मराठी चित्रपट ‘गोंधळ’ची आगामी ऑस्करसाठी भारताची अधिकृत निवड झाली आहे. यापूर्वी अनेक भारतीय चित्रपट ऑस्करसाठी पाठवण्यात आले आहेत. मात्र २००१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘लगान’नंतर भारताकडून पाठवण्यात आलेल्या कोणत्याही चित्रपटाला ‘सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म’च्या शॉर्टलिस्टमध्ये स्थान मिळालेलं नाही.

भारताकडून दरवर्षी ऑस्करसाठी चित्रपट पाठवला जात असला तरी याबाबत अनेकदा चर्चा होत असते. नुकत्याच एका मुलाखतीत दिग्दर्शक अनुराग कश्यपला भारताला ऑस्कर का मिळत नाही, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांने थेट उत्तर देत म्हटलं, “कारण आपण अगदी चुकीचे चित्रपट निवडतो.” विशेष म्हणजे, ‘गोंधळ’ हा भारताकडून यंदा पाठवण्यात आलेला चित्रपट त्यांनी अद्याप पाहिलेला नसल्याचंही स्पष्ट केलं.

यावर्षीची ऑस्करची स्पर्धा खूप कठीण आहे – अनुराग कश्यम

‘Variety India’ला दिलेल्या मुलाखतीत अनुराग कश्यपने सांगितलं की, भारताकडे ‘द लंचबॉक्स’ आणि ‘ऑल वी इमॅजिन ॲज लाइट’ यांसारख्या योग्य चित्रपटांची निवड करण्याची संधी होती. मात्र, त्याच्या मते फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया (FFI)ने ही संधी गमावली. हे दोन्ही चित्रपट FFIने जाणीवपूर्वक निवडले नसल्याचा आरोपही त्याने केला. ऑस्करसाठी चित्रपट निवडण्याच्या प्रक्रियेवर अती राजकारणाचा प्रभाव पडतो का, असं विचारण्यात आलं असता अनुराग कश्यपने हो असं उत्तर दिलं. याबरोबरच या प्रक्रियेत जागरूकतेचा अभाव असल्याचंही त्याने म्हटलं. यंदाच्या ऑस्कर स्पर्धेबद्दल बोलताना अनुराग कश्यप म्हणाला, “यावर्षी स्पर्धा खूपच कठीण आहे. ऑस्करसाठीच्या आंतरराष्ट्रीय प्रवेशांवर मात करणं यंदा कठीण आहे.”

अनुराग कश्यपने आंतरराष्ट्रीय स्तरावर एखाद्या चित्रपटाची दखल घेतली जाण्यासाठी काय करता येऊ शकतं, याबाबतही आपलं मत मांडलं. त्याच्या मते, ऑस्करसाठी पात्र ठरण्याच्या प्रक्रियेत सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे संबंधित चित्रपट भारताबाहेरील एखाद्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झालेला असावा किंवा वर्ष संपण्यापूर्वी त्याला अमेरिकेत वितरण मिळालेलं असावं. ‘गोंधळ’बद्दल बोलताना अनुराग कश्यपने या चित्रपटाने विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये प्रदर्शित होण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असं मत व्यक्त केलं.

अनुराग कश्यपने पुढे सांगितलं की, एखाद्या चित्रपटाचं आंतरराष्ट्रीय स्तरावर स्क्रीनिंग न होणं किंवा त्याला अमेरिकेतील वितरक न मिळणं याचा ऑस्करमधील यशाच्या शक्यतांवर मोठा परिणाम होऊ शकतो. “हे पहिलं पाऊल असायला हवं, अन्यथा स्क्रीनिंग किंवा जाहिरातींवर खर्च केलेला सगळा पैसा वाया जातो,” असं तो म्हणाला. ‘गोंधळ’ला IFFI (आंतरराष्ट्रीय भारतीय फिल्म फेस्टिव्हल) या मान्यताप्राप्त महोत्सवात पुरस्कार मिळाला असल्याने आता NFDCने हा चित्रपट आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये पाठवून त्याला अधिकाधिक एक्सपोजर मिळवून द्यायला हवं, असं अनुरागने सांगितलं.

