scorecardresearch

भन्साळीचा मराठी चित्रपट ‘लाल इश्क’ गुपित आहे साक्षीला..

स्वप्नील जोशीसह हिंदी चित्रपट अभिनेत्री अंजना सुखानी प्रमुख भूमिकेत आहे.

गेल्या काही काळात मराठी चित्रपटांनी हिंदी चित्रपटसृष्टीचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळे हिंदी चित्रपटांतील दिग्गजांना मराठी चित्रपटांची भुरळ पडली आहे. संजय लीला भन्साळी हे त्यापैकीच एक आहेत. बाजीराव मस्तानी या गाजलेल्या चित्रपटातून पेशवाईतील प्रेमकहाणी जगभरात पोहचवल्यानंतर आता संजय लीला भन्साळी मराठी चित्रपटसृष्टीत निर्माता म्हणून पदार्पण करत आहे. भन्साळींची निर्मिती असलेला ‘लाल इश्क’ गुपित आहे साक्षीला… हा चित्रपट २७ मे रोजी प्रदर्शित होणार आहे.
स्वप्ना वाघमारे यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात अभिनेता स्वप्नील जोशीसह हिंदी चित्रपट अभिनेत्री अंजना सुखानी प्रमुख भूमिकेत आहे. तसंच जयवंत वाडकर, प्रिया बेर्डे, कमलेश सावंत यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. संजय लीला भन्साळी यांच्या भन्साळी प्रॉडक्शनने चित्रपटाची निर्मिती केली आहे. शबीना खान सहनिर्मात्या आहेत. शबीना खान हिंदी चित्रपटांतील प्रख्यात वेशभूषाकार आणि निर्माती आहेत. कभी खुशी कभी गम, कुछ कुछ होता है अशा अनेक भव्य चित्रपटांची वेशभूषा त्यांनी केली असून, रावडी राठोड, गब्बर इज बॅक या चित्रपटांची सहनिर्मिती त्यांनी केली आहे.
भन्साळी यांना मराठी भाषा, संस्कृती, संगीत यांच्याविषयी खास प्रेम आहे. त्यामुळेच त्यांनी बाजीराव मस्तानी यांची प्रेमकहाणी मोठ्या पडद्यावर साकारली. या चित्रपटाबाबत काही वाद झाले असले तरी, त्याची भव्यता, सादरीकरणाचे खूप कौतुक झालं. त्यामुळेच या चित्रपटाला मोठं यश मिळालं. भन्साळी यांनी नेहमीच मराठी चित्रपटाच्या आशयसमद्धीचं कौतुक केलं आहे. त्यामुळे मराठी चित्रपटाची निर्मिती करण्याची त्यांची इच्छा होती. ‘लाल इश्क’ या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी आपली इच्छा पूर्ण करत मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल टाकलं आहे.
हम दिल दे चुके सनम, ब्लॅक, देवदास, गुजारिश, रामलीला, बाजीराव मस्तानी असे सातत्यानं वेगळ्या पद्धतीचे आणि भव्य हिंदी चित्रपट केल्यानंतर संजय लीला भन्साळी निर्माता म्हणून येत्या काळात आशयसमृद्ध मराठी चित्रपटांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Anjana to romance swapnil joshi in her marathi debut film

ताज्या बातम्या