कंगनाच खरी रॉकस्टार – अनुपम खेर

काही दिवसांपूर्वी कंगनाने बॉलिवूड सेलिब्रिटींवर ताशेरे ओढले होते.

बॉलिवूडची क्वीन अर्थात अभिनेत्री कंगना रणौतचा काही दिवसांपूर्वी ‘मणिकर्णिका:द क्वीन ऑफ झांसी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या माध्यमातून कंगनाने पहिल्यांदाच दिग्दर्शकीय क्षेत्रात पदार्पण केलं. तिचा हा पहिला प्रयोग यशस्वीही ठरला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. कंगनाच्या या यशामुळे तिच्यावर अनेकांनी स्तुतीसुमने उधळली. मात्र बॉलिवूडमधील एकही कलाकार तिच्या आनंदात सहभागी न झाल्यामुळे तिने खंतही व्यक्त करुन दाखविली. कंगनाच्या या तक्रारीनंतर अभिनेता अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर कंगनाचं आणि तिच्या चित्रपटाचं कौतुक केलं आहे.

झांशीची राणी लक्ष्मीबाई यांची यशोगाथा सांगणारा ‘मणिकर्णिका’ यंदाच्या वर्षातला सुपरहिट चित्रपट ठरला आहे. या चित्रपटामध्ये कंगनाने राणी लक्ष्मीबाईंची भूमिका वठविली आहे.तर अंकिता लोखंडे या मराठमोळ्या अभिनेत्रीने झलकारीबाईंची भूमिका साकारली आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही दिवसांनी अनुपम खेर यांनी ‘कंगनाच खरी रॉकस्टार आहे’, असं म्हटलं आहे.

अनुपम खेर यांनी ट्विटरवर चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तर देताना कंगना रॉकस्टार आहे, असं ते म्हणाले. ‘कंगना अत्यंत हुशार आणि धाडसी अभिनेत्री आहे. जे आहे ते कंगना स्पष्टपणे बोलते. अभिनयातही ती कसलेली आहे. कंगना म्हणजे महिला सबलीकरणाचं एक उत्तम उदाहरण आहे. इतकंच नाही तर ती खरी रॉकस्टार आहे’, असे अनुपम खेर म्हणाले.

यशाचं शिखर गाठत असताना माझ्या कलाक्षेत्रातील कोणत्याच कलाकाराने साधे दोन शब्ददेखील कौतुकाचे बोलून दाखविले नाहीत. माझ्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठीदेखील कोणताच कलाकार आला नाही. हे सारे माझ्याविरोधात आहे असं कंगना म्हणाली होती. त्यानंतर तिने अप्रत्यक्षरित्या आलिया भट्टवरही ताशेरे ओढले होते. कंगनाच्या या तक्रारीनंतर अनुपम खेर यांनी ट्विटरवर लाईव्ह येत कंगनाची पाठराखण केल्याचं पाहायला मिळालं.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Anupam kher supports kangana says she is rockstar

ताज्या बातम्या