बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात आहे. क्रुझवरील अमलीपदार्थांच्या पार्टीप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. आर्यनच्या जामीन याचिकेवर तातडीची सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाने गुरुवारी नकार दिला. त्याचा तुरुंगवास संपायची चिन्हे दिसत नाहीत. आर्यन खानसोबत त्याचा मित्र अरबाज मर्चंटही आर्थर रोड जेलमध्ये आहेत. आर्यन आणि अरबाजला जेलमध्ये विविध कोठड्यांमध्ये ठेवण्यात आले आहे. दरम्यान अरबाज मर्चंटचे वडील अस्लम मर्चंट यांनी नुकतंच आर्थर रोड कारागृहात मुलाची भेट घेतली. यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी मुलाच्या तब्येतीबद्दल सांगितले. “माझ्या मुलगा कोठडीत एकटाच आहे. त्यामुळे त्याला अँझायटीचे झटके येतात,” असे अस्लम मर्चंट म्हणाले.

ई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीनुसार, “जवळपास २० दिवसांनंतर अरबाज मर्चंटचे वडील अस्लम मर्चंट यांनी आर्थर रोड कारागृहात जाऊन मुलाची भेट घेतली. यावेळी ते दोघेही फार भावूक झाले. अनेक दिवसांनी मुलाला भेटल्यानंतर बोलताना अस्लम मर्चंट म्हणाले, “मी माझ्या मुलाला कोर्टातील सुनावणीदरम्यान भेटलो होतो. पण माझ्या पत्नीने म्हणजेच अरबाजच्या आईने जवळपास २० दिवस त्याला पाहिले नव्हते. हा संपूर्ण भावनिक काळ आहे. तिने त्याला बघितल्यानंतर रडायला सुरुवात केली. पण मला तिला थांबवावे लागले. आपल्याला अरबाजसोबत जो काही अमूल्य वेळ मिळालाय, तो अशाप्रकारे वाया घालवू नये. आपण त्याला भेटायला, त्याच्याशी बोलायला आलोय,” असे अस्लम मर्चंट यांनी सांगितले.

“बघा मी कुठे पोहोचलोय?”

आई-वडिलांना पाहिल्यानंतर अरबाज म्हणाला, ‘बघा मी कुठे पोहोचलो?’ मला जनरल कोठडीत ठेवलं आहे. तिकडे माझ्यासोबत सहा ते सात कैदी आहेत. ते कैदी कसे आहेत याची मला काहीही माहिती नाही. मला कधी कधी अँझायटीचे झटके येतात, ज्यामुळे मी तिकडे अजिबात झोपू शकत नाही.”

“जेलमध्ये माझा मुलगा एकटा पडला आहे. त्यामुळेच त्याला अँझायटीचे झटके येत असावेत. त्या लोकांनी दोन मित्रांना वेगळे केले आहे. आर्यनला आणि अरबाजला वेगवेगळ्या कोठडीत ठेवण्यात आले आहे. त्यांना इतर कैद्यांप्रमाणेच अन्न मिळतं. तो जेव्हा मला कोर्टात भेटतो, तेव्हा सर्वात पहिले मला केसबद्दल काय झालं, असा प्रश्न विचारतो.” असेही ते म्हणाले.

“तो एक निष्ठावंत मित्र”

पुढे अस्लम मर्चंट म्हणाले, “मी त्याला सांगितले की आम्ही जामिनासाठी अर्ज केला आहे आणि त्याच दिवशी आर्यनच्या जामिनासाठी देखील सुनावणी आहे. मी आणि आर्यन फार चांगले मित्र आहोत. ते एकमेकांसोबत खूप गोष्टी शेअर करतात. आर्यन अरबाजसोबत हे सगळं किती दिवस चालेल याबद्दल बोलत असतो. हा सर्व प्रकार लवकरच मार्गी लागेल अशी आशा त्या दोघांनाही आहे. आर्यनचे वडिल एक प्रतिष्ठित आणि लोकप्रिय व्यक्ती आहेत. पण आम्ही सर्वसामान्य आहोत. त्यामुळे अरबाजचे नशिब खराब होते, असे मला वाटते. पण अशा काळातही त्याने आर्यनची साथ सोडली नाही, याचा मला आनंद आहे. तो एक निष्ठावंत मित्र आहे म्हणून मी त्याला यारो का यार म्हणतो.”

अरबाजसोबत झालेल्या भेटीदरम्यान आर्थर रोड जेलमधील अधिकाऱ्यांनी त्यांना आश्वासन दिले आहे की, “आम्ही तुमच्या मुलाची व्यवस्थित काळजी घेऊ. त्यांचे हे बोलणे ऐकून फार चांगले वाटले. पण सध्या अरबाज हा एक कैदी आहे. त्यामुळे कोणीही याबद्दल काहीही करू शकत नाही,” असेही त्यांनी सांगितले.