशन जगतात नाव कमावणारी ती पहिली भारतीय मॉडेल ठरली. पण तिची सुरुवात अतिशय सामान्य होती. गोव्याच्या कॅजेटन आणि फ्लो मेंडिस या दांपत्याच्या सात अपत्यांपैकी ती चौथी मुलगी होती. तिचे वडील स्विस घड्याळांच्या ब्रँडचे प्रतिनिधी होते आणि आई गृहिणी होती. कुटुंब मोठे असल्याने मुलांचे शिक्षण, अन्न आणि कपडे याचा खर्च कसाबसा भागायचा. “आम्ही श्रीमंत नव्हतो. पण आमचे कुटुंब खूप प्रेमळ होते आणि माझे आई-वडील एकमेकांवर खूप प्रेम करायचे,” असं अंजली म्हणाली होती.
ज्या उंची ती पुढे भारताची पहिली सुपरमॉडेल बनली, त्याच उंचीमुळे तिला शाळेत मागे बसावं लागायचं. कारण पुढे बसल्यास मागे बसलेल्या मुलांना दिसायचं नाही. अभ्यासात फारशी हुशार नसलेली फिलीस पुस्तकांमध्ये रमायची. शाळेत कमी गुण मिळायचे, पण तरी तिने एकदा आपल्या मैत्रिणीला म्हटलं होतं की, “मी एक दिवस खूप प्रसिद्ध होईन.” पण तिच्या आयुष्यात इतकं मोठं यश लिहिलेलं असेल, याची कल्पनाही तिने केली नसेल.
फिलीस मेंडिसने अत्यंत कमी वयात काम करायला सुरुवात केली. कॉलेजचे शिक्षण आणि बसचा खर्च परवडत नसल्यामुळे ती बालवाडीत शिकवू लागली. तिचा पहिला पगार ६५ रुपये होता. नंतर वडिलांची नोकरी गेल्याने तिने कॉलेज सोडून सेक्रेटरीचा कोर्स केला. कोर्स पूर्ण झाल्यावर ती जाहिरात क्षेत्रातील दिग्गज बॉबी सिस्टा यांची सेक्रेटरी म्हणून काम करू लागली, त्यानंतर तिचे नशीब बदलले.
एक दिवस बसने प्रवास करताना एका प्रवाशाने तिला फॅशन शोसाठी अर्ज करण्याचा सल्ला दिला. जवळ पैसे नव्हते तरी तिने प्रयत्न करायचं ठरवलं. १९६९ मध्ये ‘इव्हज वीकली मिस इंडिया’ स्पर्धेसाठी जिनी नाओरोजी यांनी दिग्दर्शित केलेल्या फॅशन शोमध्ये तिची निवड झाली आणि तिने शोची ओपनिंग केली. दुसऱ्या दिवशी भारतीय वर्तमानपत्रांनी तिचा उल्लेख ‘इथिओपियन प्रिन्सेस’ असा केला. हा उल्लेख अजिबात योग्य नव्हता. पण या घटनेमुळे तिला मॉडेलिंगमधील करिअरची दिशा सापडली. भारतात विचित्र वाटणारे लांब पाय आणि जास्त उंची, पुढे तिची सर्वात मोठी ताकद बनले. “तिचे पाय पॅरिससाठीच बनले होते. भारतात तिला वेगळी वागणूक मिळाली, पण तिथे ती अत्यंत सुंदर मॉडेल म्हणून नावारूपाला आली,” असं जिनी नाओरोजी यांनी म्हटलं होतं.

१९७१ मध्ये जामनगरच्या महाराजांच्या दागिन्यांच्या फोटोशूटसाठी तिला ५,००० रुपये मिळाले. तरीही भारतात तिच्या करिअरला योग्य गती मिळत नव्हती. शेवटी जिनी नाओरोजी आणि मॉरीन वाडिया यांनी तिला पॅरिसला जाण्याचा सल्ला दिला. नंतर ती कुवैत एअरलाइन्सचे तिकीट आणि १५० फ्रँक्स घेऊन पॅरिसला रवाना झाली.
जून १९७१ मध्ये फिलीस पॅरिसला पोहोचली आणि दुसऱ्याच दिवशी दिग्गज डिझायनर पियरे कार्डिन यांना भेटायला गेली. साडी, कपाळावर टिकली आणि अंबाडा अशा भारतीय रूपात ती तिथे पोहोचली. सकाळी ११:३० वाजता गेलेल्या फिलीसला कार्डिन यांना भेटण्यासाठी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत उपाशीपोटी वाट पाहावी लागली. कार्डिन यांनी तिला पाहिलं आणि तिला चालून दाखवायला आणि तिचे पाय दाखवायला सांगितलं. तिने साडी थोडी वर करून चालून दाखवलं. तिची ही अदा पाहताच त्यांनी तिला लगेच ‘हाऊस मॉडेल’ म्हणून कामावर घेतलं. याच दरम्यान, ‘वुमेन्स वेअर डेली’च्या संपादकांनी तिचं ‘फिलीस’ हे नाव विचित्र वाटत असल्याचं सांगितलं. मग तिने स्वतःचं नाव ‘अंजली’ ठेवलं.

