Ankita Walawalkar On motherhood: अंकिता वालावलकरने नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने तिच्या प्रवासाबद्दल, अडचणींबद्दल, पती कुणालबरोबरच्या नात्याबद्दल तसेच सासरच्या मंडळींबरोबर कसे नाते आहे या सगळ्याबद्दल वक्तव्य केले. तसेच, लग्नानंतर माहेर आणि सासर यामध्ये ती समतोल कसा साधते, याबद्दलही सांगितले. या सगळ्यात तिने आई होण्याबद्दल केलेले वक्तव्य लक्ष वेधून घेत आहे.
“मला स्वत:ला आई म्हणून…”
अंकिता वालावलकरने राजश्री मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला विचारले की येत्या काही वर्षांत तुला स्वत:ला एक बिझनेस वुमन, टॉपची कंटेट क्रिएटर की अभिनेत्री म्हणून बघायचं आहे? यावर ती म्हणाली, “मला स्वत:ला आई म्हणून बघायचं आहे. माझं ध्येय खूप स्पष्ट आहे, मला स्वत:ला आई म्हणून बघायचं आहे. ते कौटुंबिक आयुष्य मला आधीपासून हवं होतं. माझे आई-वडील, कुणालचे आई-वडील आहेत, अशा वेळीच मला आई व्हायला आवडेल. त्यामुळे येत्या काही वर्षांत मी आई व्हावं, असं मला वाटतं”, असे म्हणत अंकिताने आई होण्याची इच्छा असल्याचे सांगितले.

मानसिक आरोग्याबद्दल अंकिता वालावलकर काय म्हणाली?
याच मुलाखतीत मानसिक आरोग्याकडे ती कसे लक्ष देते, याबद्दलही सांगितले. ती म्हणाली, “यासाठी कुणालला खूप मेहनत घ्यावी लागली. कधी कधी मला कोणी प्रश्न विचारला, तर मी उशिरा उत्तर देते किंवा कधीतरी तो प्रश्न टाळलाही जातो. त्यामुळे समोरच्याला वाटू शकतं की ही उत्तर देत नाही. मी अतिविचार करते, आता त्याचं प्रमाण कमी झालं आहे, पण मी अजूनही अतिविचार करते.”

पुढे ती म्हणाली, “जे जे लोक कठीण काळातून जात असतील, त्यांना मला एकच सांगायचं आहे की देवावर विश्वास ठेवून या सगळ्या गोष्टी पार करा. आपल्या आयुष्यात पुढे काहीतरी चांगलं होतंच.”

कोकणात गणेशोत्सव कशा पद्धतीने साजरा होतो?
दरम्यान, अंकिता मूळची कोकणातील आहे. तिने कोकणात गणेशोत्सव कशा पद्धतीने साजरा होतो, याबद्दलही सांगितले. शांतपणे, आनंदाने हा उत्सव साजरा केला जातो, असे ती म्हणाली. तसेच, तिच्या माहेरी व सासरी दोन्हीकडे श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठा केली जाते, असेही अंकिताने सांगितले.
