बॉलिवूडचा किंग खान शाहरुख आणि अनुपम खेर यांनी दिग्दर्शक आदित्य चोप्रा यांच्या ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. हा चित्रपट शाहरुखच्या सुपरहिट चित्रपटांच्या यादीमधील पहिल्या क्रमांकावरील चित्रपट असून बॉलिवूडच्या इतिहासात या चित्रपटाने नाव कोरले होते. तसेच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई देखील केली होती. ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ या चित्रपटात अनुपम खेर आणि शाहरुखने वडिल-मुलाची भूमिका साकारली होती.
चित्रपटाच्या प्रदर्शनाला तब्बल २४ वर्षे उलटून गेली आहेत. आता अनुपम खेर यांच्या मनात चित्रपटाच्या काही आठवणी ताज्या झाल्या आहेत. त्यांनी चित्रपटाच्या आठवणींना उजाळा देणारं तसेच शाहरुखची आठवण येत असल्याचे सोशल मीडियाद्वारे सांगितले आहे. ‘माझा प्रिय शाहरुख! सहजच! न्यूयॉर्कमध्ये तुझी अचानक आठवण आली. आपण खूप सुंदर वेळ सोबत घालवला आणि आता आपण सर्वच मोठे झालो! खूप प्रेम आणि शुभेच्छा #DilwalwDulhaniyaLeJayenge’ असे अनुपम यांनी ट्विटमध्ये म्हटले.
मेरे प्यारे @iamsrk !! बस ऐसे ही!! न्यू यॉर्क में तुम्हारी अचानक याद आयी। We have had some great times together. And then we all grew up!! Love and prayers always.#DilwaleDulhaniyaLeJayenge pic.twitter.com/GDrJnZCKca
— Anupam Kher (@AnupamPKher) April 17, 2019
अनुपम यांचे हे ट्विट वाचतात शाहरुख खानने त्यांना सुंदर उत्तर दिले आहे. ‘नाही Daddy Cool! मोठे होऊ देत तुमचे शत्रू. आपल्या दोघांचीही मनं तर लहान मुलांसारखी आहेत. तुम्ही घरी परत या. आपण सापशीडी खेळू. वाळूचे किल्ले तयार करु. तुम्हाला मिस करतोय’ असे शाहरुखने ट्विटमध्ये लिहिले. हे ट्विट चाहत्यांनी वाचताच सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे.
Arre nahi Daddy Cool! ‘Grow up’ hon aapke dushman. Hum dono ka dil to baccha hai ji. Come back home let’s start with snakes and ladders and we can move to making sand castles in the air. Miss you. https://t.co/asgWd1N5Cb
— Shah Rukh Khan (@iamsrk) April 18, 2019
प्रत्येक सिनेमाप्रेमी व्यक्तीच्या मनात घर करून बसलेल्या ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ चित्रपटाला आता पर्यंत अनेक सन्मान मिळाले आहेत. हा सिनेमा गेल्या १०० वर्षांतील रसिकांचा सर्वांत आवडता चित्रपट म्हणून निवडला गेला होता. अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री काजोल यांच्या बहारदार अभिनयामुळे देश-विदेशातील रसिक या चित्रपटाच्या प्रेमात पडले होते. आजही प्रेक्षक तितक्याच आवडीने हा चित्रपट पाहतात.