मोदी समर्थकाची अनुराग कश्यपच्या मुलीला बलात्काराची धमकी, अनुरागने मोदींना विचारला ‘हा’ प्रश्न

अनुराग कश्यप यांच्या मुलीला दिलेल्या धकमीचा स्क्रीनशॉर्ट त्यांनी ट्विट केला आहे

अनुराग कश्यप आणि नरेंद्र मोदी

लोकसभा निवडणुकींमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपाला अभूतपूर्व यश मिळाले आहे. या यशाबद्दल दिग्दर्शक अनुराग कश्यप याने पंतप्रधानांना शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र त्याच वेळी त्याने माझ्या मुलीला धमकावणाऱ्या तुमच्या समर्थकांना कशाप्रकारे तोंड द्यायचे हे ही आम्हाला सांगा असाही टोलाही मोदींना लगावला आहे. मोदींच्या विजयानंतर अनुरागच्या मुलीला ट्विटवरुन एका मोदी समर्थकाने अश्लील भाषेत बलात्काराची धमकी दिली आहे. याच ट्विटचा स्क्रीनशॉर्ट शेअर करत अनुरागने मोदींना सवाल केला आहे.

अनुरागने शेअर केलेल्या स्क्रीनशॉर्टमध्ये चौकीदार रामसिंघ नावाच्या ट्विटर अकाऊण्टवरुन करण्यात आलेले अश्लील भाषेतील ट्विट दिसत आहे. यामध्ये तुझ्या बापाला शांत रहायला सांग अशी धमकी अनुरागच्या मुलीचा फोटो शेअर करत या व्यक्तीने दिली आहे. आपल्या ट्विटमध्ये अनुराग म्हणतो, ‘प्रिय, नरेंद्र मोदी सर, निवडणुकीतील विजयासाठी तुमचे हार्दिक अभिनंदन. सर्वसमावेश विकासाचा मुद्दा आपल्या भाषणातून मांडल्याबद्दल धन्यवाद. तुमच्यात आणि माझ्यात मतभेद असल्याने तुमचे समर्थक माझ्या मुलीली अशाप्रकारे धमक्या देऊन विजयाचा आनंद साजरा करत आहेत. कृपया तुमच्या या अशा समर्थकांशी आम्ही कशाप्रकारे वागावे हे ही तुम्ही आम्हाला सांगा.’

या आधी अनुरागने अनेकदा मोदींवर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे टिका केल्याची उदाहरणे आहेत. मात्र वैचारिक मतभेदासाठी माझ्या मुलीला अशाप्रकारे धकम्या येत असल्याबद्दल अनुरागने ट्विटवरुन चिंता व्यक्त केली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Anurag kashyap congratulates pm modi for the victory and asks how to deal with his followers who are threatening his daughter