प्रसिद्ध गायक आणि संगीतकार अनु मलिकवर गायक सोना महापात्रा आणि श्‍वेता पंडित यांनी लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप केले होते. या आरोपांमुळे त्याच्यावर सोशल मीडियातुन प्रचंड टीका करण्यात आली. तसेच ‘इंडियन आयडॉल’ या शोमधून त्याला बाहेरचा रस्ता देखील दाखवण्यात आला होता. या आरोपांवर पहिल्यांदाच प्रतिक्रीया देताना त्याने एक खुले पत्र लिहिले होते. या पत्रावर आता सोना महापात्रा आणि श्‍वेता पंडित यांनी ट्विटच्या माध्यमातून पलटवार केला आहे.

काय म्हणाला होता अनु मलिक?

“मी कधीही न केलेल्या गुन्हांची शिक्षा भोगत आहे. खोटे आणि निराधार आरोप माझ्यावर केले जात आहेत. परंतु मला आशा आहे, लवकरच सत्य बाहेर येईल.” अशा आशयाची पोस्ट अनु मलिक याने लिहिली. या पोस्टवर सोना महापात्रा आणि श्‍वेता पंडित यांनी देखील प्रतिक्रीया दिली आहे.

काय म्हणाली सोना महापात्रा?

“अनु मलिकवर केले जाणारे आरोप निराधार नाहीत. अनेक स्त्रियांनी स्वत: पुढे येऊन याबाबत माहिती दिली आहे. दोन मुलींचा पिता असल्यामुळे आरोप काही पुसले जाणार नाहीत.”

श्‍वेता पंडितची प्रतिक्रीया

“अनु मलिकवर केले जाणारे आरोप निव्वळ सत्य आहेत.”

सोना महापात्रा आणि श्‍वेता पंडित यांनी केलेल्या पोस्ट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. या पोस्टवरुन पुन्हा एकदा अनु मलिकवर नेटकऱ्यांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. अनु मलिकने मात्र या नव्या पोस्टवर अद्याप कोणतीही प्रतिक्रीया दिलेली नाही.