Anupama Parameswaran Ex Boyfriend ashamed Menstruation : दाक्षिणात्य सिनेविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री अनुपमा परमेश्वरन ही तिच्या रिलेशनशिपमुळे चर्चेमध्ये आली आहे. यापूर्वी तिने तिच्या एक्स बॉयफ्रेंडवर दोन वर्षे तिचा नार्सिसिस्टिक ॲब्यूज केल्याचा आरोप केला होता. तिने थेट बॉयफ्रेंडचे नाव घेतले नसले तरी यापूर्वी ती अभिनेता ध्रुव विक्रमला डेट करीत होती. त्यानंतर आता अनुपमाने तिला मासिक पाळीवरून हिणवले जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
अनुपमा परमेश्वरनने तिच्या एक्स बॉयफ्रेंडवर रिलेशनशिपमध्ये असताना मानसिक छळ केल्याचे आरोप केले आहेत. तिच्या एक्स बॉयफ्रेंडने तिला स्त्री असण्याबद्दल आणि एक अभिनेत्री असल्याबद्दल लाज वाटावी, अशी वागणूक दिल्याची माहिती अनुपमान दिली आहे. तसेच मासिक पाळी येण्याबद्दल तिला लाज वाटू लागल्याचे अनुपमाने सांगितले आहे.
मासिक पाळी येण्याची लाज वाटू लागली होती – अनुपमा परमेश्वरन
अनुपमा म्हणाली, “मी अशा परिस्थितीतून जात होते, जिथे मला मी अभिनेत्री असल्याची लाज वाटत होती. माझ्यामध्ये जो आत्मविश्वास आहे त्याची लाज वाटत होती. एवढंच काय मी महिला असल्यानं मला मासिक पाळी येते, याचीही मला लाज वाटू लागली होती. आधी मला ११ मुलांची इच्छा होती. मात्र, या रिलेशनशिपमध्ये आलेल्या अनुभवांमुळे आता मला एकाही बाळाला जन्म द्यावा, असं वाटत नाही.”
ती म्हणाली, “माझ्या मासिक पाळीचा पहिला दिवस असो, पाचवा दिवस असो किंवा मासिक पाळीच्या चक्रातील दहावा, पंधरावा किंवा कोणताही दिवस असो. तुम्ही समोरच्या व्यक्तीनं केलेल्या एखाद्या चुकीबद्दल त्याला जाब विचारला, तर तो एकच म्हणायचा, ‘अगं, तुला पाळीतील पीएमएसचा (PMS) त्रास होत आहे. तुला आता मासिक पाळी येणार आहे.’ अशा बोलण्यामुळे मला स्वतःचीच खूप लाज वाटायची.”
अनुपमा परमेश्वरनने तिच्या रिलेशनशिपमधील वाईट परिस्थिती आणि मानसिक त्रासाबद्दल खुलासा केला. ती म्हणाली, “या नात्यामुळे खूप त्रास झालाय आणि त्याचा शरीरावर परिणाम झालाय. या काळामध्ये मी स्वतःला हरवून बसले होते आणि त्यामुळे माझं वजन जास्त प्रमाणात कमी झालं होतं. आयुष्यामध्ये प्रगती होत असली तरी मला आनंद होत नव्हता. उलट, मला अजून खचल्यासारखं वाटायचं. मी दोन वर्षं ‘नार्सिसिस्टिक ॲब्यूज’चा (narcissistic abuse) सामना केलाय. दररोज समोरच्या व्यक्तीची कोणती बाजू पाहायला मिळेल, याची भीती वाटायची.”
अनुपमा परमेश्वरन व ध्रुव विक्रम यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा
दरम्यान, अनुपमाने तिच्या एक्स बॉयफ्रेंडचा नावाचा उल्लेख केला नसला तरी तिचे ध्रुव विक्रमबरोबर नाव जोडले जात होते. २०२५ मध्ये ‘बायसन कालामाडन’च्या शूटिंग आणि प्रमोशनदरम्यान दोघांच्या नात्याबद्दल चर्चा सुरू झाल्या होत्या. दोघांनीही त्याबाबत आतापर्यंत सार्वजनिकपणे कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नव्हती; पण अनुपमा परमेश्वरनने केलेल्या या वक्तव्यामुळे दोघेही चर्चेमध्ये आले आहेत.
