प्रत्येक आईला तिचं मुल खूप प्रिय असतं आणि आपल्या मुलांसाठी ती कुठल्याही संकटाला सामोरं जाऊ शकते. त्यामुळे कुठल्याही आईसाठी आपल्या मुलाला गमावणं हे आयुष्यातील सर्वात मोठं दुःख असतं. आपल्या आवाजाने भक्तिगीते, भजन आणि चित्रपटसृष्टीतील गाण्यांमार्फत अनेकांचं मनोरंजन करणाऱ्या गायिका अनुराधा पौडवाल यांनाही अशाच दु:खातून जावं लागलं होतं.
‘भजनसम्राज्ञी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनुराधा पौडवाल यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक जवळच्या व्यक्तींना गमावलं. त्यामध्ये त्यांच्या मुलीचाही समावेश होता. हा धक्का इतका मोठा होता की त्यांनी संगीतक्षेत्र सोडण्याचाही विचार केला होता. १९७३ मध्ये अमिताभ बच्चन यांच्या ‘अभिमान’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या अनुराधा पौडवाल यांचा जीवनप्रवास अनेक चढ-उतारांनी भरलेला आहे.
लेकीच्या निधनाने खचलेल्या अनुराधा पौडवाल
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अनुराधा पौडवाल यांनी त्यांच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळाबद्दल सांगितलं. त्यांनी यावेळी अवघ्या २५ दिवसांच्या मुलीच्या निधनाने त्या पूर्णपणे हादरून गेल्या होत्या, असं म्हटलं आहे. या वेदनादायी प्रसंगांबद्दल त्यांनी शुभंकर मिश्राशी संवाद साधताना सांगितलं आहे. या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक अनुभवांवरही मनमोकळेपणाने भाष्य केलं.
मुलाखतीदरम्यान अनुराधा पौडवाल यांना त्यांच्या आयुष्यातील सर्वात कठीण क्षण कोणता होता, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना त्या म्हणाल्या, “जेव्हा मी माझ्या पहिल्या मुलीला गमावलं, तेव्हा ती फक्त २५ दिवसांची होती. तो माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ होता. त्या धक्क्यानंतर मी संगीतक्षेत्र सोडण्याचाही निर्णय घेतला होता. त्यानंतर मी दक्षिणेश्वर येथील काली मातेच्या मंदिरात गेले.” अनुराधा पौडवाल यांना पहिली मुलगी होती आणि तिचं अवघ्या २५ दिवसांची असतानाच निधन झालं होतं, हे फार कमी लोकांना माहीत आहे. या मुलाखतीत त्यांनी पहिल्यांदाच या दुःखद प्रसंगाबद्दल सांगितलं.
३५ वर्षांच्या मुलाचं किडनीच्या आजाराने झालं निधन
यानंतर त्यांनी दक्षिणेश्वरच्या काली मातेच्या मंदिरात जाऊन नवस केलेला आणि तो पूर्णही झाला, असं अनुराधा पौडवाल यांनी सांगितलं. मात्र पहिल्या मुलीच्या निधनानंतर त्यांना आणखी दोन अपत्यं झाली. पण २०२० मध्ये किडनीच्या आजाराशी झुंज देत असलेल्या त्यांच्या ३५ वर्षीय मुलाचंही निधन झालं. या घटनेने त्यांच्यावर पुन्हा दुःखाचा डोंगर कोसळला. सध्या त्यांच्या कुटुंबात त्यांची मुलगी आणि नातवंडं आहेत.
याआधी १९९१ मध्ये त्यांच्या पतीचंही निधन झालं होतं. मुलाखतीत त्यांनी सांगितलं की, ‘आशिकी’ चित्रपटातील गाणी प्रचंड लोकप्रिय झाली होत, पण मला त्याचा अजिबात आनंद नव्हता. कारण त्याच काळात माझ्या पतीची प्रकृती खूप खालावली होती.”
अनुराधा पौडवाल यांनी टी-सीरिजसाठी अनेक गाणी गायली. एका टप्प्यावर त्यांनी फक्त टी-सीरिजसाठीच गाणी गाण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी अनेक भक्तिगीतेही गायली आहेत. एकेकाळी त्यांची तुलना लता मंगेशकर यांच्याशी केली जायची. मात्र, याबाबत बोलताना अनुराधा पौडवाल म्हणाल्या की, “लता दीदी या माझ्या गुरु होत्या. मी त्यांना नेहमीच गुरूसमान मानलं.”
