Ankita Walawalkar Mangalsutra Trolling Konkan Hearted Girl Savage Reply: कोकण हार्टेड गर्ल लोकप्रिय इन्फ्लुएन्सर अंकिता प्रभू वालावलकरने तिला मंगळसूत्र न घालण्यावर ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. बिग बॉसमधून घराघरांत लोकप्रिय झालेली अंकिताचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. अनेकदा ती कुटुंबाबरोबर खास फोटो व व्हिडीओ शेअर करीत असते; पण त्यावर निगेटिव्ह कमेंट्स करणाऱ्या नेटकऱ्यांना अंकिता प्रभू-वालावलकरने कडक शब्दांत सुनावले आहे.
इन्स्टाग्रामवर रील शेअर करत अंकिता म्हणाली, “माझं लग्न १६ फेब्रुवारी २०२५ रोजी झालं आणि तेव्हापासून एकही दिवस असा गेला नाही की, माझ्या गळ्यात मंगळसूत्र नाही. कधीतरी मधे असे शूट वगैरे असेल तर मी वेगळे काहीतरी घालते; पण त्याशिवाय जास्त कधी असे होत नाही. पण, तरीसुद्धा काही बायकांना ते दिसत नाही. त्यांच्या नासक्या कमेंट्स असतात की, ‘हिच्या गळ्यात मंगळसूत्र नाही दिसत, हिचं लग्न झालं आहे की नाही?’ अशा कमेंट्स करतात.”
नवऱ्याला अगदी कसं जपून ठेवलंय – अंकिता
पुढे अंकिता म्हणाली, “मला बंद गळ्याचे कपडे घालायला आवडतात. तरीही मी त्याचा गळा खाली करून, मी मंगळसूत्र घातले आहे हे दाखवू का? माझ्या गळ्यात मंगळसूत्र आहे, नवऱ्याला अगदी कसं जपून ठेवलंय, हे असं म्हणत फिरू का?” यानंतर अंकिताने गळ्यामध्ये सोन्याचे मोठे मंगळसूत्र घातले आणि सांगितले, “उद्यापासून मी हे असं घालून फिरते म्हणजे सगळ्यांना कसं घसघशीत दिसून येईल.”

पुढे ती म्हणाली, “अडचण अशी आहे की, काही घातलं तरी बायका बोलतात आणि नाही घातलं तरी बायका बोलतात. कोणी काहीही घातले तरी बायका बोलणारच. बायका नको तिथेही बोलतच राहणार.” त्यानंतर अंकिना बिकिनी स्टाईलमध्ये फोटो शेअर करीत म्हणाली, “उद्या मी १० तोळ्याचे मंगळसूत्र घालून असे कपडे घातले, तर तुम्ही माझं कौतुक करणार आहात का?”

पुढे अंकिता वालावलकरने तिचा पती कुणाल भगतला खांद्यावर बसवले आणि म्हणाली, “ये ये तू असा माझ्या मानगुटीवर बस म्हणजे लोकांच्या लक्षात येईल की, माझं लग्न झालं आहे. आता याला असाच घेऊन बसते,” असा उपरोधिक टोला अंकिता प्रभू वालावलकरने लगावला आहे. तसेच कॅप्शनमध्ये ‘काय बोलाचा हेंका,’ असा प्रश्न विचारला आहे.
