कोणत्याही चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी बहुविध मार्गांनी त्या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी शकला लढवल्या जातात. त्यापैकीच एक शक्कल म्हणजे बिहाइंड द सीन्सचे व्हिडिओ. दिग्दर्शक अनुराग बासूच्या आगामी ‘जग्गा जासूस’ या चित्रपटाचा असाच एक बिहाइंड द सीन्स व्हिडिओ अभिनेत्री कतरिना कैफने तिच्या फेसबुक अकाऊंटवरुन शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती आणि रणबीर अक्षरश: वेड लागल्यासारखे वागत आहेत.

कतरिना आणि रणबीरवर चित्रीत करण्यात आलेला हा व्हिडिओ ‘उल्लू का पठ्ठा’ या गाण्याचा चित्रीकरणाच्या वेळचा असल्याचं दिसतं. त्यासोबतच या व्हिडिओमध्ये कॅमेऱ्याच्या आड असताना कलाकारांचं नेमकं रुप कसं असतं हेच पाहायला मिळतंय. या व्हिडिओमध्ये दिग्दर्शक अनुराग बासू सुद्धा दिसत आहेत. त्यामुळे या व्हिडिओमधील माहोल पाहता रणबीर- कॅटला ‘याड लागलं’ असंच म्हणावं लागेल. मुख्य म्हणजे हा व्हिडिओ पोस्ट करताना कतरिनाने त्यासोबत एक कॅप्शनही दिलं आहे. या कॅप्शनमधून तिने इतरही बिहाइंड द सीन्स व्हिडिओ लवकरच प्रदर्शित होणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे पुढच्या बिहाइंड द सीन्स व्हिडिओमधून काय पाहायला मिळणार याकडेच चाहत्यांच्याही नजरा लागल्या आहेत.

दरम्यान, ‘जग्गा जासूस’मधून रणबीरच्या भूमिकेतून एक वेगळ्याच रुपातील निरागस हेर पाहायला मिळणार आहे. १४ जुलै रोजी रणबीर- कतरिनाच्या रुपात बॉलिवूडचे हे क्यूट हेर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता रणबीर कपूर आणि अनुराग बासू हे दोघंजण एकत्र आले असून त्यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. रणबीरच्या या चित्रपटामागोमाग तो आणखी एका चित्रपटातून प्रेक्षकांची मनं जिंकणार आहे. अभिनेता संजय दत्तच्या जीवनावर आधारित चित्रपटासाठीसुद्धा रणबीर बरीच मेहनत घेत असून त्याच्याकडून प्रेक्षकांच्याही बऱ्याच अपेक्षा असल्याचं पाहायला मिळत आहे.

वाचा: … या अभिनेत्यांचं नक्की वय तरी काय?