‘बाहुबली द कन्क्लुजन’ नंतर अभिनेता प्रभास आणि अभिनेत्री अनुष्का शेट्टी या जोडीला पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक होते. मात्र, त्यांच्या चाहत्यांची आता निराशा होणार असल्याचे कळते. ‘साहो’ या आगामी चित्रपटात प्रभाससोबत अनुष्का दिसणार असल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वीच आले. त्यानंतर या दोघांच्याही चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. एस एस राजामौलीच्या ‘बाहुबली’ चित्रपटातील या जोडीचा ‘साहो’च्या निर्मात्यांना नक्कीच फायदा झाला असता. ‘बाहुबली २’मध्ये देवसेनाच्या रूपात अनुष्का देसी अवतारात दिसली होती. पण ‘साहो’मध्ये ती मॉडर्न लूकमध्ये दिसणार, अशी चर्चा होती. या भूमिकेसाठी अनुष्का बरीच मेहनत घेत असल्याचीही चर्चा होती. मात्र, आता ‘साहो’मधून अनुष्का शेट्टीला काढण्यात आल्याचे कळते.

वाचा : हुकूमशहा मुअम्मर गद्दाफीसोबत कतरिना

केवळ वजन कमी न झाल्यामुळे अनुष्काला चित्रपटातून काढण्यात आलेय. ‘बाहुबली’मधील अनुष्काचा देसी लूक प्रेक्षकांनी विसरून जावा यासाठी निर्मात्यांनी तिला मॉर्डन लूकमध्ये आणायचे ठरवलेले. तिचा नवा लूक आधीच लोकांपर्यंत पोहचू नये म्हणून ती ‘सिमा २०१७’ ( SIIMA 2017 ) पुरस्कार सोहळ्यालादेखील गेली नव्हती. ‘साहो’ चित्रपटाच्या सेटवरील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘साहो’साठी अनुष्का खूप मेहनत घेत होती. तिचे वजन या भूमिकेच्या आड येत होते. अजूनही तिचे वजन पाच ते आठ किलो अधिक आहे. त्यामुळेच तिला चित्रपटाला मुकावे लागले.  ‘बाहुबली २’साठी अनुष्काने वजन वाढवले होते. ‘बाहुबली’चे दिग्दर्शक एस. एस. राजमौली यांचा तसा आग्रह होता. पण आता हे वाढलेले वजन कमी करणे अनुष्कासाठी कठीण होऊन बसलेय. या वजनामुळे ‘साहो’मधून बाहेर पडण्याची वेळ तिच्यावर आल्याचे कळतेय.

वाचा : ‘या’ टेलिव्हिजन अभिनेत्रीला झाली दोन वर्षे कारावासाची शिक्षा

दरम्यान, ‘साहो’साठी निर्मात्यांनी अनेक बॉलिवूड अभिनेत्रींना विचारणा केलेली. प्रभासशी ओळख नसल्यामुळे कतरिना कैफने भूमिका नाकारली तर श्रद्धा कपूरने दाक्षिणात्य चित्रपटात काम करण्यासाठी अव्वाच्या सव्वा मानधनाची मागणी केली. त्यामुळे प्रभासच्या  हिरोईनसाठी अनुष्काची निवड करण्यात आली. पण, आता बहुधा ‘साहो’साठी अभिनेत्रीचा शोध सुरुच राहणार असल्याचे चित्र आहे.