चित्रपट निर्मात्यांना या प्रक्रियेबद्दल पुरेशी माहिती नसण्याची शक्यता असल्याने NFDCने यामध्ये पुढाकार घ्यायला हवा, असंही त्याने म्हटलं. NFDCचे प्रतिनिधी अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये उपस्थित राहत असल्याचं सांगत तो म्हणाला की, “NFDC कोणताही उद्देश नसताना प्रत्येक महोत्सवात मार्केट उभारण्यासाठी जातं. देशाबाहेर प्रीमियर न झालेल्या चित्रपटांना महोत्सवांमध्ये पाठवणं, त्यासाठी अर्ज करणं हा त्यांचा उद्देश असायला हवा; केवळ मार्केटमध्ये चित्रपट दाखवणं नव्हे.”

‘मैंन वापस आऊंगा’ऐवजी ‘गोंधळ’ची निवड का झाली?

‘गोंधळ’ची ऑस्करसाठी निवड करणाऱ्या FFIच्या १४ सदस्यीय ज्युरी पॅनेलमध्ये विवेक वासवानी यांचाही समावेश होता. त्यांनी NDTVला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, ज्युरी सदस्यांना कोणत्या प्रकारचा चित्रपट निवडायचा याबाबत अगदी स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या. ते म्हणाले, “चित्रपटाने भारतीय संस्कृती आणि परंपरेचं अशा पद्धतीने प्रतिनिधित्व केलं पाहिजे, ज्याला जागतिक स्तरावरही आकर्षण असेल. म्हणजेच तो चित्रपट भारतीय आणि जागतिक, दोन्ही असायला हवा. गोंधळ तसा होता.”

संतोष डावखर यांनी लिहिलेल्या ‘गोंधळ’ची ऑस्करसाठी निवड का झाली, यामागचं कारण विवेक वासवानी यांनी स्पष्ट केलं. ते म्हणाले, “ही एका रहस्याची रात्र आहे. ही एका हत्येची रात्र आहे. पण ती संपूर्ण रात्र एका उत्सवाचीही आहे आणि संपूर्ण रात्र गाणं आणि नृत्य सुरू असतं. त्यामुळे पटकथेतील संपूर्ण रहस्य आणि सस्पेन्स संगीत आणि नृत्याच्या थराखाली मांडण्यात आला आहे. हा पूर्णपणे भारतीय अनुभव आहे, कारण ही कथा महाराष्ट्रातील एका दुर्गम गावात घडते.” विवेक वासवानी यांनी सांगितलं की, इम्तियाज अलींचा ‘मैंन वापस आऊंगा’ आणि नागा भाषेतील ‘अंग’ हे दोन्ही चित्रपटही ज्युरीच्या पसंतीस उतरले होते. मात्र, इम्तियाज अलींच्या चित्रपटाची निवड न करण्यामागे त्याची भारत-पाकिस्तानच्या पार्श्वभूमीवरची कथा एक कारण असल्याचं त्यांनी सांगितलं.

ते म्हणाले, “भारत-पाकिस्तानशी संबंधित कोणतीही गोष्ट अमेरिकेतील प्रेक्षकांना कदाचित भावणार नाही, असं आम्हाला वाटलं. म्हणजे इस्रायलने पॅलेस्टाइनविरोधी चित्रपट पाठवण्यासारखं आहे.” मात्र, त्यानंतर त्यांनी स्पष्ट केलं की, ‘मैंन वापस आऊंगा’ हा पाकिस्तानविरोधी किंवा भारतविरोधी चित्रपट नव्हता. तो युद्धामुळे होणाऱ्या आघातावर भाष्य करणारा संवेदनशील चित्रपट असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र, या चित्रपटाला ज्युरीकडून पुरेशी मतं मिळाली नाहीत. तर ‘अंग’ या चित्रपटाला १४ पैकी ११ मतं मिळाल्याचं विवेक वासवानी यांनी सांगितलं.