फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) या अग्रणी संस्थेच्या संचालक पदावर गझल व भजन गायक अनुप जलोटा यांची नियुक्ती झाल्याची बातमी होती. मात्र जलोटा यांची संचालकपदी नव्हे तर एफटीआयआय सोसायटीचे सदस्य म्हणून निवड झाल्याचा खुलासा एफटीआयआयकडून देण्यात आला आहे. एफटीआयआयचे सध्याचे संचालक भूपेंद्र कँथोला यांनी ‘लोकसत्ता ऑनलाइन’शी बोलताना ही माहिती दिली.

‘बिग बॉस १२’च्या निमित्ताने वादग्रस्त ठरलेले जलोटा यांची संचालकपदी नेमणूक झाल्याने कलावर्तुळात नवा वादंग ओढवण्याची चिन्हे होती. पण जलोटा हे संचालकपदी नसून सोसायटीचे सदस्य असल्याची माहिती एफटीआयआयकडून देण्यात आली आहे. ‘एफटीआयआय सोसायटी’वर चित्रपट क्षेत्रातील दिग्गजांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये अभिनेत्री कंगना रणौत, ज्येष्ठ अभिनेते डॅनी डॅन्झोप्पा, अभिनेत्री दिव्या दत्ता यांच्यासह अनेक नामवंतांचा समावेश आहे.

ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांची सुमारे ११ महिन्यांपूर्वी एफटीआयआयच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर अद्यापपर्यंत एफटीआयआय सोसायटी, नियामक मंडळ आणि शैक्षणिक परिषदेवरील सदस्यांची नियुक्ती रखडली होती.

गायक येसूदास, अभिनेत्री कंगना रणौत, अरविंद स्वामी, ब्रिजेंद्र पाल सिंह, दिव्या दास, सतीश कौशिक आणि डॉ. अर्चना राकेश सिंह यांची मानद सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दिग्दर्शक राजकुमार हिरानी, विधू विनोद चोप्रा, अभिनेते डॅनी डॅन्झोपा आणि महेश आणे यांची माजी विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.