आमिर खानचा अलिकडेच प्रदर्शित झालेला चित्रपट ‘लाल सिंग चड्ढा’ सातत्याने वादाच्या भोवऱ्यात अडकलेला दिसला. चित्रपटाच्या प्रदर्शनाआधीच त्याच्यावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली जात होती. त्यानंतर बॉक्स ऑफिसवरही चित्रपटाने फारशी कमाई केली नाही. आमिर खानच्या या चित्रपटाला सोशल मीडियावरूनही बराच विरोध होताना दिसला. यावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या होत्या. यावर आता अभिनेते अनुपम खेर यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

‘टाइम्स नाऊ’ला दिलेल्या एका मुलाखतीत अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर सुरू असलेल्या ‘बॉयकॉट’ ट्रेंडवर भाष्य केलं आहे. ते म्हणाले, “अशा प्रकारच्या ट्रेंडमुळे चित्रपट चालत नाही असं म्हणणं निव्वळ मूर्खपणा आहे. २-३ वर्षांपूर्वी निर्माते असा विचार करायचे की चित्रपटावरून वाद झाले तर तो चर्चेत येतो आणि मग लोक चित्रपट पाहायला येतात. त्यामुळे मुद्दाम वाद शोधून काढले जायचे आणि काहीतरी व्हायरल व्हायचे. ज्यामुळे सोशल मीडियावर चित्रपटाची चर्चा व्हायची. चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालायचा. मी आजही या यंत्रणेचा भाग आहे. त्यामुळे मला माहीत आहे. आता या बॉयकॉट ट्रेंडमुळे चित्रपटाच्या कमाईवर फार काही फरक पडत नाही.”
आणखी वाचा- “आपला धर्म…” ‘बॉयकॉट लाइगर’च्या ट्रेंडवर विजय देवरकोंडाचे स्पष्ट विधान

अनुपम खेर पुढे म्हणाले, “अलिकडेच आम्ही आमिरच्या चित्रपटांबाबत बोलत होतो. २०१५ मध्ये ‘दंगल’ चित्रपट प्रदर्शित होण्याआधी त्याने काही वक्तव्य केली होती. पण तरीही त्याचा चित्रपट हिट झाला होता. त्याच्या कोणत्याही वक्तव्याचा चित्रपटाच्या यशावर काहीही परिणाम झाला नाही. प्रत्येकाला त्याचं मत मांडण्याचं स्वातंत्र्य आहे. चित्रपट चांगला असेल तर प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळतोच.”

आणखी वाचा-विशाल भारद्वाज यांच्या चित्रपटात ‘ही’ भूमिका आमिर खानला साकारायची होती, पण..

याशिवाय ‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपटाला सरकारकडून समर्थन मिळाल्याच्या मुद्द्यावर ते म्हणाले, “प्रत्येक टीकाकाराला उत्तर देता येत नाही. मोदीजींचे समर्थन पुरेसे असते तर त्यांचा बायोपिक सर्वाधिक हिट झाला असता. असे जे काही लोक बोलत असतील, ते कोणालाही जाऊन विचारू शकतात. ‘द कश्मीर फाइल्स’बद्दल अनेकांनी ट्वीट केले नव्हते, पण अलिकडेच प्रदर्शित झालेल्या चित्रपटांबद्दल अनेकांनी ट्वीट केले. चित्रपट हिट झाल्यावर बोलल्या जाणाऱ्या या गोष्टी बालिशपणा आहे.”