अंजली पुढील १२ वर्षे पियरे कार्डिन यांची मुख्य मॉडेल होती. या काळात तिने उंगारो, जिव्हेंशी आणि शापरेली यांसारख्या प्रसिद्ध फॅशन हाऊसेससाठीही मॉडेलिंग केले. ज्या भारतीयांनी पूर्वी तिच्या सावळी असल्याने नाकारलं होतं, तेच तिचं कौतुक करू लागले.
सामान्यांसाठी ‘वेगळी’ असलेल्या अंजलीचा फॅशन आयकॉनपर्यंतचा प्रवास
२०१० मध्ये अंजलीच्या निधनानंतर फॅशन डिझायनर वेंडेल रॉड्रिक्स यांनी आठवण सांगितली होती. १९८९ मध्ये त्यांनी मुंबईत अंजलीला पाहिलं होतं, तेव्हा तिची ६ फुटांपेक्षा जास्त उंची आणि व्यक्तिमत्त्व सर्वांना आकर्षित करणारे होते. ती रॅम्पवरील इतर सर्व मॉडेल्सपेक्षा वेगळी आणि प्रभावी दिसत होती.
अंजलीला आयुष्यात प्रचंड यश आणि प्रसिद्धी मिळाली, पण प्रेम मिळालं नाही. पॅरिसमध्ये असताना तिचा एका इंग्रज तरुणावर जीव जडला, पण लग्नाआधीच त्याचं कॅन्सरने निधन झालं. या दुःखातून सावरून अंजली पुढे गेली, पण लग्न केलं नाही. “पॅरिसमध्ये असताना मी एका इंग्रज व्यक्तीला भेटले. त्याने मला खाद्यपदार्थ, वाईन, नाटक आणि ऑपेरा यांबद्दल सगळं शिकवलं आणि माझ्या व्यक्तिमत्त्वाला एक नवी दिशा दिली. आम्ही प्रेमात पडलो, लग्न करायचं ठरवलं पण त्याआधीच कॅन्सरमुळे त्याचं निधन झालं आणि माझं आयुष्य अर्थहीन झालं,” असं अंजली म्हणाली होती.

१९७० आणि १९८० च्या दरम्यान अंजलीच्या आई-वडिलांचे निधन झाले. तिने करिअरच्या शिखरावर असताना मॉडेलिंग सोडले. त्यानंतर तिने पियरे कार्डिन यांच्या भारतातील बिझनेसची जबाबदारी तब्बल १८ वर्षे सांभाळली. नंतरच्या काळात अंजलीला स्वयंपाकाची आवड निर्माण झाली. तिने Cuisine Indienne De Mère En Fille नावाचे एक कुकबुक तयार केले. आपल्या प्रवासाबद्दल बोलताना अंजली एकदा म्हणाली होती, “मी वर्तमानात जगते. आयुष्यात प्रेमाची कमतरता नक्कीच जाणवते, पण मी याला माझे कर्म मानते. मी अशी कुरूप महिला होते, जिने स्वतःच्या हिमतीवर सुंदर राजहंसाचं रूप घेतलं. मला स्वतःला जे सिद्ध करायचं होतं, ते मी केलं. मला कसलाही पश्चात्ताप नाही.”
जगासाठी ती एक ग्लॅमरस आणि यशस्वी मॉडेल होती, पण तिच्या जवळच्या मित्रांसाठी ती एक साधी गोव्याची मुलगीच राहिली. वेंडेल रॉड्रिक्स यांनी एक आठवण सांगितली होती. “तिच्या घरी डिनरसाठी फ्रान्सचे राजघराणे, रोथ्सचिल्ड कुटुंब आणि भारताचे राजदूत उपस्थित असायचे. पण हे मोठे पाहुणे निघून गेल्यावर, ती पुन्हा नेहमीसारखीच साधी गोव्याची मुलगी बनायची.” अंजली उत्तम मॉडेलच नाही तर प्रेमळ, शिस्तप्रिय, अध्यात्मिक, बुद्धिमत्ता असलेली आणि इतिहास, साहित्य, संगीत व संस्कृतीचे सखोल ज्ञान असणारी व्यक्ती होती.
२०१० मध्ये पोटात संसर्ग झाल्यामुळे अंजली फिलीस मेंडिसचे निधन झाले. भारतात जास्त उंची, सावळा रंग आणि बारीक शरीरयष्टीमुळे नाकारली गेलेली मुलगी ते पियरे कार्डिन यांची मुख्य मॉडेल आणि पॅरिसमधील एक प्रसिद्ध भारतीय चेहरा बनण्यापर्यंतचा तिचा प्रवास हा थक्क करणारा आहे.
