"बाळासाहेब ठाकरे हे एकमेव राजकारणी होते ज्यांनी...", 'काश्मीर फाइल्स'वर बोलताना अनुपम खेरांचं वक्तव्य | Anupam Kher mention Balasaheb Thackeray while speaking on The Kashmir Files | Loksatta

“बाळासाहेब ठाकरे हे एकमेव राजकारणी होते ज्यांनी…”, ‘काश्मीर फाइल्स’वर बोलताना अनुपम खेरांचं वक्तव्य

अनुपम खेर यांनी शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेत काश्मीरमध्ये अत्याचार झालेल्या काश्मिरी पंडितांचं स्वागत करणारे ते एकमेव राजकारणी होते, असं मत व्यक्त केलं.

“बाळासाहेब ठाकरे हे एकमेव राजकारणी होते ज्यांनी…”, ‘काश्मीर फाइल्स’वर बोलताना अनुपम खेरांचं वक्तव्य
अनुपम खेर व बाळासाहेब ठाकरे

प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांनी ‘काश्मीर फाइल्स’चित्रपटावर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रमुख ज्युरींनीच टीका केल्याच्या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच काश्मीरमध्ये घडलेल्या घटना आणि त्यावर राजकारण्यांनी दिलेले प्रतिसाद यावरही भाष्य केलं. यावेळी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेत काश्मीरमध्ये अत्याचार झालेल्या काश्मिरी पंडितांचं स्वागत करणारे ते एकमेव राजकारणी होते, असं मत व्यक्त केलं. ते शनिवारी (३ डिसेंबर) एबीपी माझाच्या ‘माझा कट्टा’ या मुलाखत कार्यक्रमात बोलत होते.

अनुपम खेर म्हणाले, “महाराष्ट्रात महाविद्यालयांमध्ये काश्मीरचे विद्यार्थी येऊन आपलं दुःख सांगत होते आणि महाराष्ट्रातील छोट्या गावांपर्यंत ते गेले होते. इथपर्यंत काश्मीरमध्ये काय होतंय ही जागृती होती. कारण बाळासाहेब ठाकरे हे एकमेव राजकारणी होते ज्यांनी म्हटलं होतं की या सर्वांचं स्वागत आहे. या विद्यार्थ्यांना विद्यापीठांमध्ये टाका, राहण्यासाठी जागा द्या.”

“आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे आभारी आहोत”

“आम्ही त्यासाठी बाळासाहेब ठाकरेंचे आभारी आहोत. त्यांच्यामुळे महाराष्ट्रातील लोकांना काश्मिरी पंडितांविषयी माहिती आहे,” असं अनुपम खेर यांनी सांगितलं.

“सत्याला असत्य बनवायचं आहे त्यांना काश्मीर फाइल्सवर आक्षेप”

अनुपम खेर पुढे म्हणाले, “ज्यांना सत्याला असत्य बनवायचं आहे त्यांना काश्मीर फाइल्सवर आक्षेप आहेत. १९९३ च्या दंगली, १९८४ मध्ये सरदारांबरोबर झालं ते सर्व सत्य आहे ना. हॉलोकास्ट, वर्ल्ड वॉर २ खरं आहे, कोविड सत्य आहे. ५० किंवा १०० वर्षांनंतर कोविड झालाच नव्हता, लॉकडाऊन झालाच नव्हता तर तुम्ही त्यावर थोडाच विश्वास ठेवणार आहात.”

“आधीचे चित्रपट दहशतवाद्यांच्या दृष्टीकोनातून तयार झाले”

“याआधी काश्मीरवर खूप चित्रपट झाले होते, पण ते कायम दहशतवाद्यांच्या दृष्टीकोनातून होते. त्यात मानवाधिकारावर बोललं जायचं आणि त्यांच्यासोबत काय होतं असंच दाखवलं जात होतं. विनोद चोप्रा जे स्वतःला काश्मीरचे सांगतात त्यांनीही चित्रपट केला, मात्र माझ्यासाठी तो चित्रपट निरर्थक होता,” असं मत अनुपम खेर यांनी व्यक्त केलं.

‘काश्मीर फाइल्स’वरील टीकेवर अनुपम खेरांची पहिली प्रतिक्रिया

अनुपम खेर म्हणाले, “काश्मीर फाइल्सवर टीकेनंतर माझी पहिली प्रतिक्रिया काय होती हे मी टीव्हीवर सांगू शकत नाही. माझी प्रतिक्रिया हिंसक होती. माझ्या मनात आलं होतं की एक कानाखाली मारावी. कारण ही केवळ माझा गोष्ट नाही, तर पाच लाख लोकांची गोष्ट आहे ज्यांना १९९० साली त्यांच्या घरातून हिंसकपणे काढून देण्यात आलं होतं.”

“आमच्या अनेक माता-भगिनींवर बलात्कार झाले”

“घरातून काढून देण्याआधी अनेक लोकांची निर्घृण हत्या करण्यात आली. आमच्या अनेक माता-भगिणींवर बलात्कार करण्यात आले होते आणि ३२ वर्षे या गोष्टीला लपवून ठेवण्यात आलं होतं. कोणत्याही सरकारने, कोणत्याही पक्षाने, पत्रकाराने हे मान्य केलं नाही. ही घटना झाली नाही असं म्हणणं हा खरंतर प्रपोगंडा होता,” असा आरोप अनुपम खेर यांनी केला.

हेही वाचा : “या चित्रपटामुळे काश्मिरी पंडितांचं भलं झालं का?”, इस्रायली दिग्दर्शकाच्या टीप्पणीनंतर खोऱ्यातील नेत्यांच्या उमटल्या प्रतिक्रिया

“सर्वोच्च न्यायालयाकडूनही सुनावणीस नकार”

“सर्वोच्च न्यायालयानेही ही खूप जुनी गोष्ट आहे असं म्हणत पुन्हा ती कशाला उकरायची म्हणून सुनावणीस नकार दिला होता. खूप अडचणींनंतर विवेक अग्निहोत्री यांनी हा चित्रपट बनवला आणि हे दुःख जगापर्यंत पोहचलं. त्यानंतर संपूर्ण जगात याचा उल्लेख व्हायला लागला,” असंही खेर यांनी म्हटलं.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-12-2022 at 09:38 IST
Next Story
“माझ्या लग्नात…” हार्दिक जोशीसह विवाहबंधनात अडकल्यानंतर अक्षया देवधरने शेअर केली खास पोस्ट