सध्या अनेकजण आपला वेळ वाचवण्यासाठी ऑनलाइन खरेदी करताना दिसतात. तसेच अनेक ई-कॉमर्स साइट्सवर दिवाळी सेल असल्याचे देखील पाहायला मिळते. सामान्य माणसांपासून ते कलाकारांपर्यंत अनेकजण ऑनलाइन खरेदी करताना दिसत आहेत. पण आता एका अभिनेत्याची ऑनलाइन फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. या अभिनेत्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे.

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका अनुपमामध्ये काम करणारा अभिनेता पारस कलनावतने ट्विटरवर ट्वीट करत ऑनलाइन फसवणूक झाल्याचे सांगत नाराजी व्यक्त केली आहे. ‘अशा प्रकारे मला फ्लिपकार्टच्या (नथिंग) बॉक्समध्ये काहीच मिळालेले नाही. सध्या फ्लिपकार्ट अतिशय खराब सेवा देत आहे आणि त्यामुळे लवकरच लोक इथून खरेदी करणे बंद करतील’ या आशयाचे ट्वीट पारसने केले आहे. या ट्वीटमध्ये त्याने फ्लिपकार्टला टॅग केले आहे.
आणखी वाचा : ‘बाई दोन थोबाडीत मार पण प्रवचन देऊ नकोस’, ‘आई कुठे काय करते’ मालिकेवर भन्नाट मीम्स व्हायरल

यावर फ्लिपकार्टने उत्तर देत पारसची माफी मागितली आहे. ‘माफ करा सर, आम्ही तुमची मदत करण्यासाठी आहोत. आम्हाला तुमच्या ऑर्डरचा आयडी द्या जेणेकरुन आम्हाला तुमची मदत करता येईल. आम्ही तुमच्या उत्तराची वाट पाहू’ या आशयाचे ट्वीट फ्लिपकार्टने केले आहे.

पारसने फ्लिपकार्टवरुन इअर फोन ऑर्डर केले होते. पण जेव्हा बॉक्स उघडून पाहिला तेव्हा तो बॉक्स खाली होता. त्यामध्ये इअर फोन नव्हते. पारसने ट्वीटमध्ये रिकाम्या बॉक्सचा फोटो शेअर करत संताप व्यक्त केला आहे.