प्रभासमुळे अनुष्काने करण जोहरची ऑफर नाकारली?

एका विशेष भुमिकेसाठी करणने अनुष्काला विचारलं होतं.

prabhas and anushka shetty
प्रभास आणि अनुष्का शेट्टी

‘बाहुबली : द कन्क्लुजन’ या चित्रपटाच्या यशानंतर त्यातील मुख्य कलाकार प्रभास आणि अनुष्का शेट्टीला अनेक चित्रपटांचे ऑफर्स येऊ लागले. त्यानंतर दोघेही बॉलिवूडकडे आपला मोर्चा वळवतील अशीही जोरदार चर्चा होती. आता दिग्दर्शक करण जोहरने त्याच्या आगामी चित्रपटात एका विशेष भुमिकेसाठी अनुष्काला विचारल्याचं कळतंय. मात्र, तिने करणची ऑफर नाकारल्याची माहिती ‘नवभारत टाइम्स’ने दिली आहे.

‘बाहुबली’च्या हिंदी व्हर्जनचे वितरण करणारा निर्माता करण जोहर हा प्रभासला बॉलिवूडमध्ये लाँच करणार असल्याच्या चर्चाही मध्यंतरी सुरु होत्या. प्रभासने बॉलिवूड पदार्पणातील चित्रपटाकरिता तब्बल २० कोटी रुपये मानधन मागितल्याने करणही त्याला आपल्या चित्रपटात घेणार नसल्याचं म्हटलं जात होतं. अनुष्काच्या तारखा जुळून येत नसल्याने तिने करणला नकार दिल्याचं समजतंय. मात्र, यामागे प्रभासही कारणीभूत असल्याची चर्चा होऊ लागली आहे. प्रभासला करणचा चित्रपट मिळाला नाही म्हणून अनुष्कानेही त्याच्या चित्रपटात काम करण्यास नकार दिल्याचं म्हटलं जात आहे.

वाचा : टीव्हीवर लवकरच कपिलचं पुनरागमन पण…

दाक्षिणात्य चित्रपटांमधील या कलाकारांना बॉलिवूड चित्रपटात भूमिका साकारताना पाहण्यासाठी चाहते खूपच उत्सुक आहेत. मात्र, चाहत्यांची ही इच्छा लवकर पूर्ण होणार नाही, असंच चित्र सध्या दिसतंय.

प्रभास सध्या त्याच्या आगामी ‘साहो’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. यामध्ये श्रद्धा कपूर आणि नील नितीन मुकेश यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. तर अनुष्का ‘भागमती’ या दाक्षिणात्य चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Anushka shetty rejects karan johar bollywood offer because of prabhas