गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये लगीनघाई सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या पाठोपाठ अभिनेत्री अंकिता लोखंडे विवाहबंधनात अडकणार आहे. अंकिता तिचा बॉयफ्रेंड विक्की जैनसोबत सप्तपदी घेणार आहे. नुकतंच अंकिता आणि विकीचा संगीत सोहळा पार पडला. या संगीत सोहळ्याला बॉलिवूडमधील अनेकांनी हजेरी लावली. विशेष म्हणजे अंकिता-विकीच्या संगीत सोहळ्याला बॉलिवूडची क्वीन कंगना रणौतही उपस्थित होती.

या सोहळ्याचे अनेक फोटो कंगनाने तिच्या इन्स्टाग्रामवर स्टोरीवर शेअर केले आहे. यात कंगना ही अंकितासोबत डान्स करताना, मस्ती करताना दिसत आहे. यावेळी कंगनाने गडद निळ्या रंगाचा लेहंगा परिधान केला होता. यावर गोल्डन रंगाची डिझाईन पाहायला मिळत होती. त्यासोबत तिने ट्रेडीशनल ज्वेलरीही परिधान केली होती. सध्या तिचा या लूकची प्रचंड चर्चा सुरु आहे.

कंगनाने तिच्या ट्रेडीशनल लूकचे अनेक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोला कॅप्शन देताना ती म्हणाली, “युद्ध नको प्रेम करा,
आज मेरे यार की शादी है” या आशयाचे कॅप्शन तिने या फोटोंना दिले आहे. सध्या तिचे हे फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत.

हेही वाचा : कंगनाला २५ जानेवारीपर्यंत अटक करणार नाही, मुंबई पोलिसांची न्यायालयात हमी

अंकिता आणि विकीच्या संगीत सोहळ्यात कंगनाच्या एंट्रीची जबरदस्त चर्चा सुरु आहे. या संगीत सोहळ्यात कंगना तिच्या पाच बॉडीगार्डसह दाखल झाली. याचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

हेही वाचा : अंकिता लोखंडेला साखरपुड्यात आली सुशांत सिंग राजपूतची आठवण; व्हिडीओ व्हायरल

अंकिता आणि कंगना एकमेकांच्या खास मैत्रिणी आहेत. मणिकर्णिका या चित्रपटात त्या दोघींनी एकत्र काम केले आहे. या चित्रपटाच्या सेटवर त्या दोघींची ओळख झाली होती. दरम्यान काही दिवसांपूर्वीच अंकिता लोखंडेचा साखरपुडा पार पडला. मुंबईतील एका अलिशान हॉटेलमध्ये तिने प्रियकर विकी जैनसोबत अधिकृतपणे साखरपुडा केला. त्यांच्या साखरपुड्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर समोर आले होते.